25 February 2021

News Flash

मैना राणी चतुर शहाणी…

गैरसमज असा असतो की, मैना म्हणजे पोपटाची पट्टराणी.

आसमंतात समंजस शांतता असेल, ढॅण्चिक उत्सव नसेल, तर अंगणातले उन्हाचे पावसाचे थेंब वेचायला साळुंक्या येतात. कुणाला सांगू नका, पण त्यातली मैनेची एक जोडी माझ्याच पडवीच्या आसऱ्याने राहते. भाडं कसं मागणार त्यांच्याकडे? आत्ता कुठे त्यांचं लग्न झालंय! चार दिवस फिरू  दे त्यांना!

गैरसमज असा असतो की, मैना म्हणजे पोपटाची पट्टराणी. छे! अजिबात नाही. चुकीचा पारंपरिक समज आहे तो.

मैना म्हणजे साळुंकी. त्या मैनांचे प्रकारही अनेक. पहाडी मैना तर नकलाही करते. हसल्यासारखा आवाजसुद्धा काढते. त्यामुळे बापडीला पिंजऱ्याची जन्मठेप मिळते.

सडपातळ बांधा टिकवणारी ‘पवई मैना’ तुम्हीही पाहिली असेल. नर कुठली, मादी कुठली काय चटकन कळतच नाय. मलबारी मैना, ब्राह्मणी मैना, तिलोरी मैना, पळस मैना, गंगा मैना, हुडी मैना हा रानावनातला गोतावळा इंटरनेटच्या जाळ्यात तुम्ही पकडू शकता.

माझ्याशी लाडीगोडी करते ती मात्र आम्हा कोकणी माणसांसारखी साधी साळुंकी! ‘गुलगुल’ हे तिचं नाव. विख्यात गायिका प्रभाताई अत्रे लहान मुलांच्या ब्रॉडकास्टसाठी गायला ‘गंमत जंमत’ विभागात गेल्या, तेव्हा काही क्षण त्यांनी हे नाव धारण केलं होतं; असं एस. एन. डी. टी.मधल्या माझ्या सहकारी प्राध्यापिका सरला भिडे सांगायच्या.

फार फार पूर्वी रेडिओच्या ‘वनिता मंडळा’त ‘नयना’ आणि ‘मैना’ अशी जोडीही निवेदन करायची. कमलिनी विजयकर व शशी भट यांची ती पेअर होती. नंतर लीलावती भागवतांकडे ‘चार्ज’ आल्यावर त्यांनी ‘ताई’ आणि ‘माई’ ही रूपं आणली. शशी भट यांचं अकाली निधन झाल्यामुळे रेडिओचे श्रोते हळहळले हीसुद्धा सत्यकथाच. निसर्गसृष्टीतली मैना काडी काडी गोळा करणारी कष्टाळू गृहिणी आहे. चतुर व शहाणी आहे. प्रसंगी ती भांडकुदळ होते. सर्पालाही नडते, पण स्वत:चा एक ‘सपोर्ट- ग्रुप’ कायम ठेवते. थव्यात राहते. मी ‘एस. एन. डी. टी.’त शिकवताना मुलींना हेच सांगायचो की, अन्यायावर गटागटाने तुटून पडायचं असतं. एकटीदुकटीचं ते काम नाही!

चोचीत चोच घालणारी, कायम लव्ह करणारी अशी मैनेची मुळी प्रतिमाच नाही. तोंडात विडा घेऊन जणू फिरणाऱ्या रंगेल राघूशी ‘हाय, हॅलो’पुरतीच तिची ओळख आहे. त्यापलीकडे लळीत नाही. तिचा हक्काचा मैनोबा असताना ती कशाला मिठ्ठ मिठ्ठला दाद देतेय! गेला उडत!!

मी आजही रेडिओ ऐकतो व अचानक (मैना राणी, चतुर शहाणी सांगे गोड कहाणी) गाणं हवेत तरंगू लागतं. वळचणीच्या साळुंकीलासुद्धा त्या गाण्याचं कोण कौतुक?.. असं फक्त मला वाटतं. माझा शिष्य गणेश हसतो व म्हणतो, ‘सर, काय हे! साळुंकीला कसं गाणं कळेल? तुम्हीपण ना’.. गणेश सकपाळा, बाळा, ‘तरलता’ या विषयावर मी आत्ता बोलत नाही, पण एखाद्या शिक्षकाला राहू दे की जरा स्वप्नाळू निरागस!

कृष्णा कल्लेच्या आवाजातलं ते गाणं संपलं की पडवीतली साळुंकी पुन्हा पोटापाण्यासाठी उडून जाते.

तिचा प्रपंच, तिचा निवास सुखरूप नाही. रात्री तिथपर्यंत ‘चंद्रकांडर’ पोहोचली, तर मला कसं कळणार? सर्पाची सावली स्वप्नं पाहणाऱ्या पाखरावर कधीही पडू शकते. जग विष पेरणारं आहे.

मैने, तू ऊन-पावसात सदा सावध रहा! परवाच, कोवळ्या दुनियेची ससाण्याने माळरानावर दुर्दशा केली. काही पिसं तेवढी फाटक्या कपडय़ांसारखी सापडली. त्या चिंधडय़ा चिंध्या बघायलासुद्धा दाभोळ रस्त्यावरून धावणाऱ्या पॉश लोकांना वेळ नाही.. पण मैने, मी तुझ्यासारखाच गायगरीब आहे. सामान्य आहे. आपणच एकमेकांची सुखदु:खं समजून घेतली पाहिजेत. गरुडाला देऊ दे विमानाशी टक्कर. आपलं अंगण िरगण आपण सांभाळू या. आकाशाचा भ्रम नकोच आपल्याला!  ‘मैना’ हा शब्द मी प्रथम, कधी ऐकलात? जोशीबुवांच्या ‘चिमणराव’मध्येच बहुतेक! ‘मैना’ ही ‘राघू’ची बहीण असणं हे मला आजही छान, निष्पाप वाटतं. ‘गोपाळकृष्ण’मधला कान्हा राधेला चित्रपटात ‘माई’ अशी गोड हाक मारतो, तसंच ते!

घरसंसार राखणाऱ्या काटकसरी मैनेचं सामान्यपण भरजरी, रुपेरी चंदेरी नसेल, पण स्वभावधर्म, जिद्द, वात्सल्य याच गोष्टी प्रपंचाला आकार व आधार देतात ना? दुसऱ्याकडून अंडी उबवून घेणारी कोकिळा हवी कुणाला? शहाणी मैनाच सून म्हणून यावी. खरंय ना रावसाहेब?
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:09 am

Web Title: maina
Next Stories
1 निष्पर्ण रानातलं स्वातंत्र्य…
2 नातीची आजी!
3 डल मुलाची डायरी
Just Now!
X