मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण सुरूच असून गुरुवारच्या सत्रात त्याने ८५ रुपयाची पातळीही सोडली. १४ पैशांच्या घसरणीने रुपयाने प्रति डॉलर ८५.०८ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर शरणागत झाला.

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पाव टक्क्याने व्याजदरात कपात केली असली, तरी आगामी स्थितीविषयी समालोचनांत घेतलेल्या कडव्या भूमिकेमुळे अमेरिकी डॉलरला बळ मिळाले. वर्ष २०२५ मध्ये पतधोरणात सावध धोरणामुळे पूर्वसूचित चार ऐवजी दोनदाच व्याजदर कपातीचे पाऊल टाकावे लागेल, असे तेथील मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी सूचित केले. चलनवाढही इच्छित पातळीवर वर्षभरात काबूत आणणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी डॉलरच्या तुलनेत जगभरातील उदयोन्मुख देशांच्या चलनांवर दबाव निर्माण झाला आणि रुपयाच्या विनिमय मूल्याने प्रथमच ८५ ची पातळी ओलांडली.

हेही वाचा >>>‘पातकी वस्तूंवर ३५ टक्के दराने जीएसटी लादणे अविचारच’, स्वदेशी जागरण मंचाचा केंद्राला घरचा अहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सव्वा महिन्यांत १०० पैसे घसरण

गत काही दिवसांपासून रुपयाचा मूल्यऱ्हास सुरूच असून, मागील पाच आठवड्यात त्यात १०० पैशांहून अधिक तीव्र घसरण झाली आहे. देशांतर्गत भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांची वाढलेली विक्री, त्या गुंतवणूकदारांकडून निधी माघारी नेताना तसेच आयातदारांकडून वाढलेली डॉलरच्या मागणीने रुपयाच्या मूल्यावर मोठा ताण आणला. बुधवारच्या सत्रातही रुपया डॉलरच्या तुलनेत ३ पैशांनी घसरून ८४.९४ पातळीवर बंद झाला होता. मध्यवर्ती बँकेचा हस्तक्षेपानेही ही घसरण रोखता आलेली नाही.