घराघरांप्रमाणे महाविद्यालयातही गणेशाच्या प्रतिष्ठापनेबरोबरच अनेक सामाजिक संदेश देणारे उपक्रम सुरू आहेत. गणेशोत्सवाच्या सुट्टय़ा आल्यामुळे अनेक महाविद्यालयांच्या गणेशोत्सवावर विरजण आले असले तरी नेमका हेतू लक्षात घेत विद्यार्थी समाजाच्या मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक महाविद्यालयांनी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याऐवजी नावीन्य आणि समाजाभिमुख उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. गणेशोत्सव हा एकतेचा आणि नवनिर्मितीचा सण असल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी एकमेकांच्या साथीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत आहे. सध्या या सणाला स्पर्धेचे रूप मिळाले असल्यामुळे धांगडधिंगा करीत गाण्यांच्या तालावर नाचून गणेशोत्सव साजरा केला जाऊ शकत नाही ही जाण आजच्या तरुण पिढीला आहे.
गणेशभक्तांच्या मदतीसाठी आमची धाव
मालाड येथील ठाकूर महाविद्यालयाच्या एनएसएसचे विद्यार्थी दरवर्षी मार्वे समुद्राजवळ लोकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. सातव्या आणि दहाव्या दिवशी विसर्जनासाठी लोकांची मोठय़ा संख्येने गर्दी होते. अनेकदा लोकांना विसर्जन करण्यासाठी नेमकी प्रक्रिया माहीत नसते, तर अनेक कुटुंबे आपल्या लहान मुलांसोबत येतात. गर्दी असल्याने मुले हरविण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लोकांना मदत करणे त्यांना जाण्या-येण्याचे मार्ग दाखविणे असे काम ठाकूर महाविद्यालयाची मुले करीत असतात. यासाठी सुमारे १०० विद्यार्थी गणेश विसर्जनाच्या दिवशी मार्वे येथे जातात. गर्दीचे वाढते प्रमाण लक्षात घेता शेवटच्या दिवशी ठाकूर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे प्रमुख सुशील शिंदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. मागील वर्षीदेखील आम्ही येथे लोकांना मदत करण्यासाठी आलो होतो. याबरोबरच महाविद्यालयाच्या जवळ ठाकूर व्हिलेजजवळ कृत्रिम तलावाची बांधणी करण्यात आली आहे, मात्र विसर्जनाच्या दिवशी येथे खूप गर्दी असते यामुळे वाहतुक कोंडी होते. यासाठी देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो, असे ठाकूर महाविद्यालयाच्या एनएनएस प्रतिनिधी ओमकार दळवी याने सांगितले.
वाहतूक सांभाळण्यास आम्ही सज्ज..
माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या एनएसएसच्या मुलांनी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने वाहतूक कोंडी सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत वाहतुकीचा खोळंबा होतो. रस्त्यावर बांधण्यात आलेले गणपती मंडप, सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी येणारे नागरिक, मुंबईबाहेरील गाडय़ा आणि गणेशभक्तांमुळे मुंबईतील वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. अशा वेळी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे संपूर्ण मुबंईतील करोडो गाडय़ांचा ताफा वाढत असताना वाहतूक पोलिसांना मदत म्हणून वाहतूक सांभाळण्यासाठी मदत करीत आहेत. या दिवसांमध्ये तरुण नाचण्यात आणि गुलाल उडविण्यात दंग असतात तर तेथे रुईयाचे विद्यार्थी गणेशोत्सवातील वाहतूक सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहे. दरवर्षी एनएनएसच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत असतो. या वेळी वाढत्या वाहतुकीचा आणि पोलिसांवरील ताण लक्षात घेता आम्ही वाहतूक सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे रुईया महाविद्यालयातील एनएसएसची प्रतिनिधी रमा नामजोशी हिने सांगितले.
गणेशोत्सवाच्या ढोल-ताशात बाजी
गणेश उत्सव म्हटला की सगळ्यात आकर्षित करणार घटक असतो तो म्हणजे तिथे सादरीकरण करणारी ढोल पथके. या पथकांमध्ये नजर फिरवल्यास यात वादन करणारी बहुतांश वादक हे महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थी असतात. ही मुले अभ्यास, परीक्षा हे सगळे सांभाळून ढोल पथकात उत्साहीपणे सहभागी होतात. पाल्र्यातील साठय़े महाविद्यालयातील बीएमएम विभागातील अशीच काही मुले यावर्षी गणेशोत्सवाच्या ढोल पथकात सहभागी झाली आहेत. समीर सोनकर, दर्शन बेलवलकर, अक्षय पवार आणि तेजश्री परब ही तृतीय वर्ष बीएमएममध्ये शिकणारी मुले जोगेश्वरीच्या संघर्ष ढोल पथकात वादन करतात. समीर, अक्षय, तेजश्री ढोल वादन करतात तर दर्शन हा ताशा वादन करतो. गणेशाच्या आगमन सोहळ्यात वादन करणे ही उत्साहाचे आणि आनंदाचे काम असल्याचे तेजश्री सांगते आणि गटाने एका पथकात असल्याचा फायदा हा कधी कधी आमच्या महाविद्यालयालाही होतो. महाविद्यालयाच्या फेस्टिव्हलसाठी आमचे पथक कमीत कमी मानधन घेऊन वादन करतो असेही ती सांगते.
गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण
जे जे महाविद्यालयाचे विद्यार्थी गणेशोत्सवात गणेशाची सुबक मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण घेतात. यासाठी ही मुले आपला अभ्यासक्रम सांभाळून वेगवेगळ्या मूर्तीकला शाळेत फक्त अनुभवासाठी काम करत असतात. जे जेमधून या वर्षी उत्तीर्ण झालेली गौरव म्हात्रे, चिन्मय पाटील आणि अजित बसनाईक हे विद्यार्थी या गणेशोत्सवात मूर्ती घडवण्याचे काम करत आहेत. गौरव हा गणेशमूर्तीवर लिखाईचे म्हणजे बाप्पाचे डोळे, त्यावरील नक्षी करण्याचे काम करतो तर चिन्मयचा स्वत:चा स्वतंत्र मूर्तीकलेचा कारखाना आहे, ज्यात तो शाडूच्या मातीच्या मूर्त्यां घडवतो. हे काम आम्ही महाविद्यालयात शिकत असल्यापासूनच करत होतो आणि म्हणूनच अनुभवातून आम्ही काम कुशलरीत्या करू शकतो असे गौरव याने सांगितले. गणेशोत्सवात मूर्ती तयार करण्याचा अनुभव समृद्ध करणारा आहे. मूर्ती तयार करताना त्यात कलाकार मेहनत करून प्राण प्रतिष्ठापना करीत असतो. मूर्ती पाहताचक्षणी मंत्रमुग्ध होणे ही खरी म्रू्तिकाराची कृपा असते. कलाकार मूर्तीतील बारकावे लक्षात घेऊन रंगकाम करीत असतो. या अनुभवातून खूप शिकायला मिळाले असा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे.
मीनल गांगुर्डे, अक्षय मांडवकर