माझी त्याच्याशी ओळख कधी झाली ते आठवत नाही. एके दिवशी अचानक माझ्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ नंबरवर एक ग्रुप अवतरला. सहसा अशा आगंतुकांविषयी फारसे औत्सुक्य कुणी दाखवत नाही. मीही तसेच केले; पण तो ग्रुप रद्द करू नये, असे मला वाटले. कारण?.. माहीत नाही. पहिल्याच दिवशी भराभर त्यामध्ये आणखीही काही नावे जोडली जाताना मला दिसत होती. एक-दोन माहितीतली नावे सोडली, तर बाकीची सारी नावे अनोळखीच होती. तरीही मी ग्रुप सोडला नाही. चिकटून राहायचे, इथे काय चालते ते पाहायचे असे ठरवले आणि पहिल्याच पोस्टपासून काहीसे वेगळे वाटू लागले. बऱ्याचशा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा दिवस उजाडतो, तो ‘सुप्रभात’ संदेशांनी आणि ‘संस्कारपर’ विचारांच्या ‘फॉरवर्डेड’ संदेशांनी. मग दिवसभर जणू ‘या हृदयीचे त्या हृदयी’ एवढाच उद्योग चालतो. काहींवर पोटतिडिकीने राजकारणावर चर्चा चालते, भक्त आणि विरोधकांची ‘आभासी युद्धे’ शिगेला पोहोचतात आणि नंतर खूप रात्र झाली की, ‘शुभरात्री’ संदेशांची देवाणघेवाण करून ग्रुप निवांत होतो. या ग्रुपचे वेगळेपण त्या पाश्र्वभूमीवर मला जाणवत राहिले. एकही अनावश्यक विनोद नाही, राजकारणावर चर्चा नाही, कविता, गाणी, व्हिडीओ नाहीत आणि विनोदांची देवाणघेवाणही नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत अखंडपणे, वेगळ्या आणि केवळ समाजपरिवर्तनाच्याच विचारांनी वाहणाऱ्या या ग्रुपचे मला नकळत आकर्षण वाटू लागले. थेट सहभागी न होता मी दररोज त्यावर फेरफटका मारत होतो.

..आणि दररोज एक गोष्ट नव्याने जाणवत होती. या ग्रुपवरच्या प्रत्येकाला, समाजातील उपेक्षितांसाठी, वंचितांसाठी काही तरी करण्याची अपार ऊर्मी होती. नव्या कल्पना, नवे संकल्प, नवा विचार आणि परस्परांवर प्रोत्साहनाचा- स्तुतीचा नव्हे- वर्षांव! समाजसेवी जाणिवांची एक साखळी या ग्रुपवर भक्कम होत आहे, हे मला दिवसागणिक जाणवत होते. व्हॉट्सअ‍ॅप हे माध्यम रचनात्मक कामासाठी प्रभावीपणे वापरता येते, हे या कल्पक ग्रुपमुळे मला उमगू लागले होते. समाजात नाकारल्या गेलेल्या, समाजाच्या चौकटीबाहेर वावरणाऱ्या आणि ‘आपण याच समाजातली माणसं आहोत’ याची जाणीवदेखील हरवलेल्या वंचितांच्या वर्गासाठी काम करणाऱ्यांचा हा ग्रुप सोडावा असं मला मग कधी वाटलंच नाही. त्याचं निमंत्रण देणाऱ्या महेशदादाविषयी- महेश निंबाळकर नावाच्या त्या तरुणाविषयी- तेथील प्रत्येक पोस्टनंतर माझी उत्सुकता वाढतच होती.

महेश निंबाळकर हा बार्शीचा तरुण. त्यानं डीएड केलं आणि काही  वर्ष नोकरीही केली. एका लहानशा घटनेने त्याच्या जगण्याला वळण मिळालं आणि समाजातील वंचितांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचं त्यानं ठरवलं. कधीमधी मला त्याचा एसएमएस यायचा. काही तरी नव्या उपक्रमाची माहिती मिळायची. मग तो फेसबुक फ्रेंड झाला. एका सकाळी त्याचा एक वेगळाच मेसेज आला, गणेशोत्सवासाठी निमंत्रण देणारा.. हे निमंत्रण वाचलं आणि हा तरुण काही तरी वेगळं करतोय हे जाणवू लागलं. घरी गणपती न बसवता, रस्त्यावरच्या मुलांपैकी एकाला दहा दिवस घरी आणून त्याची सेवा करण्याचा संकल्प महेशने सोडला होता. व्हॉट्सअ‍ॅपवर अशाच समविचारींचा गट बांधण्यातही त्याचाच पुढाकार होता.

परवाही असाच एक मेसेज आला आणि त्याच्याशी बोललंच पाहिजे असं मला वाटू लागलं. मग मी आणखी काहींशी बोललो. त्याच्याविषयी माहिती घेतली. अगदी अलीकडेच तो पिंपरी- चिंचवडला गिरीश प्रभुणेंच्या समरसता गुरुकुलममध्ये जाऊन आला हेही समजलं. तिथे दीड-दोन तास त्याने गिरीश प्रभुणेंशी गप्पा मारल्या. विषय एकच. वंचितांच्या वर्गाभोवती असलेली अदृश्य भिंत नष्ट करण्यासाठी मी काय करू! मग त्याच्याशी बोलायचंच असं ठरवलं आणि आमचा थेट संवाद सुरू झाला.

एक जगावेगळा प्रवास त्या संवादातून उलगडत गेला. बार्शीच्या वेशीजवळ, लातूर रोडवर, डवरी गोसावी या भटक्या समाजातील कुटुंबांची पालं पडलेली असायची. पुरुष काही तरी काम करून कमाई करायचे आणि बायका केसाच्या पिना, फुगे, कानकोरणी वगैरे विकत गल्लोगल्ली हिंडायच्या. दिवसभर पालावर पोरांचं राज्य. मुळातच संस्काराशी संबंधच नसलेली आणि आईबापाची सावलीदेखील अंगावर पडत नसलेली ही मुलं स्वच्छंद जगायची. घरात बापानं खाऊन टाकलेल्या गुटखा- जर्दाच्या पुडीतले उरलेसुरले कण चघळत त्या व्यसनाच्या विळख्यात गुरफटून जायची, पत्ते खेळत बसायची. कुणी त्याही पुढे जाऊन दारूदेखील चाखायची.. त्या पालाशेजारच्या रस्त्यावरून असंख्य माणसं ये-जा करायची, पण महेशला हे जगणं जाणवलं. ही पिढी अशीच त्यांच्या आईबापांसारखीच जगणार, त्यांना समाज म्हणून वावरताच येणार नाही आणि उपेक्षित म्हणूनच जगून ती उपेक्षित म्हणूनच मरणार या जाणिवेनं तो अस्वस्थ झाला. काही तरी केलं पाहिजे असे त्याला वाटत होते आणि एकदा धीर करून तो एका पालात घुसला. तिथल्या बाप्याला समोर बसवलं आणि अक्षरश: दमात घेतलं. ‘शिक्षणाच्या हक्काचा कायदा आलाय. पोरांना शाळेत घालावंच लागेल’, अशा शब्दांत दमच भरला. ‘कायदा’ म्हटलं की अशी कुटुंबं घाबरतात. महेशच्या शब्दांनी त्या बाप्याला घाम फुटला. तो गयावया करू लागला. ‘गाव सोडून निघून जातो, पण कायद्याच्या कचाटय़ात अडकवू नका’ म्हणाला. त्या दिवशी महेश घरी परतला, तो काहीसा बेचैनीतच. आपलं काही तरी चुकलं, असं त्याला जाणवत होतं. अशा पद्धतीने दमबाजी करून माणसं जोडता येणार नाहीत, त्यांना प्रेमाने आपलंसं केलं पाहिजे, हे लक्षात आलं. पुन्हा त्याने ती वस्ती गाठली. पालावरच्या सगळ्यांना बोलावलं. हात जोडले. पोरांना चार अक्षरं शिकवली नाहीत, तर तीदेखील तुमच्यासारखीच गावकुसाबाहेर जगतील, त्यांना जगण्याचा अर्थच समजणार नाही, हे कळवळून सांगितलं आणि काहीसा अनुकूल परिणाम होतोय, हे त्याच्या लक्षात आलं. पालकांचीही परवानगी मिळाली आणि रस्त्यापलीकडेलाच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन तो तेथील शिक्षकांना भेटला; पण भटक्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी कुणी फारसं उत्सुक नसल्याचं त्याला जाणवलं. मग तो पुन्हा पालाच्या वस्तीवर आला. या मुलांना शिकवण्याची आपली तयारी आहे, मी इथे येऊन मुलांना शिकवत जाईन, असा शब्द त्याने दिला. काहीशा अविश्वासानं, पण बदलायला हवं हे पटल्यामुळे पालावरच्या पोरांच्या आईबापांनी महेशला परवानगी दिली.

अशा तऱ्हेने पालावरची पहिली वस्तिशाळा सुरू झाली. मग पालकांशीही संवाद सुरू झाला. अनेक कुटुंबे दहापंधरा वर्षांपासून तेथेच पालं ठोकून वास्तव्याला आहेत. अशा जवळपास २६ कुटुंबांना रेशन कार्ड, आधार कार्ड, वास्तव्याचे दाखले मिळवून देण्यासाठी मदत केली आणि पालकांना महेशविषयी विश्वास वाटू लागला. वस्तीनं महेशला आपलं मानलं होतं. विश्वासाचं एक वेगळं नातं तयार होऊ  लागलं होतं. बघता बघता वस्तीवरच्या शाळेत २५-३० मुलं दाखल झाली. महेशदादा यायच्या वेळी तयार होऊन शाळा सुरू व्हायची वाट पाहू लागली. मुलांची व्यसनं संपली. पालावरची एक मुलगी कमालीच्या अशक्तपणामुळे सतत आजारी असायची. शरीर दिवसागणिक खंगत चालले. कृश होऊ  लागले. तिला रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महेशने रोटरीसारख्या संस्थांशी संपर्क साधून तिच्यावर उपचार करण्याची गळ घातली. त्यांच्या मदतीने त्या मुलीचा जीव वाचला, आणि वस्तीने महेशदादाला स्वीकारले. तरीही वस्तीला अशा तात्पुरत्या मदतीपेक्षा, गावकुसाबाहेरून उचलून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, हे ओळखून शाळेचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. आता वस्तिशाळेला तीन वर्षें झालीत. २५ मुलं रोज शाळेत येतात. दुसऱ्या एका शाळेत ३५ मुलं येऊ लागली. राजस्थानातून येणारा, मूर्ती विकणारा एक समाजही या परिसरात वस्ती करतो. त्यांच्या मुलांसाठीदेखील एक शाळा सुरू झाली आहे. महेशबरोबर आता त्याची पत्नी विनया हीदेखील पूर्णवेळ या कामात खांद्याला खांदा लावून सहभागी झाली आहे. मुलांना दुपारचे जेवणही शाळेतच दिले जात असल्याने, पालकही निर्धास्त झाले आहेत. शिवाय, मुलांच्या घरासाठी महिना-दोन महिन्यांकाठी गहू-ज्वारी दिली जाते. दोन कार्यकर्तेही महेशदादाचा शब्द झेलायला तयार असतात. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातली, अशा कामासाठी खारीचा वाटा उचलायची इच्छा असलेली अनेक माणसं महेशनं जोडली आहेत. याशिवाय, लहानमोठय़ा स्वरूपात, आपापल्या ताकदीनुसार काम करणाऱ्या व्यक्ती- संस्थांचं जाळंही महेशनं गुंफलंय. त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे जाळं स्पष्ट दिसतं. रचनात्मक कामाचा एक आराखडा सतत विकसित होताना दिसतो.

भटक्या समाजातल्या या मुलांचं विश्व या कामातून उलगडू लागलं. इतर अनेक कुटुंबांना ज्या गोष्टी अगदी सहज मिळतात, त्या गोष्टी या मुलांच्या स्वप्नातदेखील नशिबी नसतात, याची जाणीव एका अगदी लहानशा प्रसंगातून महेशला एकदा झाली. पुण्याच्या सिम्बॉयसिस संस्थेत एकदा महेश आणि त्याच्या पत्नीला कोणत्या तरी कार्यक्रमाचे निमंत्रण होते. त्याने आयोजकांना विचारून वस्तिशाळेतल्या दोन मुलांनाही आपल्यासोबत घेतले, आणि गाडीतून प्रवास सुरू झाला. मागच्या सीटवर बसलेली ती दोन मुलं खिडकीच्या काचेतून ज्या नजरेनं मागे सरकणारं जग न्याहाळत होती, ते पाहून महेशचं मन अक्षरश: विव्हळलं. झाडं-डोंगर, रस्ते तर आम्ही बघितलेच आहेत. पण गाडीतून पहिल्यांदाच पाहायला मिळतायत, हे त्या मुलांचे शब्द थेट हृदयात घुसले, आणि त्याने ठरवलं- यापुढे कुठेही प्रवासाला जायचं असेल तर मुलांनाही सोबत घ्यायचं. मग वेगवेगळ्या ठिकाणी मुलं सोबत येऊ  लागली. प्रवासाच्या अनुभवातून, तेथे होणाऱ्या भेटीगाठींमधून मुलांचं भावविश्व विस्तारू लागलं. झकपक कपडे घातलेल्या माणसांना पाहून बुजणारी, त्यांना घाबरणारी मुलं धीट झाली. मोकळेपणाने, विश्वासाने बोलू लागली. पालाची वस्ती आणि वेशीआतली वस्ती यांच्यात संवाद साधण्याचं एक साधन हळूहळू विकसित होतंय, या समाधानानं महेश आणि त्याच्या पत्नीला हुरूप येत होता. त्या मुलांना आयुष्यात जे मिळालं नाही, ते जर सहज देता येत असेल तर देत जायचं, असं या जोडप्यानं ठरवलं, आणि मुलांना सहलीच्या अनुभवाबरोबरच जगण्याच्या अनुभवाची शिदोरीही मिळू लागली.

आता महेशदादाचं विश्व या मुलांच्या विश्वातच सामावलं आहे. पुण्याला झेड ब्रिजखाली तेथील भटक्या समाजाच्या मुलांसाठी ‘ग्रीन सिग्नल’ नावाची एक शाळा अगदी कालपरवापासूनच सुरू झालीय. त्या मुलांनाही समाजाच्या प्रवाहात आणायचा संकल्प महेश निंबाळकरने सोडला आहे. भीक मागण्यासाठी भर उन्हातान्हात अनवाणी पायांनी चालणारी मुलं पाहून कधीतरी त्याचं मन कळवळलं. अनवाणी चालण्यातले चटके अनुभवायची वेळ आपल्या घरातील मुलांवर आली तर काय वाटेल, असा सवाल त्याला अस्वस्थ करू लागला, आणि या मुलांसाठी त्याने आवाहन केलं- ‘चप्पलदान करा!’ मग अनेक हात पुढे झाले आणि अनवाणी चालणाऱ्या मुलांच्या पायात चप्पल आल्यावर खुललेले चेहरे पाहून त्याचा आनंद महेशदादाच्या चेहऱ्यावर अधिक उजळला. आता गावाकडल्या पालावरच्या वस्तीची दिवाळी साजरी करण्यासाठी महेश प्रयत्न करतोय. या वस्तीत पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरील त्याच्या ग्रुपवर वेगवेगळ्या कल्पनांची देवाणघेवाण सुरू झाली आहे. महेशनं ‘अजित फाउंडेशन’ नावानं सुरू केलेल्या या कामांच्या साखळीतील पहिले ‘स्नेहग्राम’ आता येत्या दिवाळीत या नव्या संकल्पनांनी उजळणार आहे. भटके जीणे कुणाच्याही नशिबी येऊ  नये, या अशा जगण्याचा शेवट व्हावा आणि भटक्यांचं जग समाजात स्थिर व्हावं, असे स्वप्न महेशच्या शब्दाशब्दांतून एखाद्या निर्मळ झऱ्यासारखं वाहताना आपल्याला स्पष्ट जाणवत असतं..

दिनेश गुणे -dinesh.gune@expressindia.com