Success Story Of Shreyans Gomes In Marathi : प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यात होणारी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे. कारण या परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यावर आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकारी यांसारख्या प्रतिष्ठित पदांवर सरकारी नोकरी मिळते, त्यामुळे हे स्वप्न मनात धरून असंख्य विद्यार्थी या परीक्षेला बसतात. पण, प्रत्येक जण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. लाखो उमेदवार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे दिवसरात्र अभ्यास करतात.

तर आज आपण अशाच एका श्रेयांस गोम्स या विद्यार्थ्याचा प्रवास जाणून घेणार आहोत, ज्याच्या यशाच्या मार्गावर आलेला कोणताही अडथळा त्याला रोखू शकला नाही. कर्नाटकातील २६ वर्षीय श्रेयांस गोम्सने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२५ च्या परीक्षेत ऑल इंडिया रँक ३७२ मिळवला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबात आणि संपूर्ण कर्नाटक राज्यात आनंदाची लाट पसरली आहे. सर्वात उल्लेखनीय म्हणजे श्रेयांसने कोचिंग न घेता या परीक्षेत यश मिळवले आहे.

श्रेयांस गोम्स हा कर्नाटकातील उडुपी येथील उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुरुडेश्वर येथील रहिवासी आहे. त्याने कर्नाटकातील मुडबिद्री येथील अल्वा कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. श्रेयस हा श्रीमंत कुटुंबातील नव्हता. त्याचे वडील कोकण रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर, तर आई गृहिणी होती. तसेच श्रेयांसला एक लहान भाऊ श्रेयथ आहे, जो सध्या मणिपालमध्ये शिक्षण घेतो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशसेवेची आवड (Success Story)

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना श्रेयांसला प्रशासन आणि देशसेवेची आवड निर्माण झाली. या आवडीमुळे त्याने लगेचच स्वतःहून यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात तो फक्त प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला आणि मुख्य परीक्षेत तो अयशस्वी झाला. दुसऱ्या प्रयत्नात तो प्राथमिक परीक्षाही उत्तीर्ण झाला नाही. पण, या अपयशामुळे तो नागरी सेवेत सामील होण्याच्या त्याच्या ध्येयापासून परावृत्त झाला नाही आणि त्याने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. तेव्हा प्रारंभिक, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसह यूपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला.