डॉ. आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रामस्वामी कंडस्वामी षण्मुखम् चेट्टी’ या नावाचा उल्लेख जर कुठे ऐकला असेल तर नक्की सांगा. अर्थातच स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणजे सर षण्मुखम् चेट्टी. ब्रिटिश साम्राज्याने त्यांना ‘सर’ हा दर्जा दिला होता. २६ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प चेट्टी यांनी सादर केला गेला. त्यांची अर्थमंत्री पदापर्यंतची कहाणी रंजक आहे. कारण ते कधीही काँग्रेसमध्ये नव्हते, पण तरीही भारताचे पहिले अर्थमंत्री होते. महात्मा गांधींच्या आग्रहामुळे जे लोक तत्कालीन काँग्रेसमध्ये नव्हते ते या पहिल्या मंत्रिमंडळात सामील होते त्यापैकी एक चेट्टी होते. तत्कालीन पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना मंत्रिमंडळात सामील करून घ्यायला फारसे उत्सुक नव्हते. मात्र तरीही गांधीजींच्या आग्रहाखातर त्यांना अर्थमंत्री बनवावे लागले.

गिरणी मालकांना करचोरीच्या प्रकरणाअंतर्गत तपास होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केल्यामुळे त्यांनी आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. काही ओळखीच्या लोकांची नावे त्यांनी या तपासातून वगळली असे लक्षात आल्यावर पंडितजींनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. म्हणजे कदाचित स्वतंत्र भारताचे पहिले राजीनामा देणारे मंत्री म्हणूनसुद्धा त्यांची ओळख असावी. त्यांचे योगदान फक्त एवढेच नसून त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी खूप काम केले आणि तामिळ भाषेसाठी त्यांचे योगदान अमूल्य होते. बऱ्याच तामिळ भाषेसाठीच्या संघटनांची स्थापना आणि काही संघटनांचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषवले. अन्ना मलाई या प्रसिद्ध विद्यापीठाचे त्यांनी कुलगुरू म्हणून काम बघितले. ५ मे १९५३ रोजी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

विश्लेषण: देशाच्या जमापुंजीचे गणित ठरवणारा अर्थसंकल्प कसा तयार होतो? कशी असते ही प्रक्रिया?

चेट्टी यांनी सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात १७१ कोटी रुपयांचे उत्पन्न आणि १९७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता. म्हणजे वित्तीय तूट सुमारे २६ कोटी रुपयांची होती. मागील अर्थसंकल्पातील वित्तीय तूट सुमारे ९.९० लाख कोटी रुपयांची होती. यावरून तुम्हाला त्यावेळेच्या आणि सध्याच्या अर्थव्यवस्थेची व्याप्ती लक्षात येईल. ही तूट नंतर कमी होऊन सुमारे ६ कोटी रुपयांवर आली होती. खर्चांमध्ये काही विद्यापीठांना अनुदाने दिली होती, तर सुमारे १० कोटी रुपये विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी राखून ठेवले होते. पहिला अर्थसंकल्प हा अंतरिम होता. कारण तो नोव्हेंबर १९४७ मध्ये सादर केला होता आणि तो ३१ मार्च १९४८ पर्यंतच्या अंदाजाचा होता. दुसरा अर्थसंकल्पदेखील सर चेट्टी यांनीच सादर केला आणि तो पूर्ण अर्थसंकल्प होता.

twitter – @AshishThatte

email – ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First finance minister and first budget of independent india asj
First published on: 07-01-2023 at 08:49 IST