कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षेतील गुण देशातील २० इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या कॅम्पसेसमधील प्रवेशासाठी प्रमुख घटक म्हणून ग्राह्य़ धरले जाते. त्याशिवाय देशातील महत्त्वाच्या शासकीय, विद्यापीठीय आणि खासगी संस्थेतील एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट-पीजीडीबीएम प्रवेश प्रकियेतील स्क्रीिनग म्हणजेच प्रारंभिक निवड सूची करण्यासाठी उपयोग आणले जातात. यातील काही संस्था या बऱ्याच आयआयएमपेक्षा विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते.

यामध्ये पुढील काही महत्वाच्या शासकीय संस्थांचा समावेश आहे.

१)     दिल्ली युनिव्हर्सटिी अंतर्गत येणाऱ्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

२)     डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – आयआयटी मद्रास

३)     शैलेज जे मेहता, स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी बॉम्बे

४)     विनोद गुप्ता, स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी खरगपूर

५)     स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज-आयआयटी दिल्ली

६)     डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज-आयआयटी रुरकी

७)     डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड मॅनेजमेंट इंजिनीअिरग – आयआयटी कानपूर

८)     डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयएमएस धनबाद

९) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअिरग, मुंबई</p>

१०) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड दिल्ली

११) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स – इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बेंगळुरु

११) इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद

१२) एनआयटी रुरकेला

१३) एनआयटी तिरुचिरापल्ली, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट. इत्यादी.

फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एफएमएस) ही संस्था रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजेच एकूण शैक्षणिक शुल्काच्या तुलनेत पॅकेजच्या रक्कमेच्या बाबतीत देशातील सर्व आयआयएम आणि इतर शासकीय व खासगी संस्थांच्या कित्येकपट जास्त आहे. या संस्थेतील वार्षकि शैक्षणिक शुल्क १० हजार ४८० रुपये आहे. म्हणजेच दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम अवघ्या २५ हजार रुपयांच्या शुल्कामध्ये शिकता येतो. यंदा या संस्थेतील सर्वोच्च पॅकेज ५६ लाख रुपये आहेत, तर पहिल्या १०० विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज २६ लाख रुपये आहे. आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बेंगळुरु, आयआयएम कोलकता या महत्त्वाच्या आयआयएमचे शुल्क २० ते २२ लाख रुपयांच्या आसपास आहे. या संस्थेतील सर्वोच्च पॅकेज ८२ लाख रुपये आहेत, तर विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज ४८ लाख रुपये आहे. या आकडेवारुन लक्षात येईल की एफएमएसमधील गुंतणुकीपेक्षा मिळणारे रिटर्न्‍स हे आयआयएम अहमदाबादपेक्षा अधिक पटीने आकर्षक आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी आयआयएमपेक्षा एफएमएस दिल्लीला पहिला पसंतीक्रम देतात.

आयआयटीमधील एमबीए

आयआयटी (दिल्ली, कानपूर, मुंबई, खरगपूर,रुरकी) मधील एमबीएचे शुल्क हे १० ते १२ लाखाच्या आसपास आहे. काही महत्त्वाच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे शुल्कसुद्धा आयआयएमपेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे आयआयएमसोबतच कॅट परीक्षेतील गुण हे या शासकीय संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे द्वार उघडणारी पहिली पायरी ठरते.

प्रवेशाचे टप्पे

यामुळे कॅट परीक्षेत किमान एकूण ९० पर्सेटाइल आणि तिनही विभागात किमान ८० टक्के पर्सेटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक फेरीसाठी निवड होण्याची संधी मिळते. दुसऱ्या फेरीत समूह चर्चा, मुलाखत, लेखन कौशल्य, दहावी-बारावी-पदवीमधील गुण, संगीत/नृत्य/नाटक /क्रीडा आदी घटकांमध्ये उत्तम कामगिरी अशा बाबींवर गुण दिले जातात आणि अंतिम यादीत स्थान मिळू शकते. साधारण पन्नास टक्के वेटेज किंवा महत्त्व हे कॅटमधील गुणांना व इतर बाबींना उर्वरित पन्नास टक्के वेटेज दिले जाते. यंदा काही आयआयएम वा इतर महत्त्वाच्या शासकीय संस्था कॅटच्या गुणांचे वेटेज हे ४० टक्क्यांपर्यंत आणण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकीसोबतच इतर ज्ञानशाखांमधील विद्यार्थ्यांनाही आयआयएममध्ये प्रवेश मिळणे सुलभ व्हावे यासाठी अभियांत्रिकीव्यतिरिक्त इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातात. शिवाय विद्यार्थिनींची संख्या वाढावी यासाठी त्यांनाही अतिरिक्त गुण दिले जातात. यंदा कोझिकोड आयआयएममध्ये नियमित जागांशिवाय महिलांच्या ६० अतिरिक्त जागाही भरणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत मुंबईतील जमनलाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अ‍ॅण्ड रिसर्चमधील काही जागा भरण्यासाठी कॅट गुणांचा आधार घेतला जात होता. यंदा केवळ एमएच-सीईटी-एमबीए या परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले गेले. मात्र पुढील वर्षी नियमांमध्ये बदल झाल्यास कॅटमधील गुणांचा फायदा होऊ शकतो. रिटर्न ऑन इव्हेंस्टमेंट या घटकांमध्ये देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मुंबईतील सिडनहॅम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेतील काही जागा भरण्यासाठी कॅटचे गुण ग्राह्य़ धरले जातात. ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे. महाराष्ट्रातील एस.पी.जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट पुणे, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे, या संस्थांमधील प्रारंभिक चाळणीसाठी कॅटमधील गुणांचा आधार घेतला जातो. या शिवाय देशातील पहिल्या ५० संस्थांमधील प्रवेशासाठीही कॅटचे गुण ग्राह्य़ धरले जातात. ही बाब कॅट परीक्षेचे महत्त्व व्यवस्थापन अभ्यासक्रम शिक्षणात अधोरेखित करणारे आहे.

अशी करा तयारी

कॅट परीक्षा ही कठीण असली तरी दररोजच्या सरावाने या परीक्षेतील यशाची खात्री वाढू शकते. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने या परीक्षेत एकूण किमान पर्सेटाईल आणि तिनही सेक्शनमधील किमान पर्सेटाईल गुण मिळवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक सेक्शनमधील प्रश्नांचा अधिकाधिक सराव करायला हवा. अशा सराव चाचण्या मुबलक प्रमाणात इंटरनेटवर उपलब्ध आहेत. विशिष्ट रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरली की, निर्धारित कालावधीत या खासगी शिकवण्यांच्या सराव चाचण्या संगणकावर येत राहतात.

याशिवाय पूर्ण कालावधीच्या (तीन तास) पेपरचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट उपलब्ध करुन दिले जातात. पुढील काळात दररोज किमान एक तरी पेपर तरी सोडवायला हवा. हा पेपर सोडवल्यावर त्यातील न आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करायला हवे. ते केल्यावरच दुसरा पेपर सोडवायला घ्यावा. यासोबतच दररोज सेक्शनल विषयांचे पेपरही सोडवायला हवेत. त्यामुळे होणाऱ्या चुका कळतात व विश्लेषण केल्यावर त्याची दुरुस्ती करता येते. या दोन्ही गोष्टी करण्यासाठी काही वेळ राखून ठेवणे आवश्यक आहे.

गती आणि अचुकता

कॅट परीक्षेमध्ये गती आणि अचूकता या दोन्ही गोष्टी तपासल्या जातात. त्यामुळे तिन्ही विभागांचा अभ्यास करताना समान वेळ शक्यतो द्यावा. कारण एखादा विभाग सोपा वाटतो म्हणून सरावात त्याकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्यक्ष परीक्षेत सरावाच्या वेळी नेहमी सोपा जाणारा विभाग कठीण जाऊ शकतो. त्यामुळे सर्व विभागांना समान न्याय देणेच उचित ठरेल.

पूर्ण लांबीचा पेपर हा काटेकोरपणे तीन तासाच्या वेळेत सोडवायचा प्रयत्न करावा या परीक्षेत चुकलेल्या प्रश्नांसाठी गुण कापले जातात. त्यामुळे शक्यतो अंदाजपंचे उत्तरे लिहिण्याचे टाळले पाहिजे. अधिक अचूक प्रश्नांची सोडवणूक म्हणजे अधिक गुण ही बाब लक्षात ठेवायला हवी. तिन्ही विभाग सोडवण्यासाठी शक्यतो समान वेळ देण्याचा प्रयत्न करावा.

Story img Loader