News Flash

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षा कृषि घटकाची तयारी

कृषि घटकाच्या सगळ्या पेपर्समधील मुद्यांच्या अभ्यासाबाबत या लेखामध्ये एकत्रित चर्चा करण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

कृषि घटकाच्या सगळ्या पेपर्समधील मुद्यांच्या अभ्यासाबाबत या लेखामध्ये एकत्रित चर्चा करण्यात येत आहे.

* कृषिविषयक मूलभूत भौगोलिक व वैज्ञानिक संकल्पना आधी समजून घ्याव्यात. यामध्ये मृदेची निर्मिती प्रक्रिया, पिकवाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्वे, त्यांचे महत्त्व, त्यांच्या अभावामुळे व अतिपुरवठय़ामुळे पिकांवर होणारे परिणाम समजून घ्यावेत.

* मृदेची धूप व दर्जा कमी होणे या समस्या कारणे, उपाय, परिणाम अशा मुद्यांच्या आधारे अभ्यासाव्यात. मृदा संधारणाची आवश्यकता, त्यातील घटक, समस्या, उपाय, संबंधित शासकीय योजना समजून घ्याव्यात.

* महाराष्ट्रातील मान्सूनचे वितरण आणि त्या आधारे करण्यात आलेले महाराष्ट्रातील कृषि हवामान विभाग समजून घ्यावेत.

* पर्जन्याश्रयी, सिंचित शेती इत्यादी सिंचनावर आधारीत शेतीचे प्रकार व्यवस्थित समजून घ्यावेत. पाटबंधाऱ्यांचे प्रकार, वैशिष्टये, महत्त्व माहित असावेत. जलसंधारणाचे महत्त्व, प्रकार, घटक, समस्या, उपाय घ्यावेत. याबाबत चालू घडामोडी माहित असायला हव्यात.

* शासनाचे दुष्काळ निवारण व इतर कृषी व ग्रामीण विकासासाठीचे उपक्रम, योजना अर्थव्यवस्था घटकाशी संलग्न आहेत. त्यामुळे एकत्रित अभ्यास फायद्याचा ठरेल.

* कृषि-हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषिक्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाच वेळी करणे शक्य आहे. मृदेचा प्रकार, महत्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यास स्वरुप, समस्या, कारणे, उपाय या पलूंच्या आधारे करावा.

* महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेमध्ये अग्रेसर असलेली पहिली ३ राज्ये व क्रमवारीतील महाराष्ट्राचा क्रमांक तसेच महाराष्ट्रातील प्रमुख पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असेलेले पहिले ३ जिल्हे, माहित करुन घ्यावेत.

* महत्त्वाच्या पिकांसाठी राज्यातील उत्पादकता कमी/जास्त का आहे याची कारणे तसेच त्याचे सामाजिक, आर्थिक परिणामही समजून घ्यावेत व त्यावरील विविध उपाययोजना माहित करुन घ्याव्यात. यामध्ये शासकीय योजनांवर भर द्यावा. त्याचप्रमाणे ICAR, MCAER अशा संस्थांचे कार्य समजून घ्यावे या संस्थांची रचना, स्थापना वर्ष, कार्य, उद्दिष्ट समजून घ्यावे.

* कृषिक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर, हरितक्रांती, यांत्रिकीकरण, जीएम बियाणी यांचे स्वरुप, महत्त्व, परीणाम यांची समज विकसित व्हायला हवी. तंत्रज्ञानाच्या वापराचे आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय परिणाम व्यवस्थित समजून घ्यावेत. समस्या व उपायांचा आढावा घ्यावा व चालू घडामोडींबाबत अद्ययावत माहिती असायला हवी.

* शाश्वत शेती, सेंद्रित शेती, जी. एम. बियाणी, सिंचनाचे प्रकार, शेती व पर्यावरण यांचा परस्पर संबंध समजावून घेणे व त्यांचा तर्कशुध्द वापर करणे आवश्यक आहे.

* कृषि उत्पादकतेमध्ये महत्वाची भूमिका असलेल्या जलव्यवस्थापनाचा अभ्यास करताना सिंचन प्रकार, पाणलोट व्यवस्थापन, भूजलसाठा वाढविण्यासाठीचे प्रयत्न, योजना, पावसाचे पाणी साठविणे, अडविणे, जिरवणे यासाठीचे उपक्रम, तंत्रज्ञान, चालू घडामोडी समजून घ्याव्या.

* एकूण जमिनीपकी शेतीसाठी होणाऱ्या वापराची टक्केवारी, सिंचित क्षेत्राची टक्केवारी व क्षेत्रफळ, कोणत्या पिकासाठी किती जमिन वापरली जाते त्याची टक्केवारी माहित हवी.

* मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन व पशुसंवर्धन या क्षेत्रांची वैशिष्टय़े, गरजा, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व इत्यादी पलू समजून घ्यावेत. या क्षेत्रांच्या संवर्धनासाठीचे शासकीय उपाय व योजना इत्यादींचा आढावा घ्यावा.

* पशुधनाच्या संख्येबाबत, टक्केवारीबाबत व उत्पादकतेबाबत अग्रेसर असलेली राज्ये व जिल्हे यांची माहिती असायला हवी. पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठीच्या योजना, धवलक्रांती, रजतक्रांती, गुलाबीक्रांती इत्यादींचा आढावा घ्यायला हवा. यामधील तरतुदी, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष, मूल्यमापन इत्यादी पलू लक्षात घ्यावेत.

* कृषिक्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व समजून घेण्यासाठी केंद्र व राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून GDP, GNP, रोजगार, आयात-निर्यात यातील कृषिक्षेत्राचा वाटा (टक्केवारी) पहायला हवा. याबाबत उद्योग व सेवा क्षेत्राशी कृषि क्षेत्राची तुलना लक्षात घ्यावी. कृषि व इतर क्षेत्रांचा आंतरसंबंध पहाताना कृषि आधारित व संलग्न उद्योगांचे स्वरुप, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व या बाबींचा आढावा घ्यावा.

* कृषि उत्पादनांच्या निर्यातीबाबत GATT व WTO चे महत्वाचे करार व त्यातील तरतुदी व संबंधित चालू घडामोडी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. या तरतुदी व घडामोडींचा भारतीय कृषि क्षेत्रावरील व निर्यातीवरील परीणाम समजून घ्यावा. शेतकरी व पदासकारांचे हक्क व त्यांचे स्वरुप व अंमलबजावणी यांचा आढावा घ्यायला हवा.

* कृषि उत्पादनांचे वितरण व मूल्यांकन करणाऱ्या संस्थांची माहिती असणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किंमती तसेच कृषि उत्पादनांच्या विपणनासाठीच्या व किंमत स्थिरीकरणासाठीच्या शासकीय योजना माहित असाव्यात. साठवणुकीतील समस्या व त्यावरील उपाय यांचाही आढावा घ्यायला हवा. या दृष्टिने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा घेणे अवाश्यक आहे.

* कृषिक्षेत्रासाठी पतपुरवठा उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थांचा स्थापना, रचना, काय्रे, उद्दिष्टे इत्यादी बाबींच्या अनुषंगाने आढावा घ्यावा. ग्रामीण कर्जबाजारीपणाचा अभ्यास कारणे, स्वरुप, उपाय व परिणाम या मुद्यांच्या अनुषंगाने करायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 12:06 am

Web Title: main exam preparation for agricultural unit abn 97
Next Stories
1 क्षमता ओळखा!
2 यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास
3 नावीन्यातही सातत्य हवे!
Just Now!
X