News Flash

करिअर मंत्र

आपली शैक्षणिक पाश्र्वभूमी आपण कळवलेली नाही.

डॉ. श्रीराम गीत

माझे बीई मेकॅनिकल २०१७ मध्ये झाले आहे. मला जर्मनीमध्ये नोकरी करायची किंवा एमबीए करायचे किंवा दोन्ही करायची इच्छा आहे. आता जर्मन भाषेचे ए१ पूर्ण झाली. पुढच्याही करणार आहे. यापुढचा प्रवास कसा असावा?

सुमित सोनार

आपली शैक्षणिक पाश्र्वभूमी आपण कळवलेली नाही. उदाहरणार्थ, बीईच्या एटीकेटी, अ‍ॅव्हरेज मार्क, फायनलचे मार्क वगैरे. त्यामुळे तिकडे जाण्यासाठीच्या किमान गरजा फक्त मी इथे देत आहे. शिकण्यासाठी जर्मनची बी१ ची चांगली पातळी घेऊन उत्तीर्ण होणे, फायनल बीईला फर्स्ट क्लास व सातत्याने चांगले गुण ही किमान गरज आहे. जर्मनीत नोकरी मिळण्यासाठी जर्मन भाषेच्या सर्व पातळ्या चांगल्या येणे गरजेचे आहे. सध्या जर्मनीत नोकरी मिळणे सोपे नाही. शिक्षणासाठी हुशार विद्यार्थ्यांना निमंत्रण आहे. काही वर्षे अनुभवानंतर एमबीए शक्य होईल, पण त्याचा भारतासंदर्भात उपयोग राहणार नाही. तिथे वा युरोपात नोकरी मिळाली तर ठीक, अन्यथा फक्त पैसे वाया जातील. भारतातील नोकऱ्यांची स्थिती सध्या युरोपपेक्षा खूप पटींनी चांगली आहे. एवढेच मी सर्व वाचकांसाठी नमूद करू इच्छितो.

माझे बीएस्सी व नंतर एमबीए मार्केटिंग झाले आहे. मी बीडचा आहे. मला त्यानंतरच्या नोकरीच्या संधी व प्रगतीच्या संधी कोणत्या प्रकारे असतील?

दर्पण भिसे

आपले नाव दर्पण आहे. आपल्या शिक्षणाचे व त्यानंतर घेतलेल्या एमबीए पदवीचे आपल्या समोरच्या प्रतिबिंबातून नीट दर्शन घेतले तर? दर्पण म्हणजे आरसा या अर्थाने स्वत:कडे नीट पाहिलेत तर आपल्या प्रश्नाचे उत्तर सहज सापडेल. आपण बीएस्सीचा विषय कळवलेला नाही. पण त्याच विषयातील अनेक गोष्टींचे मार्केटिंग करणाऱ्या अनेक कंपन्या अगदी बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अंबाजोगाई या आपल्या परिसरातच असणार आहेत. पुस्तकी एमबीए पूर्ण झाले, पण असा विचारच झाला नाही त्यामुळे नोकरीत प्रगतीच्या संधी आपणाला सापडत नाहीयेत.

प्रथम मार्केटिंगमधून सायन्स पदवीधराला काय उपलब्ध होऊ शकते, त्याची नोंद घेऊयात. बीबियाणे, कीटकनाशके, खते, रसायने, खाद्यपदार्थ, घरगुती वापराच्या विविध उपकरणांसंदर्भात हा पदवीधर सहजगत्या शिरकाव करून घेऊ शकतो. याची बाजारपेठ प्रत्येक खेडय़ात, तालुका, जिल्हा, छोटी शहरे यामध्ये विस्तारलेली आहे. ग्रामीण मार्केटिंगसाठीची गरज भागवणारे प्रशिक्षित तरुण अक्षरश: शोधून शोधूनसुद्धा मिळत नाहीत हा एक कठीण प्रश्न आहे. कारण एकच इथे काम करण्याची तयारी नसलेले पुस्तकी एमबीए नोकरीच्या संधी व प्रगती कशात याचा विचार करण्यात वेळ घालवतात. भारतातील सर्वात मोठी रुरल रिलेशन्स व मार्केटिंग चालवणारे संचालकांचे एक वाक्य इथे मुद्दाम लिहीत आहे. ते म्हणाले मी एका कामाकरता सुमारे पाचशे पदवीधरांचे इंटरव्हय़ू घेतले, पण एकानेही काम काय असेल याविषयी कसलीही चौकशीसुद्धा न करता पगार किती देणार याची मलाच विचारणा केली. करिअर मंत्र या सदरातून केवळ उत्तरे न देता एकाच्या प्रश्नातून किमान शंभर तत्सम वाचकांना, पदवीधरांना, पालकांना निदान एखादा विचार, एखादी दिशा देण्याची संधी मला शोधावीशी वाटते. बीएस्सी ही पदवी म्हणून न पाहता त्यातील प्रत्येक विषयातून आसपास काय घडते हे पाहणारा आपली दमदार वाटचाल सुरू करतो, मात्र तसे न करणारे अक्षरश: हजारो पदवीधर दरवर्षी बेकार राहतात. प्रथम उमेदवारी, त्या दरम्यान मिळतो तो पॉकेट मनी, नंतर नोकरीतील प्रशिक्षण व नंतर प्रत्यक्ष नेमणूकपत्र व त्यानंतर सुरू होतो तो पगार, हा क्रम अनुभवलेल्या सुजाण पालकांनीसुद्धा आपल्या शिकणाऱ्या मुलामुलींना सांगणे जास्त गरजेचे झाले आहे.

मी अर्थशास्त्र विषयातून एमए करीत आहे. मला सोसायटी व्यवस्थापनात कामाचा अनुभव आहे. मला एमबी करणे फायद्याचे ठरेल काय? आणखी कोणता कोर्स करावा? म्हणजे मला चांगल्या कामांची संधी प्राप्त होईल?

नीलेश गवळी

सोसायटी व्यवस्थापनात कामाचा अनुभव आहे, असे आपले वाक्य आहे. तसेच एमए करत असल्याचा उल्लेख आहे. एमबी नसून एमबीए अशी पदवी असते ही चूक आपण अजाणतेपणाने का होईना केली आहे. यातील प्रत्येक वाक्यातून आपण पुढे जाऊयात. म्हणजेच ‘मला चांगल्या कामाची संधी प्राप्त होईल’ या तुमच्या शेवटच्या वाक्यापर्यंत पोहोचता येईल.

आपण काम करत असलेली सोसायटी किमान पंधरा व सहसा वीस-पस्तीस सभासदांची असावी. या साऱ्याचे हिशेब, वसुली, पगार व देखभाल याची पुरेपूर जाण आपल्याला झाली तर सोसायटीमधील विविध सभासदांची देखभाल, रंगरंगोटी, दुरुस्त्या, विविध बिले भरणे ही कामे सेवाक्षेत्राशी संबंधित एजन्सी काढून आपण करायला सुरुवात केलीत तर? यात यशस्वी झालात तर आसपासच्या व ओळखीच्या सोसायटय़ांमध्ये आपला शिरकाव होऊ शकतो ना? एमबीएचा कोर्स संपूर्णपणे इंग्रजीमधून व अनेक नव्या विषयांतून जातो. जी व्यक्ती अजाणतेपणानेसुद्धा त्याचा चुकीचा उल्लेख करते त्याने तो पूर्ण करूनही फायदा होणार नाही. म्हणून त्याचा विचार करू नये. करायचाच झाला तर त्याची प्रवेश परीक्षा हाही एक मोठा अडथळा ठरेल. आणखी कोणता कोर्स करावा? याची दोन उत्तरे आहेत. टॅली व अकाउंट्स यातील कामे कळत असतील, सोसायटीची अशी कामे करत असाल तर डीटीएल म्हणजे डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ करावा.

अन्यथा बिल्डिंग सुपरवायझरसंदर्भातील छोटा कोर्स करावा. त्याचा देखभालीच्या कंत्राटासाठी उपयोग होईल.

चांगल्या कामाची संधी प्रत्येक जणच शोधत असतो. अर्थप्राप्ती हे ध्येय गाठण्यासाठी हातातील काम उत्तम पद्धतीत पार पाडणारासुद्धा अशी संधी नक्की मिळवत असतो. हे आपल्या प्रश्नातून विस्ताराने दिलेल्या या उत्तरात लिहीत आहे. कारण फक्त पदवीच्या जोरावर कामाच्या संधी सापडण्याचे दिवस संपून दहा वर्षे तरी झाली आहेत. पदवी अधिक कौशल्य यातूनच संधी हाती चालत येणार आहेत.

विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र

या सदरासाठीचा ई-मेल आयडी बदललेला आहे. यापुढे आपले प्रश्न  career.mantra@expressindia.com येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी.  त्यामुळे उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 12:54 am

Web Title: career guidance 50
Next Stories
1 नोकरीची संधी
2 यूपीएससीची तयारी : प्रश्नांचा आढावा
3 विद्यापीठ विश्व : शैक्षणिक तीर्थक्षेत्र
Just Now!
X