डॉ. उमेश करंबेळकर

‘माझे खाद्यजीवन’ या लेखात पुलंनी अनेक महाराष्ट्रीय पदार्थाची खासियत नेमक्या शब्दांत सांगितली आहे. शिकरण या पदार्थाबद्दल त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘शिकरण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाव्हण्यांची बोळवाबोळव आहे.’

पुलंनी असं म्हणण्याचे कारण, स्वयंपाकघरातील करायला सर्वात सोपा पदार्थ कोणता असेल तर तो शिकरण. दुधात केळं कुस्करून साखर घातली की झाला हा पदार्थ तयार. इतकी साधी त्याची रेसिपी आहे. तो करायला सोपा असल्यामुळेच ‘लहान माझी बाहुली’ कवितेतली छोटीशी बाहुली पाहुण्यांनी भुकेले जाऊ नये, यासाठी शिकरण करायला जाते आणि आपले दोन दात पाडूनही घेते.

खरं म्हणजे दूध आणि केळी घालून केलेलं शिकरण हा आहारशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य असा पदार्थ आहे. तसं पाहिलं तर केळं आणि दूध हे दोन्ही पदार्थ पौष्टिकच आहेत. परंतु केळं आणि दूध एकत्र खाऊ  नयेत, असं आयुर्वेदात सांगितलं आहे. वास्तविक दूध आणि फळं एकत्र खाणं हा विरुद्ध आहार आहे, असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. म्हणूनच त्यानुसार दूध-साखरेत फळं घालून तयार केलेलं फ्रूट सॅलड शरीराला बाधक ठरतं.

शिकरिन् या संस्कृत शब्दापासून मराठीत शिकरण हा शब्द तयार झाला आहे. शिकरिन् म्हणजे दही-साखरेत फळं मिसळून केलेला पदार्थ. येथे दूध न वापरता दही वापरलं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. आपलं स्वयंपाकशास्त्र आरोग्यशास्त्राच्या नियमांवर कसं आधारलेलं आहे हेसुद्धा ध्यानात आलं असेल. सर्वात गंमत म्हणजे हा पदार्थ तयार करण्याची कृती प्रथम महाभारतातील भीमाने शोधून काढली. ऐकून आश्चर्य वाटलं ना. भीम केवळ गदायुद्धात निपुण योद्धाच नव्हता तर उत्तम स्वयंपाकीही होता. त्यानेच श्रीखंड आणि शिकरण या पदार्थाचा शोध लावला. (‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे.) एक वर्षांच्या अज्ञातवासाच्या काळात पांडव जेव्हा विराट नगरीत राहत होते तेव्हा भीम विराट राजाकडे बल्लव म्हणून राहिला होता. पाकशालेचा मुख्य होता. असं हे शिकरण.

अगदी साधासोपा नि स्वस्त पदार्थ. ‘चैनीची परमावधी पुणेरी मराठीत रोज शिकरण आणि मटार उसळ खाण्यातच संपते,’ असं पुलंचं ‘तुम्हाला कोण व्हायचंय? मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?’ या लेखातील निरीक्षण आहे. तेव्हा शिकरण खाण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा, तुम्हाला नक्की कोण व्हायचंय?