News Flash

गल्लोगल्लीच्या मिसळ कॉर्नर्समुळे अस्सल मिसळीवर संक्रात

... यांच्या खालोखाल सगळ्यात जास्त व्हायरल होतं तर मिसळ खाण्याचे अड्डे असं निरीक्षण आहे.

– एक मिसळप्रेमी

मिसळ हे महाराष्ट्राला पडलेलं झणझणीत स्वप्न आहे यावर काही दुमत नसावं. मुंबईतल्या, पुण्यातल्या इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या चविष्ट मिसळगृहांच्या याद्या व्हॉट्स अपवर व्हायरल होत असतात. गणेशोत्सवात लालबागचा राजा नी निवडणुकांच्या मोसमात शिवाजी पार्कचा राजा यांच्या खालोखाल सगळ्यात जास्त काय व्हायरल होत असेल तर मिसळ खाण्याचे अड्डे असं काहींचं निरीक्षण आहे. मिसळीची उपासना मराठी घराघरामध्ये इतक्या प्रमाणावर होते, की त्याची लागण आता शेजारपाजारच्या अमराठी घरांमध्येही झाल्याची बघायला मिळते. माटुंग्याच्या एका मद्रासी हॉटेलात चक्क साउथ इंडियन मिसळ हा खाद्यप्रकार जन्माला आला असून सांबारबरोबर दाक्षिणात्य पद्धतीचं फरसाण वगैरे घालतात ते. माझ्या माहितीत एक व्यक्ती अशी आहे जी मिसळ म्हटलं की कधी, कुठे, कोणी, का, कशाला वगैरे एकही प्रश्न न विचारता फक्त येऊ द्या म्हणतो. त्याला कशी आहे असं विचारलं की त्याचं उत्तर असतं, मिसळ ही सत्यनारायणाच्या प्रसादासारखी असते, चव नाही विचारायची समोर आली की तोंडात ढकलायची…

तर आता तुम्ही म्हणाल हे गल्लोगल्ली आडव्या तिडव्या पसरलेल्या मिसळीच्या हाटेलांमुळे खुश होऊन हे लिहित असेन. पण वस्तुस्थिती अगदी उलट आहे. कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या गल्लोगल्ली उघडलेल्या या मिसळ कॉर्नरींनी मिसळीचा जो एक्सक्ल्युझिव्हनेस होता तोच घालवून टाकलाय की काय अशी मला भीती वाटतेय. आज जसा कुणीही उठतो नी हापूस आंब्याच्या पेट्या विकायला बसतो… हापूस, पायरी नी रायवळ या कोकणातल्या खऱ्या तीन अव्वल आंब्याच्या जाती ज्यांना माहित नाहीत ओळखता येत नाहीत असे महाभागही बिनधास्तपणे देवगड हापूस रत्नागिरी हापूस असं बोंबलत गल्लोगल्ली फिरत असतात. अनेकदा ना आंब्याला चव असते ना दरवळ असतो. त्यांनी जशी हापूसच्या काहिशा दुर्मिळ, काहिशा वाट बघायला लावणाऱ्या, पण पहिल्यांदा आंबा खाल्यावर मिळणाऱ्या स्वर्गसुखाची काशी केलीय तशीच काशी गल्लोगल्ली पसरलेल्या मिसळवाल्यांनी केलीय.
अगदी असाच भेसळीचा मामला, कमअस्सल माल गळ्यात बांधण्याचा प्रकार मिसळीच्या बाबतीत होतोय. बऱ्याच ठिकाणी गल्लोगल्ली मिसळ मिळते हे चांगलं लक्षण नसून मिसळीत भेसळ होत असल्याचं लक्षण आहे. एकदा मॅटर्निटी होममध्ये एक डुकरीण नी वाघीण गप्पा मारत असतात. डुकरीण वाघिणीला चिडवते, सोनोग्राफीत कळलंय की मला ११ मुलं होणारेत, नी तुला फक्त दोन. वाघिण मान फिरवते नी म्हणते खरं आहे, माझी मुलं वाघ होणारेत नी तुझी डुकरं! अगदी हाच प्रकार होतोय, मिसळीच्या बाबतीत. मोजकी असावीत पण दर्जेदार असावीत.

एक मोठा बुद्धीभेद या मिसळकर्त्यांच्या मनात आहे, तो म्हणजे उसळीत फरसाण घातलं की मिसळ होते. अरे रताळ्यांनो इतकं सोपं असतं का ते? कुठल्याही आंब्याला पिळला तर काय हापूसचा रस पडणारे का बाहेर… अरे तर्री, रस्सा, कट म्हणजे उसळ नाही… अंगाप्रत्यांगाला एक हलकासा झटका देत, काना-कपाळावरून घामाची रेष ओघळली तरी रश्याच्या तवंगाला आणखी थो़डा म्हणत दाद देणाऱ्या खवय्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते; जेव्हा उसळीमध्ये फरसाण टाकून ती मिसळीच्या नावाखाली विकली जाते. प्रत्येक लज्जतदार मिसळीची कूळकथा तिच्या जन्मासाठी घातलेल्या व्यंजनांमध्ये असते. कोथिंबिरीचा दणका आहे का, कडीपत्ता किती आहे, वाटाणा हिरवा आहे की पांढरा, मटकी चांगली भिजली होती का, केवळ तिखटाचा भडीमार करून कैलास जीवनचा धंदा न वाढवता मसाल्याच्या अचूक ज्वालाग्राही पेरणीनं झणझणीतपणा आलाय की नाही, मिसळ हा मुख्यधंदा आहे की किराणाच्या दुकानात सगळंच मिळतं त्याप्रमाणे इथं मिसळपण मिळते असा मामला आहे. मिसळ खाल्यावर चेहऱ्यावर तृप्ततेचा हुंकार येतो की केवळ पोट भरल्याचं चाकरमानी समाधान येतं या आणि अशा असंख्य गोष्टींवर त्या त्या मिसळीचं रँकिंग ठरत असतं. परंतु केवळ फरसाणवर राईस प्लेटमधली उसळ ओतून ती मिसळीच्या नावाखाली ताटात ढकलणाऱ्यांनी आणि अशा मिसळीचं कौतुक करणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचं कधीही भरून येणारं नुकसान केलं आहे.

तर तुम्ही मिसळप्रेमी असाल तर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, अस्सल मिसळीचे कुळाचार पाळून, देवापुढे नेवैद्य ठेवावा अशी खरीखुरी मिसळ तुम्ही चाखली असेल तरच फोटो वगैरे फेसबुकवर टाका किंवा व्हॉट्स अॅपवर फॉरवर्डी करा. तसं नसेल तर तथाकथित मिसळगृहातून बाहेर पडल्यावर सगळे फोटो मुदलात फोनमधून डिलीटच करून टाका.

असा प्रश्न वरचेवर विचारला जातो की मराठी किती जगेल? हा प्रश्न फक्त मराठी माणसांनाच पडतो हे ही विशेष.. मग जोपर्यंत मराठी आडनाव लावणारी व्यक्ती आहे तोपर्यंत, अमेरिका व्हिसा देतेय तोपर्यंत वगैरे उत्तरं दिली जातात. मला वाटतं जोपर्यंत अस्सल मिसळीचं आपण जतन करू तोपर्यंत नक्कीच मराठी जगेल. अस्सल मिसळ जगवा! मराठी जगवा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 5:16 pm

Web Title: misal hotels on every corners have lost charm of misal
Next Stories
1 महाराष्ट्रवादी नवनिर्माण सेना; नवे राजकीय समीकरण?
2 Blog : या निवडणुकीत तब्बल १४ कलाकार झाले खासदार
3 BLOG: अतर्क्यतेचा महिमा वर्णावा किती?
Just Now!
X