प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाचा लिलाव नुकताच मुंबईमध्ये पार पडला. सहाव्या हंगामात खेळाडूंना कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या गेल्या. मात्र ज्या खेळाडूंनी बोलीमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणं पार केली, मैदानात त्यांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. याऐवजी नवीन खेळाडू सहाव्या हंगामात चमकले. त्यामुळे सातव्या हंगामात संघमालक बोली लावताना हातचं राखून बोली लावतील असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. ……आणि झालंही तसंच ! सिद्धार्थ देसाई आणि नितीन तोमर यांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूने एक कोटींचा पल्ला गाठला नाही. तेलगू टायटन्सने सिद्धार्थ देसाईसाठी सर्वाधिक १ कोटी ४५ लाख रुपये बोली लावली. तर पुणेरी पलटणने नितीन तोमरला १ कोटी १२ लाखांमध्ये आपल्या संघात कायम राखलं. सिद्धार्थ देसाईने सहाव्या हंगामात यू मुम्बाकडून खेळत असताना मैदान गाजवलं होतं. त्यामुळे यंदा त्याच्यावर किती बोली लागते याकडे सर्वांचं लक्ष होतं. अपेक्षेप्रमाणे सिद्धार्थने १ कोटींचा टप्पा पार केलाही, मात्र यापुढे त्याच्यासमोरची आव्हानं मोठी असणार आहेत.

अवश्य वाचा – कोल्हापूरचे देसाई बंधू तेलगू टायटन्सच्या ताफ्यात, संघाची सिद्धार्थपाठोपाठ सूरजलाही पसंती

सहाव्या हंगामात सिद्धार्थ देसाई यू मुम्बाचा एकखांबी तंबू होता. साखळी सामन्यांमध्ये कोणत्याही प्रथितयश खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या मुम्बाने सर्वांचा चकीत केलं. मात्र मुम्बाच्या चढाईची सर्व जबाबदारी ही सिद्धार्थने एकट्याच्या खांद्यावर सांभाळली. सहाव्या हंगामात सिद्धार्थला साथ देण्यासाठी अभिषेक सिंह, रोहित बालियान, दर्शन कादियान यासारखे खेळाडू होते, मात्र यांच्या कामगिरीतलं सातत्य हा मोठा प्रश्न होता. त्यातचं सिद्धार्थ मधल्या काळात दुखापतग्रस्त झाल्यानंतर यू मुम्बाची उडालेली दाणादाण आपण सर्वांनी पाहिलेली आहे. साखळी फेरीत अव्वल राहिलेला संघ, पात्रता फेरीत पहिल्याच फटक्यात स्पर्धेबाहेर फेकला गेला. एका खेळाडूवर अवलंबून राहिलेला संघ मोक्याच्या क्षणी माती खातो हा इतिहास आहे. यू मुम्बाने सहाव्या हंगामात या इतिहासाची पुनरावृत्ती केली.

आता इकडे जयदेव उनाडकटचा संदर्भ का देतोय असा अनेकांना प्रश्न पडला असेल. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळमारा जयदेव उनाडकट हा कोट्यवधींचा मालक बनला आहे. सहाव्या आणि सातव्या हंगामात सौराष्ट्राच्या जयदेववर राजस्थानने सर्वाधिक बोली लावत त्याला महागडा खेळाडू बनवलं. २०१८ च्या हंगामात जयदेववर राजस्थानने ११.५ कोटी रुपयांची बोली लावत त्याला सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनवलं होतं. तर यंदाच्या हंगामातही राजस्थानने जयदेवसाठी ८.४ कोटी रुपये मोजले.   साहजिकपणे एखाद्या खेळाडूसाठी एक संघ कोट्यवधी रुपये मोजते, त्यावेळी सर्वांच्या त्या खेळाडूकडून अपेक्षा वाढतात. कोट्यवधी रुपयांची बोली लावूनही जयदेव उनाडकटची कामगिरी चांगली झाली नाही, यावेळी आपल्यावर सर्वात महागडा खेळाडू ठरल्याचं दडपण होतं असं जयदेवने सांगितलं होतं. सिद्धार्थ देसाईने सातव्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा मान पटकावला आहे. मात्र तेलगू टायटन्स संघाची रचना पाहता, सिद्धार्थ देसाईचाही जयवेद उनाडकट होऊ नये अशी भीती वाटायला लागली आहे.

अवश्य वाचा – …आणि नाचायलाच लागलो, कोट्यवधी रुपयांच्या बोलीनंतर सिद्धार्थ देसाईची पहिली प्रतिक्रीया

संघाची बचावफळी भक्कम करत असताना तेलगू टायटन्सचं संघ व्यवस्थापन चढाईपटूंची फळी उभी करायला विसरले आहेत. सिद्धार्थ देसाई, त्याचा भाऊ सुरज आणि राकेश गौडा हा नवीन खेळाडू वगळता एकही चढाईपटू तेलगूच्या खात्यात नाही. बचावफळी भक्कम करताना तेलगू टायटन्सने विशाल भारद्वाज, कृष्णा मदने, सी.अरुण, अबुझार मेघानी या खंद्या खेळाडूंना संघात जागा दिली. त्यामुळे संघाच्या चढाईची सर्व जबाबदारी ही पुन्हा एकदा सिद्धार्थ देसाईच्या खांद्यावर येणार आहे. सहाव्या हंगामापर्यंत राहुल चौधरी हा तेलगू टायटन्सचा ‘पोस्टर बॉय’ होता. त्याच्या जोडीला महाराष्ट्राचा निलेश साळुंखे आणि इराणचे काही खेळाडू होते. प्रो-कबड्डीच्या इतिहासात तेलगू टायटन्सचा संघही राहुल चौधरीवर अवलंबून असलेला पहायला मिळाला. राहुल चौधरी ज्या दिवशी फॉर्मात असेल तेव्हा संघ भल्याभल्यांना पाणी पाजायचा, मात्र ज्या दिवशी राहुलचं तंत्र बिघडलं त्या दिवशी तेलगू टायटन्सने सडकून मार खाल्ला आहे.

एका खेळाडूवर अवलंबून राहणं हे कोणत्याही सांघिक खेळामध्ये दुर्दैवी मानलं जातं. यंदाच्या हंगामात सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने तेलगू टायटन्स चढाईमध्ये पुन्हा एकदा सिद्धार्थवर अवलंबून असणार आहे. सहाव्या हंगामात सिद्धार्थने खोऱ्याने गुण मिळवले असले तरीही सर्व संघांना सिद्धार्थचा खेळ आता माहिती झाला आहे. प्रो-कबड्डीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर व्हायला लागल्यापासून प्रत्येक खेळाडूचे बारकावे प्रतिस्पर्धी संघ टिपू शकतो. सिद्धार्थच्या खेळामध्ये एका वेगळ्या प्रकारची उर्जा आहे, पण त्याला बाद करणं हे काही कठीण नाहीये. त्यामुळे सातव्या हंगामात संघाची कमान सांभाळायची असल्याच सिद्धार्थचं मैदानावर टिकून राहणं गरजेचं बनणार आहे. सिद्धार्थचा मोठा भाऊ सूरज हा देखील तेलगू टायटन्सच्या संघात असणार आहे. यासोबत नवोदीत राकेश गौडाचीही त्यांना साथ असणार आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना वातावरणाशी जुळवून घेण्यात नक्कीच वेळ जाईल. अशावेळी संघाला पुन्हा एकदा सिद्धार्थवर अवलंबून रहावं लागणार आहे.