scorecardresearch

‘अमृतकाळा’तील ‘निर्मला वाणी’ गीर्वाणभाषेतून..

अमृत काळ’ हा शब्द अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात तब्बल सहा वेळा उच्चारला. ‘

‘अमृतकाळा’तील ‘निर्मला वाणी’ गीर्वाणभाषेतून..
वित्त मंत्री निर्मला सीतारामन भाषण

मुंबई : ‘वसुधैवकुटुम्बकम्’ हे तत्त्व मानणाऱ्या, ‘आत्मनिर्भर’ होऊ घातलेल्या, ‘अमृत काळा’त वाटचाल करत असलेल्या भारताचा, भाजपच्या दुसऱ्या सत्ताकाळातील आपला पाचवा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इतर अर्थमंत्र्यांप्रमाणे शेरोशायरी वा कविता सादर केल्या नाहीत, तर संस्कृत शब्दांची अक्षरश: लयलूट केली, हे भाजपच्या एकूण संस्कृती प्रेमाला साजेसेच. गीर्वाणभाषा म्हणजेच देवांची मानली जाणारी संस्कृत भाषा अर्थसंकल्प सादरीकरणाच्या रुक्ष वातावरणात काहीशी हिरवळीसारखी वाटली असली तरी भाषेचे हे कारंजे की नुसताच बुडबुडा, असा प्रश्न अज्ञ-अभक्तांना पडला म्हणतात.

स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना पुढील २५ वर्षांचा रोडमॅप मांडताना पंतप्रधानांनी ज्याचा उल्लेख केला होता, तो ‘अमृत काळ’ हा शब्द अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात तब्बल सहा वेळा उच्चारला. ‘आत्मनिर्भर’ हा शब्द त्यांच्या भाषणात तीन वेळा आला. आजच्या काळात ज्यांचा खूप बोलबाला आहे, त्या भरड धान्यांचा ‘श्रीअन्न’ असा उल्लेख त्यांनी पाच वेळा केला.

भाषेच्या संस्कृतकरणाचे इतरत्र चालणारे भाजपचे प्रयोग अर्थसंकल्पात सात प्राधान्यांना ‘सप्तर्षी’च्या रूपात घेऊन आले. ‘गॅल्व्हनायिझग ऑगॅनिक बायो-अ‍ॅग्रो रिसोर्सेस’, ‘मँग्रूव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाइन हॅबिटाट्स अ‍ॅण्ड टॅन्जिबल इन्कम्स’, ‘प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन, अवेअरनेस, नरिशमेंट अ‍ॅण्ड रिस्टोरेशन ऑफ मदर अर्थ’ या योजनांच्या नावांमधील इंग्रजीच्या अवडंबराला ‘गोबरधन’, ‘मिष्टी’, ‘पीएम प्रणाम’ ही संस्कृतप्रचुर लघुनामे तर होतीच, शिवाय ‘विश्वकर्मा’, ‘मस्य संपदा’, ‘स्वदेश दर्शन’, ‘महिला सन्मान’ अशा शब्दांची अर्थमंत्र्यांच्या भाषणात रेलचेल होती. अर्थात भाजप सरकारचे हे संस्कृत प्रेम सरकारच्या दोन्ही कार्यकाळातील योजनांच्या नावांमधून नेहमीच दिसते. जनधन, स्वच्छ भारत, श्रमेव जयते, मुद्रा, उज्ज्वला, नमामि गंगे, आयुष्मान भारत, अग्निपथ, गति-शक्ती, पोषण शक्ती निर्माण, व्हॅक्सिन मैत्री, प्रधानमंत्री वय वंदना अशा संस्कृत नावांच्या अनेक योजना सरकारने आपल्या कार्यकाळात सुरू केल्या आहेत. एव्हाना जनधन, उज्ज्वला या योजनांचे धन आणि ज्वालेच्या बाबतीत काय झाले, असा मुद्दा काढून अर्थमंत्र्यांचा संस्कृत शब्दांचा भडिमार पूतनामावशीच्या प्रेमासारखा तर नव्हे ना, अशी ‘असंस्कृत’ शंका काढणारेही आहेत, परंतु संस्कृतच्या वापराने संस्कृतीरक्षण होते, हा विश्वास तेवढय़ामुळे ढळणारा नाही!

मराठीतील सर्व Budget 2023 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 02:31 IST
ताज्या बातम्या