27 May 2020

News Flash

सामान्य अध्ययनाचा समग्र अभ्यास

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या स्वरूपात झालेल्या बदलांमधील मुख्य बदल म्हणजे ‘सामान्य अध्ययन’ या विषयाचे वाढलेले महत्त्व. या विषयाचा आवाका आणि अध्ययनाची पद्धत याविषयक मार्गदर्शन

| July 29, 2013 08:19 am

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या स्वरूपात झालेल्या बदलांमधील मुख्य बदल म्हणजे ‘सामान्य अध्ययन’ या विषयाचे वाढलेले महत्त्व. या विषयाचा आवाका आणि अध्ययनाची पद्धत याविषयक मार्गदर्शन

विद्यार्थी हो, मागील लेखात केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत स्वीकारलेले बदल आपण सविस्तरपणे पाहिले आहेत. या बदलांचा विचार करता ठळकपणे नजरेत येणारी गोष्ट म्हणजे सामान्य अध्ययन या विषयाचे वाढलेले महत्त्व होय. स्वाभाविकच नव्या पद्धतीला अनुसरून अभ्यास धोरण ठरवताना सामान्य अध्ययनावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार यात शंका नाही.
खरे तर, केंद्र लोकसेवा आयोगाने सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमात वाढ करून आणखी अद्यावतता आणली आहे. बदललेल्या अभ्यासाची व्याप्ती लक्षात यावी यासाठी सामान्य अध्ययन १, २, ३ आणि ४ या प्रत्येक पेपरमधील अभ्यासक्रमाचे बारकाईने आकलन करणे अत्यावश्यक आहे. या आकलनाद्वारे संबंधित विषयात जुना-पांरपरिक भाग कोणता आणि नव्याने समाविष्ट केलेला भाग कोणता, हे लक्षात घ्यावे लागेल. दुसरे म्हणजे, त्यादृष्टीने विचार करता सा. अ. पे. १ मध्ये जगाचा इतिहास व भूगोल या घटकांचा केलेला समावेश ही महत्त्वपूर्ण भर आहे. भारतीय संस्कृती, वारसा याचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. थोडक्यात प्रत्येकमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व बाबी लक्षात घ्याव्यात. सामान्य अध्ययनचा नवा अभ्यासक्रम अतिशय समकालीन स्वरूपाचा आहे. उदा. सा. अ. १ मधील स्त्री संघटनांची भूमिका, लोकसंख्या व संबंधित कळीचे मुद्दे; विकासात्मक मुद्दे; नागरीकरण, त्यासंबंधी समस्या आणि उपाययोजना हे घटक समकालीन संदर्भात अभ्यासायचे आहेत. सामान्य अध्ययन २ मध्ये भारतातील घनात्मक यंत्रणेची इतर देशांतील घटनात्मक यंत्रणेशी करावयाची तुलना; विविध घटकांसाठी शासनाने राबवलेली धोरणे, केलेला विकासात्मक हस्तक्षेप, या दोन्हींची प्रारूपे आणि अंमलबजावणीतून निर्माण झालेले प्रश्न वा कळीचे मुद्दे; कारभार प्रक्रियेचे विविध आयाम, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई- शासनाची उपयोजने, प्रारूपे, यशापयश, मर्यादा आणि संभाव्य क्षमता; नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्वाची हमी देण्यासाठी केलेल्या संस्थात्मक व इतर उपाययोजना; सनदी सेवकांची लोकशाहीतील भूमिका हे घटक स्पष्टपणे नमूद केले आहेत. त्याचप्रमाणे सामान्य अध्ययन ३ मध्येदेखील विविध प्रकारच्या सिंचनप्रणाली व प्रकार; शेतमालाचे उत्पादन, साठवणूक, वहन व विपणन यातून निर्माण होणारे कळीचे मुद्दे; शेतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या दिल्या जाणाऱ्या सवलतीतून निर्माण होणारे कळीचे मुद्दे, अन्नधान्याचा साठा आणि अन्नसुरक्षा इ. मुद्दे ठळकपणे नमूद केले आहेत. वस्तुत: उपरोक्त अभ्यास घटक त्या त्या विषयाच्या चालू घडामोडीत समाविष्ट होतातच, परंतु आयोगाने नव्या अभ्यासक्रमात या घटकांची ठळक व सविस्तर नोंद केल्यामुळे त्याचा पद्धतशीर अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
सामान्य अध्ययनाच्या उपरोक्त अभ्यासक्रमातून व त्यात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यासघटकातून आयोगाची सनदीसेवक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून असलेली अपेक्षा समजून घेता येते. यातून कायदे, धोरणांची चौकट; त्यासाठी निर्माण केलेल्या संस्था व यंत्रणा; त्यांच्याद्वारे झालेली अंमलबजावणी, अंमलबजावणीचे समाजावर झालेले परिणाम, त्यातून उद्भवलेल्या समस्या, ऐरणीवर आलेले कळीचे मुद्दे आणि संभाव्य उपाययोजना या सर्व बाबींचे विद्यार्थ्यांना भान असले पाहिजे हेच जणू आयोगाला सांगायचे आहे. म्हणून परीक्षार्थीनी सामान्य अध्ययनातील कोणत्याही घटकांचा अभ्यास करताना संबंधित समस्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम याबरोबरच त्यासाठी शासकीय, बिगरशासकीय यंत्रणांनी केलेले कायद्यात्मक-धोरणात्मक उपाय, त्यांची अंमलबजावणी, त्यातून निर्माण झालेले प्रश्न आणि संभाव्य उपाययोजना अशी व्यापक चौकट करून सविस्तर अभ्यास करावा. जागतिकीकरण, पर्यावरणीय ऱ्हास, अनियंत्रित नागरीकरण, जमातवाद-दहशतवाद यासारख्या घटकांचा एकंदर भारतीय समाजावर आणि त्यातील भिन्न घटकांवरील परिणाम अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. अशारीतीने बदलत्या काळाच्या आव्हानांस सामोरे जाण्यास समर्थ असणारा प्रशासक घडवण्याच्या दृष्टीनेच हा अभ्यासक्रम स्वीकारल्याचे आपल्याला दिसून येते.
सामान्य अध्ययन पेपर ४ चा अभ्यासक्रम नवा वाटत असला तरी त्यामुळे चिंताग्रस्त होण्याचे कारण नाही. भारतीय राज्यघटना, राज्यघटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, न्याय, बंधू-भगिनीभाव, विविधता या मूल्यांचे भान आणि लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित लोकाभिमुखता या चौकटीच्या आधारेच विद्यार्थ्यांची नतिकता, सचोटी आणि कल तपासला जाणार आहे. प्रशासकीय चौकटीत अभिप्रेत असणारी तटस्थता, पारदर्शकता, जबाबदारी व उत्तरदायित्व, प्रामाणिकपणा व सचोटी, लोकाभिमुखता आणि संवेदनशीलता ही मूल्ये या पेपरच्या मूल्यमापनात पायाभूत आहेत. वस्तुत: केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या विरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने ‘सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा’ या शीर्षकाचा एक स्वतंत्र अहवालच जाहीर केला आहे. सामान्य अध्ययन ४ मध्ये या बाबी अंतर्भूत केल्या आहेत.
बदललेल्या सामान्य अध्ययनाचा अभ्यास करताना एका बाजूला अभ्यासाचा व्याप वाढवावा लागणार, तर दुसऱ्या बाजूला तयारीत नेमकेपणा आणावा लागेल. कारण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न असतील, किती शब्द मर्यादेत उत्तरे लिहायची आहेत, कोणत्या प्रश्नाला किती गुण या सर्व बाबी सद्यस्थितीत माहीत नाहीत. यावर एकमेव उपाय म्हणजे नेमकी तयारी होय. त्यासाठी संदर्भाचे वाचन करताना महत्त्वाच्या मुद्दय़ांना अधोरेखित करणे, त्यांची टिपणे काढणे, संबंधित विषयाबाबतची विविध मत-मतांतरे व्यवस्थितपणे नोंदवणे या बाबी महत्त्वपूर्ण ठरतील.
थोडक्यात, या नव्या पद्धतीत अभ्यास करताना बदललेल्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन, आकलन करणे आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे अत्यावश्यक ठरते. नव्या घटकांच्या तयारीसाठी नवे, अधिकृत आणि अद्ययावत संदर्भसाहित्य वापरणे उपयुक्त ठरेल. संदर्भसाहित्याची उपलब्धता हा मुद्दा एक आव्हान ठरणार आहे, यात शंका नाही. त्यातही मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका बाजूला इंग्रजीची तयारी आणि दुसऱ्या बाजूला नव्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी संदर्भाची जुळवाजुळव करण्याचे दुहेरी आव्हान आहे. त्यासाठी वर्तमानपत्रे, नियतकालिके, दरवर्षी अभ्यासक्रमावर प्रसिद्ध केले जाणारे संदर्भ ग्रंथ आणि आवश्यक तिथे इंटरनेटचा वापर करण्यावर भर हवा. थोडक्यात नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी व्यापक, समग्र आणि नेमका अभ्यास हे धोरणच उपयुक्त ठरणार आहे, हे एव्हाना सिद्ध होईलच.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2013 8:19 am

Web Title: general practice of overall studies
टॅग Upsc
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन
2 अस्पष्टता ते पात्रता
3 जीवशास्त्रातील संधी
Just Now!
X