मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण खूप तापले आहे. शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही याकडे काहींचे लक्ष आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपली मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. मनसेनेही कंबर कसली असून औरंगाबाद महापालिकेत सर्वांना धक्का देणाऱया एमआयएम पक्षानेही मुंबई महापालिकेसाठीची तयारी सुरू केली आहे. एमआयएमने नुकतेच मुंबई महापालिकेसाठीची आपली पहिली १८ उमेदवारांची यादी जाहीर केले. एमआयएमच्या या १८ जणांच्या यादीत भारताचा क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या मेहुण्याचाही समावेश आहे.

युसूफचा मेहुणा उमर साद याला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक २०८ मधून ‘एमआयएम’ने पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे. भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांच्या मतदार संघातून उमर साद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे खुद्द वारिस पठाण त्यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. केवळ क्रिकेटपटू युसूफ पठाण याचा मेहुणा असल्यामुळे उमर साद याला तिकीट देत नसून त्यांनी केलेल्या कामामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे यावेळी वारिस पठाण यांनी सांगितले.