scorecardresearch

व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना..

एमबीए अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण विभागामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा किंवा मान्यता असलेल्या इतर प्रवेश परीक्षांपैकी एक प्रवेश परीक्षा दिल्यानंतर पुढील पायरी म्हणजे केंद्रीय प्रवेश

व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना..

MBAएमबीए अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण विभागामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा किंवा मान्यता असलेल्या इतर प्रवेश परीक्षांपैकी एक प्रवेश परीक्षा दिल्यानंतर पुढील पायरी म्हणजे केंद्रीय प्रवेश पद्धतीने अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे. यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना वेगवेगळे पर्याय असलेले प्रवेश अर्ज भरून द्यावे लागतात. त्यासाठी हव्या असलेल्या संस्थेसाठी पसंतीक्रम भरून द्यावा लागतो. यासाठी संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या जागा आणि प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेले गुण यांचा विचार करून पसंतीक्रम द्यावा लागतो. योग्य त्या पसंतीक्रमाच्या नियोजनासाठी प्रत्येक संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची विभागणी कशी केली आहे हे समजून घेतले पाहिजे.
सद्य नियमानुसार, प्रत्येक संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी ७० टक्के जागा (२० टक्के जागा व्यवस्थापन कोटा वगळता) या ज्या विद्यापीठाशी ती संस्था संलग्न आहे त्या विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी असतात. म्हणजेच एखादी संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न असेल तर संस्थेतील एकूण उपलब्ध जागांपैकी ७० टक्के जागा (२० टक्के जागा व्यवस्थापन कोटा सोडून) मुंबई विद्यापीठातून पदवीधर झालेल्यांसाठी असतात. या जागांपैकी नियमाप्रमाणे जागांची विभागणी खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी राखीव  असते. यानंतर उरलेल्या जागांपैकी १५ टक्के जागा या महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांतील पदवीधरांसाठी आहेत. यातही खुला व राखीव अशी विभागणी आहे. याव्यतिरिक्त १५ टक्के जागा महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी व २० टक्के जागा व्यवस्थापन कोटय़ासाठी आहेत. उदा. एखाद्या संस्थेमध्ये जर एकूण १८० जागा असतील तर यापैकी २० टक्के म्हणजेच ३६ जागा व्यवस्थापन कोटय़ासाठी आहेत. उरलेल्या १४४ पैकी ७० टक्के ज्या विद्यापीठाशी संस्था संलग्नित आहे त्या विद्यापीठातील पदवीधरांपैकी.
१५ टक्के महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांतील पदवीधरांसाठी व उर्वरित १५ टक्के महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी असतात. यापैकी वर नमूद केल्याप्रमाणे ७० टक्के जागांसाठी व महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांसाठीच्या १५ टक्के जागांसाठी आरक्षण उपलब्ध आहे.
एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने ही जागांची विभागणी समजून घेणे आवश्यक आहे. कारण त्याप्रमाणेच पसंतीक्रम देणे गरजेचे आहे. एखादा विद्यार्थी पुणे विद्यापीठाशी संलग्न  असलेल्या महाविद्यालयातून पदवीधर झाला असेल आणि त्याला मुंबई किंवा इतर विद्यापीठांशी संलग्न संस्थेतून एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करायचे असेल तर प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण असणे आवश्यक आहे. कारण अशा उपलब्ध जागांची संख्या ही मर्यादितच असते. त्यामुळे प्रवेश परीक्षेत कमी गुणसंख्या असलेल्यांनी आपल्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संस्थेमध्येच पसंतीक्रम देणे आवश्यक आहे. पसंतीक्रम देण्याआधी प्रमुख संस्थांचे गेल्या वर्षांतील कट-ऑफ गुण माहिती करून घेतल्यास त्याचा फायदा होतो.
संस्था निवडीसाठी काही निकषांची पूर्तता व्हायला हवी. या निकषांची पूर्तता झाल्यावर संस्थेविषयीची पूर्ण माहिती घेऊनच संस्था निवडायला हवी. एमबीएची ही दोन वर्षे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असल्याने आपण जिथे शिक्षण घेणार त्या संस्थेची निवड अतिशय काळजीपूर्वक केली पाहिजे. केवळ एखादी संस्था आपल्या घराजवळ आहे, म्हणून निवडायची हे योग्य ठरत नाही. म्हणून संस्थानिवडीसाठी काही निकष लावणे गरजेचे आहे.
याविषयीचा पहिला महत्त्वाचा निकष म्हणजे संस्थेचे संलग्नत्व. संस्था तसेच संस्थेमध्ये चालू असणारे अभ्यासक्रम कोणत्या विद्यापीठाशी संलग्न आहेत हे जाणून घ्यायला हवे. ही सर्व माहिती तंत्र शिक्षण विभागातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या एमबीएच्या माहिती-पुस्तकामध्ये दिली जाते. तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावरसुद्धा (वेबसाइटवर) ही माहिती असते. मात्र बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की, ही माहिती लक्षपूर्वक वाचली जात नाही आणि त्यामुळे नंतर फसवणूक होते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध असलेली माहिती सर्वानी
वाचायला हवी.
संस्थेची इमारत, ग्रंथालय, संगणक सुविधा आणि संस्थेच्या निवडीतील महत्त्वाचा घटक म्हणजे संस्थेतील प्राध्यापकवर्गाचीसुद्धा माहिती करून घेतली पाहिजे. प्रत्येक संस्थेच्या वेबसाइटवर ही माहिती असतेच, पण वेबसाइट बघण्याबरोबरच संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन ही पाहणी केली पाहिजे. पदवीची अंतिम परीक्षा झाल्यानंतर पसंतीक्रम देण्यासाठी सुमारे दोन महिने हाताशी असतात. हा वेळ वाया न घालवता याचा उपयोग संस्थांना प्रत्यक्ष भेटी देण्यासाठी वापरला पाहिजे. अर्थात महाराष्ट्रातील संस्थांची संख्या प्रचंड मोठी असल्यामुळे सर्व संस्थांना भेटी देणे जमेलच असे नाही. परंतु जर मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स केलेत तर सर्व प्रमुख संस्थांना भेटी देता येतील. अशा भेटीमध्ये आवर्जून पाहिले पाहिजे म्हणजे संस्थांमधील सोयी तसेच ग्रंथालयातील पुस्तके, संगणक व संस्थेत शिकवणारा अध्यापकवर्ग. आज व्यवस्थापन संस्थांमध्ये जागा अधिक आणि त्या मानाने विद्यार्थी कमी अशी परिस्थिती असल्यामुळे प्रवेशसंख्या वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जाण्याची शक्यता असते. त्यासाठी स्वत: पाहून जर खात्री करून घेतली तर फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. याचबरोबर संस्थेतील काही विद्यार्थ्यांशी बोलता आले तर त्याचाही उपयोग होतो. शेवटी संस्थेत प्रत्यक्ष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनुभव व संस्थेबद्दल मत हे महत्त्वाचे असतेच, मात्र काही कारणांमुळे संस्थेतील विद्यार्थ्यांचा (सर्व विद्यार्थ्यांचा नाही तर काहींचा) संस्थेबद्दल पूर्वग्रह असेल तर असे विद्यार्थी संस्थेबद्दल विनाकारण नकारात्मक मत देतात. त्यामुळे शेवटी संस्थेची पाहणी केल्यानंतर आपले होणारे मत महत्त्वाचे ठरते.
संस्था निवडताना अलीकडे महत्त्वाचा मानला जाणारा एक निकष म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या संधी म्हणजेच प्लेसमेंट. संस्थेचे याबाबतचे रेकॉर्ड हा निश्चितच एक महत्त्वाचा निकष आहे याबद्दल दुमत नाही. मात्र हाच एकमेव निकष होऊ नये. संस्थेतील एमबीए अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या नोकऱ्या या अनेक घटकांवर अवलंबून असतात. संस्थेची एकूण प्रतिमा, दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा, विविध क्षेत्रांतील उद्योगधंद्याशी असणारे संबंध, इ. अनेक घटकांबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वत:चा केलेला विकास हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे पहिल्या दिवसापासूनच प्लेसमेंटच्या मागे धावल्यास, प्लेसमेंट तर मिळत नाहीच, पण महत्त्वाचे विषयसुद्धा कच्चे राहतात. म्हणून लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे एमबीएच्या दोन वर्षांत वेगवेगळी कौशल्ये वाढवायला हवीत. याबाबत संस्थेतील अध्यापकवर्ग, आपले नातेवाईक, उद्योगसंस्थांतील अधिकारी या सर्वाबरोबरच संवाद वाढवला पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या संस्थेने दिलेली प्लेसमेंटची केवळ आकडेवारी पाहून प्रवेश घेतल्यास काही वेळा फसवणूक होते. म्हणून प्लेसमेंटची माहिती काढली पाहिजे.
चांगली नोकरी मिळवण्यासाठी एमबीएला असणाऱ्या विविध विषयांची मूळ संकल्पनाही समजली पाहिजे. ज्यासाठी संस्थेमध्ये तास नियमित होतात का हेही पाहिले पाहिजे. वर्गातील उपस्थितीसाठी ज्या संस्था प्रमाणाबाहेर सवलती देतात किंवा वर्गात आले नाही तरी चालेल अशी आमिषे दाखवून प्रवेश देतात अशा संस्थांपासून कटाक्षाने दूर राहायला हवे. वर्गात उपस्थित न राहता केवळ परीक्षा देऊन घेतलेली एमबीएची पदवी घेणे म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड टाकून घेणे आहे. शैक्षणिक गुणवत्ता व वेगवेगळी कौशल्ये आणि नोकरी अथवा स्वत:चा व्यवसाय यांचा खूप जवळचा संबंध आहे. याबाबत असा अनुभव आहे की, आजकाल प्रवेश घेऊ इच्छिणारेच संस्थेला अटी घालतात आणि यातील प्रमुख अट म्हणजे उपस्थिती ठेवणार नाही. आज एमबीएचे महत्त्व कमी होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे वर्गात उपस्थित न राहता केवळ एमबीएची पदवी मिळवणारे विद्यार्थी. या महत्त्वाच्या गोष्टींचा आपल्या करिअरवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे याबाबत या बाबी जेवढय़ा लवकर लक्षात येतील तेवढे चांगले.
शेवटी हे लक्षात ठेवले पाहिजे की, कोणतीही संस्था निवडली तरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला फायदा होईल. या पलीकडे आपले स्वत:चे प्रयत्न. स्वविकास घडवून आणण्याचा ध्यास, इ. अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. आपल्या करिअरकडे आपण किती गंभीरपणे पाहतो यावरही सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की, एमबीएला प्रवेश घेतल्यानंतर आपण आपला वेळ व शुल्क यांची गुंतवणूक करीत असतो. या गुंतवणुकीवर आपण किती रिटर्न मिळवतो हे चांगल्या संस्थेत प्रवेश
घेण्याबरोबरच आपल्या प्रयत्नांवर जास्त अवलंबून आहे. चांगले रिटर्न मिळवणे अशक्य अजिबात नाही, पण त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून गुणवत्ता वाढवली पाहिजे.    
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: While taking admission to management course

ताज्या बातम्या