वसुंधरा भोपळे

नुकतीच तिसरी वैश्विक अक्षय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्स्पो (Global Renewable Energy Investors Meet & Expo) RE-Invest 2020  ही आभासी परिषद २६ ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली. या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या अपारंपरिक आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केले होते. ‘शाश्वत ऊर्जा संक्रमणासाठी नवसंशोधन’ ही ‘री-इन्व्हेस्ट २०२०’ ची संकल्पना होती. अक्षय ऊर्जा साधनांचा विकास, वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांना भारतीय ऊर्जा क्षेत्राशी संलग्न करणे तसेच २०१५ व २०१८ मध्ये भरलेल्या परिषदांच्या यशस्वितेनंतर, अक्षय ऊर्जेतील गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करणे ही या परिषदेच्या आयोजनामागील उद्दिष्टे होती. या परिषदेमध्ये भारताने आपल्या अंदमान, निकोबार व लक्षद्वीप बेटांना पूर्णत: हरित बेटे करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच या बेटांच्या सर्व ऊर्जा गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण केल्या जातील.

भारताची अक्षय ऊर्जा क्षमता सध्या १३६ गीगा वॅट्स आहे जी आपल्या एकूण ऊर्जा क्षमतेच्या सुमारे ३६% आहे व जगातील चीन, अमेरिका व ब्राझीलनंतर चौथी सर्वात मोठी अक्षय ऊर्जा क्षमता आहे. तर अक्षय ऊर्जेच्या वापरामध्ये चीन, अमेरिका, जर्मनी व ब्राझीलनंतर भारत पाचव्या क्रमांकावर आहे. भारत सरकारने २०२२ च्या अखेरीपर्यंत १७५ गीगा वॅट्स तर २०३० पर्यंत ४५० गीगा वॅट्स अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे.

न संपणाऱ्या आणि पुन्हा वापरता येणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतांना अक्षय ऊर्जा स्रोत असे म्हटले जाते.  जैविक ऊर्जा(वनस्पती व प्राण्यांच्या मृतावशेषांपासून निर्मित ऊर्जा), पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलविद्युत, सागरी लाटांपासून निर्मित ऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जा हे अक्षय ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. अक्षय ऊर्जा ही हरित ऊर्जा असून ती प्रदूषणकारी नसल्यामुळे आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत असल्यामुळे या ऊर्जेचे महत्त्व वाढत आहे. अक्षय ऊर्जा स्रोत हे पर्यावरणपूरक असल्यामुळे इतर पारंपरिक ऊर्जा स्रोतांपेक्षा भविष्यात या स्रोतांचे महत्त्व अधिकाधिक वाढत जाणार आहे.

अक्षय ऊर्जा स्रोतांनाच नवीकरणीय किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणूनही संबोधले जाते. भारतात दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो.

राज्य सेवा परीक्षेमध्ये अक्षय ऊर्जा स्रोत, त्यांच्यापासून ऊर्जा निर्मितीचे निकष, उभारण्यात आलेले प्रकल्प आणि त्यांचे स्थान, ऊर्जा निर्मितीची उद्दिष्टे आणि सद्य स्थिती, ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात आलेले प्रयत्न अशा पैलूंवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अभ्यासक्रमातील ऊर्जा या घटकाचा अभ्यास करताना उपरोल्लेखित मुद्दय़ांकडे लक्ष देणे अभिप्रेत आहे.

अक्षय ऊर्जा निर्मितीचे विविध प्रकार

बायोगॅस : प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती केली जाते. या ऊर्जेचा वापर स्वयंपाकघरातील गॅस, पाणी गरम करणे व दिवे प्रकाशित करणे यासाठी केला जातो.

कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती : मोठय़ा शहरात व महानगरात निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्यापासून वायुनिर्मिती केली जाते आणि या वायूपासून विद्युत निर्मिती केली जाते.

पवन ऊर्जा : पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असावा लागतो. वाऱ्याच्या वेगामुळे पवनचक्क्यांची पाती फिरून गतीज ऊर्जा निर्माण होते आणि या गतीज

ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाते. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये पवन ऊर्जा निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देत आहेत. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यत चाळकेवाडी येथे पवन ऊर्जा प्रकल्प आहे.

जलविद्युत : वाहत्या पाण्याच्या गतीज ऊर्जेचा वापर करून निर्माण झालेल्या ऊर्जेला जल ऊर्जा म्हणतात. जल ऊर्जेचा वापर करून जल विद्युत निर्मिती केली जाते.

भू-औष्णिक ऊर्जा : पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान प्रत्येक ३२ मीटरला १ अंश सेल्सिअसने वाढते. या भू-औष्णिक ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती करता येते. हिमाचल प्रदेशमधील मणिकरण येथे असा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

सागरी ऊर्जा : सागरी लाटा व भरती ओहोटी या सागर जलाच्या हालचाली आहेत. या हालचालीमुळे निर्माण झालेल्या लाटांचा वेग व शक्ती यांचा वापर करून गतीज ऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते. भारतासारख्या द्वीपकल्पीय देशात या ऊर्जेचा योग्य वापर होऊ शकतो.

सौर ऊर्जा : सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपातील ऊर्जेला सौर ऊर्जा म्हणतात. सौर ऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यावर अवलंबून असते. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात सौर ऊर्जेचा वापर करण्यास भरपूर वाव आहे. सौर ऊर्जा वापरामध्ये भारतातील तमिळनाडू राज्य अग्रेसर आहे. अलीकडील काळात लदाखमध्ये जागतिक पातळीवरचे सर्वात मोठे सोलर फार्म तयार होत आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यतील साक्री येथे सौर ऊर्जा प्रकल्प आहे. भारत सध्या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्समध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

जागतिक पातळीवरील काही महत्त्वाचे सौर ऊर्जा प्रकल्प

  • अग्वा कॅलिएंट सोलर प्रोजेक्ट : अरिझोना, संयुक्त संस्थाने
  • कॅलिफोर्निया व्हॅली सोलर युनिट : कॅलिफोर्निया, संयुक्त संस्थाने
  • गोलमुड सोलर पार्क : चीन
  • चरंक सोलर पार्क : पाटण, गुजरात
  • वेलस्पन एनर्जी प्रोजेक्ट : मध्य प्रदेश