छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेत मागील काही वर्षांत संबंधित दलाल आणि मनपाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती १०० कोटींवर आहे, असा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी केला. ज्यांच्या नावे ही योजना आहे, त्या नावाचे पावित्र्यही घोटाळेबाजांना राखता आले नसून, ज्या समाजासाठी ही योजना राबवण्यात येत आहे, त्याच समाजातील तथाकथित नेत्यांच्या सहभागानेच गैरप्रकार घडला आहे, असेही जलील म्हणाले. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांची भेट घेतल्यानंतर आवारात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी वरील गंभीर आरोप केला.
जलील म्हणाले, ‘अडीच लाख गुणिले ५०० लाभार्थी, असे गणित मांडून आकडेमोड केली, तर कोट्यवधींचा घोटाळा समोर येणार आहे. या संदर्भाने आपण अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्याशी त्यांच्या कक्षात चर्चा केली. या वेळी मनपाच्या अधिकारी अपर्णा थेटे आणि रमाई-घरकुल योजनेतील संबंधित अधिकारीही उपस्थित होते.’ या योजनेचे काम मनपाने एका संस्थेला देण्यासाठी २५ लाखांची निविदा काढली. ज्यांना कामाच्या संदर्भातील निविदा मंजूर करण्यात आली ते समाजातील मोठे नेते आहेत, असे सांगत जलील यांनी त्या नेत्याचे नाव सांगण्यास तूर्त नकार दिला. मात्र, काम मिळालेल्यांमध्ये दोन माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे सांगून, त्यांनी योजनेचे काम केवळ १० टक्के रकमेतच करण्यात येणार असून, असे उदाहरण जगातही कोठे सापडणार नाही, असे सांगितले.
जलील यांनी, योजनेत एकाच कुटुंबातील चार-चार लाभार्थी तयार करून आणि शहराबाहेरीलही बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित नेत्यांनी लाभार्थीही तयार केल्याचा आरोपही केला. या योजनेतील घोटाळ्याचे पुरावे आपण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे देण्यात आले आहेत. याशिवाय मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याकडेही सोपवल्याची माहिती देऊन जलील यांनी, ज्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येते त्याच समाजातील काही बड्या नेत्यांचा घोटाळ्यात हात असल्याचा आरोप करून, आपल्या निवेदनावर अतिरिक्त आयुक्तांचे उत्तर मिळाल्यानंतर लवकरच पुरावे माध्यमांसमोर आणले जातील, असे सांगितले.