सुनीता कुलकर्णी

करोनाकहराने लोकांना इतकं छळलं आहे की लसीची ‘दिलो जान से’ प्रतीक्षा सुरू होती. आता सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅस्किन या दोन लसी देशभरात ठिकठिकाणी पोहोचायला सुरूवात झाल्यावर या आनंदवार्तेचं स्वागत नेटिझन्सनी आपल्या खास पद्धतीने करायला सुरूवात केली आहे.

एखाद्याचं स्वागत करायची पारंपरिक पद्धत म्हणजे रांगोळ्या घालायच्या, फुलं उधळायची, ओवाळणी करायची, सनई- चौघडे वाजवायचे, स्तुतीसमुनं उधळायची. ऑनलाइन विश्वात असं वाजतगाजत स्वागत केलं जातं ते मीम्स, विनोद, पोस्ट यांच्या आधारे. कोवीशील्ड आणि कोवॅक्सिनला नेटिझन्सनी आपल्या या खास पद्धतीने सलामी दिली आहे. त्यासाठी ट्वीटरवर एक वेगळाच ट्रेण्ड व्हायरल झाला आहे. आपल्या देशी पदार्थांमधून करोनाची लस कशी देता येईल याची नेटिझन्स गमतीशीर चर्चा करत आहेत.

याची सुरूवात केली एका मुंबईकराने. त्याने लिहिलं, करोनाची लस वडापावच्या पावात घालून द्या म्हणजे दुपारपर्यंत सगळ्या मुंबईचं लसीकरण होईल. ही कल्पना देशभरात अनेकांना आवडली आणि त्यापासून स्फूर्ती घेत त्यांनी आपापलं प्रादेशिक वैशिष्ट्य असलेल्या खाद्यपदार्थांचं आख्यान लावलं…

-लस उंधियु आणि चिक्कीत घालून द्या आणि मग बघा १६ जानेवारीच्या आत सगळ्या गुजरातचं लसीकरण होईल.

-मोमोमध्ये घालून लस द्या तर एका दिवसात सगळी दिल्ली लसीकृत होईल.

– प्रोटीन पावडरमध्ये घालून लस द्या. म्हणजे मग सगळ्या फिटनेस प्रेमींचं लसीकरण होऊन जाईल.

-लस बिर्याणीत घालून द्या. म्हणजे सगळ्या देशाला आपोआपच लस मिळेल.
– लिट्टी चोखामध्ये लस घालून द्या म्हणजे सगळ्या बिहारला ती लगेच मिळेल.
– मॅगीमध्ये लस घालून द्या म्हणजे दोन मिनिटात सगळ्या देशाचं लसीकरण होईल.

– पाणीपुरीत लस द्या म्हणजे दिल्ली लसमय झालीच.

– मिसळीत घालून लस द्या म्हणजे झालंच सगळं पुणं करोनामुक्त.

– छेनापोडामधून लस द्या म्हणजे सगळ्या ओडिशाचं लसीकरण होईल.

– तर्री पोह्यात लस घालून द्या म्हणजे झालाच नागपूर करोनामुक्त.

– कबाबमधून लस दिली तर सगळ्या लखनौचं लसीकरण होईल.
– ओल्ड माँकमधून लस द्या म्हणजे विकेंडला होईलच सगळ्या देशाचं लसीकरण.
नेटिझन्सची ही गंमत तेवढ्यापुरती ठीक आहे. नाहीतर भारतातल्या सगळ्या प्रादेशिक वैशिष्ट्यांची चव चाखून करोना बेटा आणखी गब्बर न होवो म्हणजे मिळवली.
समाप्त