परदेशातील उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपरीक्षांएवढीच तयारी करावी लागते ती विद्यापीठातील अर्जप्रक्रियेची. विद्यार्थ्याने एकदा का विद्यापीठांच्या प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया पूर्ण केली की तो आपोआपच त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो. म्हणजे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे अर्ज करावा लागत नाही. त्यामुळे परदेशातील विद्यापीठांच्या प्रवेशातील अर्जप्रक्रिया महत्त्वाची.

परदेशातील सर्वच विद्यापीठांमध्ये दोन वेगवेगळे शैक्षणिक सत्र असतात. फॉल आणि स्प्रगिं. साधारणत: ऑगस्टमध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्राला फॉल म्हणतात तर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या आसपास सुरू होणाऱ्या सत्राला स्प्रगिं असे म्हणतात. विद्यार्थ्याला फॉल किंवा स्प्रगिं यापैकी एका सेमिस्टरला अर्ज करावा लागतो.

पदवी अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या विद्यापीठाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी दोन मार्ग आहेत. विद्यापीठाच्या स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलवरून किंवा कॉमनअॅप नावाच्या प्लॅटफॉर्मवरून सर्वच विद्यापीठांना अर्ज करता येतो. कॉमनअॅपवरून सोप्या पद्धतीने अर्जप्रक्रिया पूर्ण करता येते. अर्जप्रक्रियेपूर्वी विद्यार्थी-पालकांकडे खाली दिलेल्या सर्व गोष्टी तयार असायला हव्या. यापैकी काही गोष्टी प्रत्येक विद्यापीठाच्या गरजेनुसार वेगवेगळ्याही असू शकतात. विद्यापीठाच्या वेबसाईटवर अर्ज कसा करावा याबद्दल विस्तृतपणे माहिती दिलेली असतेच. ती तपासून मगच कॉमनअॅपवर अर्ज सुरू करा.

कॉमनअॅपवर अर्ज भरताना कोणकोणत्या गोष्टी लागतील याची यादी खालीलप्रमाणे करता येईल –

विद्यापीठांची यादी — संशोधन परदेशातील विद्यापीठांना अर्ज करत असताना किमान पाच ते सहा विद्यापीठांना अर्ज केलेला योग्य राहील. कारण तुम्हाला हव्या असलेल्या विद्यापीठाचा नकार आला तर स्वीकारलेल्या इतर विद्यापीठांपैकी चांगले विद्यापीठ निवडता येईल. त्यामुळे संशोधन करून अर्ज करायच्या पाच ते सहा किंवा अधिक विद्यापीठांची यादी तयार ठेवा. विद्यापीठांची निवड कशी करायची हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे. कॉमनअॅपवर ही यादी सेव्ह करता येते.

स्टँडर्डाइज्ड परीक्षांचे स्कोअर्स — तुम्ही अर्ज करणार असलेल्या विद्यापीठांना SAT/ ACT आणि TOEFL, IELTS किंवा Duolingo English Test यांपैकी कोणती परीक्षा आवश्यक आहेत ते तपासा.कॉमनअॅपवर अर्ज भरताना ही या परीक्षांचे गुण नमूद करावे लागतात.

ट्रान्सक्रिप्ट्स /मार्कशीट्स — विद्यार्थ्यांनी त्यांचे नववी ते अकरावीपर्यंतचे ट्रान्सक्रिप्ट्स शाळेतून घेऊन ठेवले पाहिजे. त्याबरोबर, बारावीची परीक्षा जर दिली नसेल तर दिलेल्या परीक्षेचे प्रिडिक्टिव्ह गुणपत्रक तयार ठेवायला हवे. कॉमनअॅपवर अर्ज भरताना ट्रान्सक्रिप्ट्स अपलोड करावे लागत नाही. मात्र विद्यापीठाच्या स्वतंत्र पोर्टलवर अपलोड करावे लागते.

शिफारसपत्रे ( LORs) — शिक्षक, प्राध्यापक, शाळेचे प्राचार्य, काउन्सेलर्स किंवा प्रोजेक्ट सुपरवाइजर यांपैकी कोणाचेही पण तुम्हाला नीट ओळखत असलेल्या व्यक्तिकडून शिफारसपत्र मागून घ्या. एकूण तीन शिफारसपत्रे तयार ठेवा. शिफारसकर्त्यांचे ईमेल कॉमनअॅपसाठी आवश्यक आहेत.

एसओपी/ स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा पर्सनल एसे — विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे प्रामाणिक आणि प्रभावी अनुभव मांडणारा निबंध म्हणजे एसओपी. एसओपीला Common App Essay असंही म्हटलं जातं. एसओपीबद्दल सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या लेखामध्ये पाहिलेली आहे. विद्यार्थ्यांचे अनुभव, उद्दिष्टे आणि व्यक्तिमत्त्व एसओपीमधून दिसायला हवे. कॉमनअॅपवर अर्ज भरताना एसओपीमधील माहिती वापरता येते.

सप्लीमेंटल एसेज — कॉमनअॅपवर अर्ज भरताना सप्लीमेंटल एसेज हा एक विभाग असतो. त्यामध्ये पाच ते सहा प्रश्नवजा निबंध विचारलेले असतात. त्यांची उत्तरे विचारपूर्वक लिहिणे आवश्यक आहे. दरवर्षी प्रत्येक विद्यापीठानुसार हे विषय बदलतात.

आर्थिक कागदपत्रे — बँक स्टेटमेंट किंवा सॉल्व्हन्सी लेटर कॉमनअॅपवर अर्ज भरताना अपलोड करावे लागत नाही. मात्र अर्ज भरल्यानंतर लगेचच विद्यापीठाला ते मेल करावे लागते किंवा त्यांच्या पोर्टलवर अपलोड करावे लागते.

विद्यार्थ्यांसाठी:

अर्जाच्या प्रक्रियेपासून ते प्रवेश मिळेपर्यंत परदेशी अर्जप्रक्रिया जास्त खर्चिक आहे. अर्ज करताना अर्जाची फी मात्र प्रत्येक देशातील विद्यापीठावर अवलंबून असते. प्रत्येक विद्यापीठाची फी तुम्ही विद्यापीठाकडून माफ करून (वेव्ह ऑफ) घेऊ शकता. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ‘ऑफिस ऑफ अॅडमिशन्स’ला मेल लिहावा लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

theusscholar@gmail. com