मनोज वैद्य, बदलापूर

शेवट कसा गोड झाला ! शिवसेना -भाजपचे मतदार आणि कार्यकर्ते असे म्हणतील, पण मग पावणे पाच वर्षे एकमेकांवर इतके घाणेरडे आरोप केले गेले, मर्यादा सोडून नेत्यांचे वस्त्रहरण केले गेले त्याचे काय? असा प्रश्न त्यांच्या मनात येणार नाही असे कशावरुन ? त्यांना कितपत गृहीत धरता येईल हासुध्दा एक प्रश्नच आहे. त्यांचे मन व मेंदू जणू काही तेज हारपिकने धुतले जावून स्वच्छ व निर्मळ होतील का?
किरीट सोमय्याने शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या मातोश्रीवर केलेले घाणेरडे आरोपांची मळभ शिवसैनिक विसरतील, तर नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांनी पहारेकरी चोर आहे असे थेट म्हटले होते ते भाजपचे कार्यकर्ते विसरतील का हा सुध्दा प्रश्नच आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना – भाजपचा कार्यकर्ता हा विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून विकसित झाला आहे. तो कायम संघर्षाच्या भूमिकेतून पुढे आला. स्थानिक पातळीवर तो सत्तेत आला , पण राज्यस्तरीय सत्तेत त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे विशेषतः शिवसैनिक हा नेहमीच आक्रमक असतो. त्यातूनच तो भाजपच्या राज्याच्या व केंद्रातील सत्तेविरोधात उघडपणे उभा राहिला.

समाजमाध्यमावर निष्क्रिय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा अधिक त्वेषाने शिवसैनिक मोदी सरकारविरुध्द लढत होता. नाक्या-नाक्यावर तो मुद्दे मांडून युक्तीवाद करत होता. शिवसेनेच्या मतदारांपर्यंत मोदी व फडणवीस सरकारचे बाभाडे काढत होता.

शिवसेनेची प्रकृती राजकारणाची नाही. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणुकीमुळे तो राजकारणी २० टक्के आहे, बाकी समाजकारणी असतो. शिवसैनिक आत-बाहेर करत नाही, जे राजकारणात आवश्यक आहे.

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर वितुष्ट टोकाला गेले आहे. लोकसभा निवडणुका सुमारे ४५ दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे या दोन पक्षांतील कार्यकर्त्यांचे मनोमिलन किती लवकर होईल यावर सारे अवलंबून आहे. जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे शिवसैनिक कितपत क्रियाशील होईल हा एक प्रश्नच आहे.

सध्याची युतीचे स्वरुप असे राहील की, तुमचा उमेदवार आहे तर आम्ही मदत नाही केली तरी विरोधात मात्र काम करणार नाही, असे सेना-भाजपचा किमान समतोल राहील.

एकमेकांचे मतदान ट्रान्सफर कसे होईल यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्न करतील, एवढीच ही युती आता असेल. कारण सेना-भाजपचा संसारात आता ” राम “राहीला नाही. एक आदर्शवादी जोडप्याकडून यांचा लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंतचा हा प्रवास आहे.  सत्तारुपी “अपत्य” हे या दोघांचे एकत्र येण्यामागचे मुख्य कारण आहे. हिंदुत्वाच्या प्रणयाचे नाटक राहिले आहे. रोमँटीक काळ कधीच संपला आहे, फक्त भांड्याची आदळआपट उभ्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या व्यूहनीतीमधून ज्याला मी ” उद्धवनीती ” म्हटले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यावर चांगलेच यश मिळाले आहे. भाजपला झुकवून त्यांनी चांगल्याच जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यासाठी त्यांनी सत्तेत राहून विरोधी पक्षाची जागा व्यापून ठेवली होती. परंतु आता मात्र निवडणूकीत विरोधकांच्या प्रचारात सत्तेतील साथीदार म्हणून तोंड द्यावे लागणार आहे. समाजमाध्यमावरुन त्यांच्या भाजपच्या विरोधातील भाषणाचे व्हिडिओ शिवसेना मतदार व शिवसैनिकांसाठी अडचणीचे ठरणार आहेत.

महाराष्ट्रात शरद पवार या निवडणुका करो या मरो या निर्धाराने लढण्याची शक्यता आहे. केंद्रामध्ये अधांतरित सरकार आले तर त्यांना पंतप्रधानांचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. प्रचारात या मुद्द्यावर राष्ट्रवादीने भर दिल्यास महाराष्ट्रात त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल असे दिसते आहे. त्यातच मनसेने राष्ट्रवादीसोबत युती केल्यास मराठी माणसाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठीच्या मुद्द्याला बळ मिळेल, परिणामी शिवसेना-भाजपला धक्का बसू शकतो.

पुलावामा प्रकरणात यावर राजकारण करु नका, या भाजप पुरस्कृत मोहिमेला काँग्रेस बळी पडली आहे. त्यामुळे ४० जवानांच्या बलिदानाला जबाबदार कोण हा प्रश्न मागे पडला आहे. एकीकडे राहूल- प्रियंका यावर नीतीमत्तेचे राजकारण करत आहेत, तर मोदी-शहा यावर जाहीर सभांमधून थेट वक्तव्य करुन लोकांना मतांसाठी चेतवत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत भाजपला सगळ्यात मोठी आशा पुलावामा स्फोट प्रकरणी, जर पंतप्रधान मोदी यांनी मागच्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे एखादी लष्करी कारवाई पाकिस्तानवर केली आणि त्याचे मार्केटींग व्यवस्थित झाले तर देशातील युवकांचे बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राफेल भ्रष्टाचाराचे मुद्दे मागे पडतील आणि स्यूडो राष्ट्रवादाच्या भडक वातावरणावर मोदी स्वार होऊ शकतात.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा भाजपसाठी खुपच महत्त्वपूर्ण आहेत. शिवसेनेशी पडती बाजू घेत युती करुन भाजपने उसासा सोडला आहे. त्याचवेळेस हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है, असे उद्धव ठाकरे म्हणू शकतात.

पण या दोन्हीही पक्षांचे गल्ल्ली बोळातील कार्यकर्ते रॅप बॅटलच्या मूडमध्ये आहेत, ते त्यातून बाहेर कसे येतात आणि किती वेळात येतात यावर युतीचे यश अवलंबून आहे.

कालपर्यंत तरी ते अपना टाईमभी आयेगा…असे म्हणत होते. एकमेकांना दंड-बेंडकुळ्या दाखवत होते. भाजपला आता मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. त्यामुळे शिवसेनेला इतके काही अडलेले नाही ते म्हणू शकतात, तू नंगा ही तो आया था, क्या घंटा लेकर जाएगा ….