वृषाली धोंगडी
रेल्वेमेन ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. त्यामुळे भोपाळ गॅस दुर्घटनेने झालेल्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत. भारताने १९८४ साली जगातील सर्वांत वाईट रासायनिक (औद्योगिक) आपत्ती ‘भोपाळ गॅस दुर्घटना’ पाहिली आहे. भोपाळ गॅस दुर्घटना ही इतिहासातील सर्वांत विनाशकारी रासायनिक दुर्घटना होती; जिथे मिथाइल आयसो सायनेट (MIC) या विषारी वायूच्या अपघाताने हजारो लोक मरण पावले. त्यानिमित्ताने आपण औद्योगिक आपत्तीविषयी जाणून घेऊ.
औद्योगिक आपत्ती ही कोणत्याही रासायनिक, यांत्रिक, नागरी, विद्युत किंवा इतर प्रक्रियांमुळे उदभवणारी आपत्ती आहे. तसेच ही एक मानवी आपत्ती आहे. आधुनिक औद्योगिक प्रणालीच्या केंद्रस्थानी रसायने असल्याने, सरकारी, खासगी क्षेत्र आणि मोठ्या प्रमाणावर समुदायामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील जैवविविधतेचे वर्गीकरण किती भौगोलिक विभागात करण्यात आले?
रासायनिक आपत्ती मानवांवर होणार्या परिणामांमध्ये अत्यंत क्लेशकारक असू शकतात आणि त्यामुळे जीवितहानी होते. तसेच निसर्ग आणि मालमत्तेचेही नुकसान होते. रासायनिक आपत्तीमुळे सर्वाधिक जोखीम असलेल्या घटकांमध्ये प्रामुख्याने औद्योगिक प्लांट, त्यांचे कर्मचारी आणि कामगार, घातक रासायनिक वाहने, जवळपासच्या वसाहतींमधील रहिवासी, लगतच्या इमारती, रहिवासी व आजूबाजूचा समुदाय यांचा समावेश होतो. रासायनिक आपत्ती अनेक प्रकारे उदभवू शकतात.
औद्योगिक आपत्तीची कारणे
- १) प्रक्रिया आणि सुरक्षा प्रणाली अयशस्वी ठरणे : मानवी चुका, तांत्रिक चुका, व्यवस्थापन त्रुटी ही याची कारणे ठरू शकतात.
- २) आपत्ती टाळण्यासाठी वापरात येणारी संसाधने योग्य स्थितीत नसणे.
- ३) नैसर्गिक आपत्तींचा प्रेरित परिणाम : भूकंप, पूर यांसारख्या आपत्तीमुळे औद्योगिक क्षेत्रात साठवलेली रसायने बाहेर पडून अपघात होऊ शकतो.
- ४) रसायनांच्या वाहतुकीदरम्यान अपघात झाल्यास, हेसुद्धा औद्योगिक आपत्ती येण्याचे कारण ठरू शकते.
- ५) घातक कचरा प्रक्रिया/विल्हेवाट लावणे लावताना होणारे अपघात.
- ६) दहशतवादी हल्ला / अशांतता; ज्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील तोडफोड ही औद्योगिक आपत्ती येण्याचे महत्त्वाचे कारण आहे.
काही लोक या आपत्तीस नवीन रूप आणत आहे; ज्याला रासायनिक दहशतवाद, असे म्हणतात. देशद्रोही घटक या घातक रसायनाचा वापर दहशतवाद पसरविण्यासाठी करतात. ही रसायने वापरण्यास सोईस्कर आणि स्वस्त असतात. दहशतवादी मुख्यतः लोकांना घाबरवण्याचा, लक्ष वेधण्याचा किंवा अधिकृतपणे मान्यताप्राप्त सरकार किंवा गटाला कारवाई करण्यासाठी किंवा काहीही करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात.
भारतातील औद्योगिक आपत्ती
भारतात भोपाळ, चासनला खाण दुर्घटना (१९७५), सोमा खाण दुर्घटना (२०१४), जयपूर ऑईल डेपो आग, कोरबा येथील घटना, बॉम्बे पोर्ट विस्फोट, तमिळनाडू येथील थर्मल पॉवर स्टेशनमध्ये झालेली दुर्घटना यांसारख्या औद्योगिक दुर्घटना घडल्या आहेत. देशात गेल्या दशकात १३० छोट्या-मोठ्या रासायनिक आपत्ती घडल्या आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा वापर कसा होतो?
औद्योगिक आपत्तीवरील उपाय
देशात औद्योगिक आपत्ती उद्भवू नये म्हणून संस्थात्मक फ्रेमवर्क अस्तित्वात आहे. औद्योगिक क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या व्यवस्थापनाबाबत विविध कायदे अस्तित्वात आहेत. उदा. स्फोटक कायदा १८८४ , पेट्रोलियम कायदा १९३४, कारखाना कायदा १९४८, कीटकनाशक कायदा १९६८, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, मोटार वाहन कायदा १९८८, सार्वजनिक दायित्व विमा कायदा १९९१ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५.
भारत सरकारने रसायनांच्या सुरक्षेसंबंधी फ्रेमवर्क तयार केले आहे. भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) रासायनिक आपत्ती व्यवस्थापनावर अतिशय विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंत्रालये, विभाग आणि राज्य प्राधिकरणांना त्यांच्या तपशीलवार आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्यासाठी दिशानिर्देश प्रदान करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे रासायनिक आपत्ती सज्जता आणि प्रतिसादासाठी विविध स्तरांवर सुरक्षा पुरवते. NDMA ने सध्याच्या फ्रेमवर्कवर सुचवलेल्या सुधारणांसह देशातील भविष्यातील रासायनिक आपत्ती टाळण्यासाठी भारत सरकारला विशिष्ट इनपुट प्रदान केले आहेत. NDMA भारतात रासायनिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी CIFs (चिफ इन्स्पेक्टरेट ऑफ फॅक्टरीज)च्या सुधारणेवरही काम करीत आहे.