मुंबई: परदेशी गुंतवणुकीच्या नव्या जोमाने सुरू झालेल्या ओघामुळे आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या ‘ब्लू-चिप’ कंपन्यांच्या समभागांतील खरेदीने गुरुवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी तेजीत राहिले. रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदर कपातीच्या शक्यतेने बाजारात उत्साहाचे वातावरण होते.

गुरुवारच्या सत्रात ९०० अंशांची झेप घेणारी मजल मारल्यानंतर, भांडवली बाजार नफावसुलीला बळी पडला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४३.७९ अंशांच्या वाढीसह ८१,४४२.०४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात ९१२.८८ अंशांच्या कमाईसह तो ८२ हजाराची वेस ओलांडेल अशा स्थितीत होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १३०.७० अंशांची वाढ झाली आणि तो २४,७५०.९० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.

सत्रांतर्गत उच्चांकी पातळीवर नफावसुली झाली तरी बाजार सकारात्मक पातळीवर कायम होता. कमकुवत होत चाललेला डॉलर निर्देशांक आणि अस्थिर अमेरिकी रोख्यांवरील परतावा कमी झाल्यामुळे देशांतर्गत आघाडीवर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा निव्वळ खरेदीच्या भूमिकेत गेले आहेत.

जागतिक अनिश्चितता असूनही, ‘बाय-ऑन-डीप’ अर्थात बाजार घसरणीत खरेदीचे धोरण स्वीकारण्यास गुंतवणूकदार प्रोत्साहित झाल्याचे दिसत आहे. मध्यवर्ती बँकांच्या आगामी निर्णयांची ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये युरोपीय मध्यवर्ती बँक (ईसीबी) आणि भारतात रिझर्व्ह बँकेकडूनही पाव टक्क्यांची दर कपात अपेक्षित आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, आयटीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. याउलट, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्सच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी निव्वळ खरेदीदार बनले, कारण त्यांनी १,०७६.१८ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकारात्मक जागतिक संकेत आणि शुक्रवारी रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदर कपातीच्या अपेक्षेने बाजारात तेजी होती. सलग दोन दिवसांच्या विक्रीनंतर बुधवारी परदेशी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले. नव्याने आलेल्या परकीय गुंतवणुकीमुळे बाजाराला दिलासा मिळाला. – सिद्धार्थ खेमका, संशोधन प्रमुख, संपत्ती व्यवस्थापन, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस