यंदा व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएच-सीईटी परीक्षांमध्ये सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांची कामगिरी सुमार दर्जाची होती. या परीक्षेच्या योग्य पद्धतीच्या तयारीत अनेक विद्यार्थी मागे पडले हे या निकालातून स्पष्ट झाले.
एमएच-सीईटीच्या सुमार निकालांमागे विविध कारणे आहेत- यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शालेय-महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांचे जे मूल्यमापन केले जाते ते तितकेसे सातत्यपूर्ण आणि गांभीर्यपूर्वक केलेले नसते. त्यामुळे अंतर्गत चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांला भरमसाट गुण मिळतात. अगोदर जे गुण मोठय़ा कष्टाने मिळत ते आता सहज मिळू लागले आहेत. आणि मग पदव्युत्तर पातळीवरच्या स्पर्धात्मक प्रवेशपरीक्षांमध्ये हे विद्यार्थी आपली चमक दाखवण्यात अयशस्वी ठरतात.
आज अशी परिस्थिती आहे की, विद्यार्थ्यांच्या तुलनेत व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशजागा अधिक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांला प्रवेशपरीक्षेत कितीही कमी गुण असले तरी कुठे ना कुठे प्रवेश मिळतोच. त्यासाठी विद्यार्थ्यांची पूर्वीची शैक्षणिक कामगिरी, गटचर्चा व मुलाखतीतील सादरीकरण, अ‍ॅप्टिटय़ूट/ प्रवेश चाचणीचे गुण उत्तम असायला हवेत, याकडे काणाडोळा केला जातो. त्यामुळे मग उत्तम कामगिरीशिवायही आपल्याला या अभ्यासक्रमांना सहज प्रवेश मिळू शकेल अशी विद्यार्थ्यांची मानसिकता बनते.  
आगामी एमएच-सीईटी परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी बजावण्यासाठी काही  पर्यायांचा आवर्जून विचार करावा.  व्यवस्थापनाच्या प्रवेश परीक्षेसह इतर कोणत्याही प्रवेश परीक्षेचा यशोमंत्र म्हणजे स्मार्ट मेहनत करा. सरावाने मनुष्य घडतो. तुम्हाला जमतील तेवढे मॉक पेपर (सराव प्रश्नसंच) ऑनलाइन सोडवा. सराव संच तसेच संपूर्ण मॉक पेपर सोडवून झाल्यानंतर आपल्या कामगिरीचे विश्लेषण करा. आपल्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करा.     
ही एक वेगाची चाचणी असल्याने एक प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३६ सेकंदाचा वेळ घ्या. अशा प्रकारच्या मॉक टेस्टमुळे परीक्षाथींचा सराव होतो आणि त्यांच्यात आत्मविश्वास येतो. जर तुम्ही ३०० शब्दांचा उतारा एका मिनिटात वाचत असाल, तर मग ४०० आणि ५०० किंवा त्यापेक्षा अधिक शब्दसंख्या असलेले उतारे त्या वेळेत सोडविण्याचा प्रयत्न करा. २०० बहुपर्यायी प्रश्न १५० मिनिटांत सोडवण्याचा प्रयत्न करा. वाचन, आकलनात्मक क्षमता आणि तार्किक क्षमता अशा सर्व दृष्टिकोनांतून परीक्षेचा सराव करायला हवा.  
नियमित अभ्यास आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन याची मोठी मदत होते. जर तुमच्या एखाद्या मित्राने मॉक टेस्टमध्ये चांगले गुण मिळवले तर त्याने त्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली हे जाणून घ्या.  
परीक्षेच्या तयारीची योजना बनवा आणि अंमलबजावणी करा. तयारी करताना वेळेचे व्यवस्थापन करा. आठवडय़ातील आठ-दहा तास तयारी करण्यापेक्षा दररोज दोन तास अभ्यास करा. ही पद्धत उत्तम असून त्यामुळे आरामात अभ्यास करता येतो, सराव शक्य होतो. ज्ञान आत्मसात करणे शक्य होते. ऐनवेळेस तयारी करण्यापेक्षा आधीपासून तयारी केली तर त्याचा उपयोग होतो.    
डॉ. सी. एस. अधिकारी
अधिष्ठाता, अभ्यासक्रम विभाग
आयटीएम बी-स्कूल
खारघर, नवी मुंबई