News Flash

पुढची पायरी : स्वत:चा ब्रँड बनवताना..

अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी की असे स्व-ब्रँडिंग कुठेही शिकायला मिळत नाही.

ब्रँडचा उपयोग लोकप्रियता वाढविण्यासाठी होतो.

आज कुठेही बघा, प्रत्येकाचा एक ब्रँड असतो; ती मग वस्तू असो, किंवा कंपनी किंवा एखादा माणूस. त्याचा एखादा गुणधर्म जरी आपल्याला कळला तरी त्या गोष्टीची पूर्ण प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. जसे की, दररोजच्या वापरातील टूथपेस्ट, फ्रीजसारख्या घरगुती वस्तू बनविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी किंवा समाजकारणामुळे ख्यातकीर्त झालेली व्यक्ती. थोडक्यात काय ‘ब्रँडेड’ गोष्टींची त्यांच्या अशा एकमेवद्वितीय गुणधर्मामुळे ‘ओळख’ (identity) निर्माण होते. या ब्रँडचा उपयोग लोकप्रियता वाढविण्यासाठी होतो.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्वत:चे असे ब्रँडिंग जाणीवपूर्वक करावे का? काही जणांचा असा दृष्टिकोन असतो की स्वत:चा उदोउदो करण्याचे माझ्या स्वभावातच नाही; त्यामुळे असे स्व-ब्रँडिंग करणे मला जमत नाही. असे कुणी करत असल्यास विविध भल्याबुऱ्या विशेषणांनी आपण त्याची संभावना करतो. तथापी सध्याच्या अतिस्पर्धात्मक व अतिवेगवान जगात तुम्ही दाखवत असलेल्या वैयक्तिक गुणधर्माची दखल घ्यायला व प्रशंसा करायला खरे म्हणजे कुणाला वेळ नाही. दररोजच्या व्यावसायिक कामाचा रेटाच एवढा प्रचंड आहे की, तुम्हीच तुमचे ब्रँडिंग केले नाही तर लवकरच तुम्ही मागे पडाल व कदाचित विस्मृतीतही जाल.

अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी की असे स्व-ब्रँडिंग कुठेही शिकायला मिळत नाही. ब्रँडिंग न केलेल्या व्यक्तींना ब्रँडिंगचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्याकडून काही शिकण्याची अपेक्षाच नको. जे ब्रँडिंगमध्ये यशस्वी झाले आहेत त्यांना स्वत:बद्दल विचार करताना तुमच्यासाठी वेळच नसतो. नोकरीच्या या पहिल्या वर्षांत अशी स्व-ब्रँडिंगची सुरुवात करणे केव्हाही चांगलं. कारण या प्रयत्नांमुळे संस्थेमध्ये तुमची एक सकारात्मक ओळख निर्माण होते. शिवाय लोकप्रियताही वाढते.

अर्थात स्व-ब्रँडिंग म्हणजे केवळ आत्मप्रौढी मिरवणे नव्हे. एखाद्या वस्तूचे ब्रँडिंग करण्याएवढीच ती दीर्घकालीन चालणारी एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. ती आपण नीट समजून घेऊन याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. तुम्ही एक ब्रँड म्हणून तयार होताना, सर्वजण तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून न्याहाळत असतात व त्यांच्या मापदंडानुसार त्यांची मते बनवतात. अशा अनेकांची तुमच्याबद्दलची मते जेव्हा जवळ जवळ समान असतात तेव्हाच तुमचा एक ‘ब्रँड’ तयार होतो.

तुमचा ब्रँड तयार होताना तो इतर कुठल्याही ब्रँडप्रमाणे शक्तिमान (Powerful), अस्सल (Authentic), सातत्यपूर्ण (Consistent), दृश्य (Visible), बहुमोल (Valuable) झाला पाहिजे. स्व-ब्रँडिंग करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढे दिलेल्या पाच घटकांचा प्रामुख्याने विचार होतो.

स्वयंप्रतिमा (Self Image) – आपण मनात जो विचार करतो तोच आपल्या वागण्यात दिसतो. जसे घाबरट, धाडसी, विश्वासू, प्रामाणिक, जबाबदार, नम्र, उद्धट इ. ज्या विचारांनी आपली सकारात्मक प्रतिमा लोकांसमोर येईल तेच विचार आपल्या मनात पाहिजेत.

प्रतिमा विकास (Image Building) – लोकांना तुम्ही कसे दिसायला हवे आहात? तुमच्या दिसण्याप्रमाणेच लोक तुमच्या प्रतिमेचे आकलन करतील. जसे – दु:खी, आनंदी, निराश, स्थितप्रज्ञ इ. पण सर्वाना आंनदी दिसणारी, सुहास्य माणसेच जास्त आवडतात.

संवाद कौशल्ये (Communication Skills) -यामध्ये अनेक प्रकारांच्या कौशल्यांचा समावेश आहे. सादरीकरणाची कला, यशस्वी वाटाघाटी करण्याची कला, व्यावसायिक लिखाणाची कला, लोकांवर प्रभाव पाडण्याची कला, आपले विचार पटवून द्यायची कला, समूहात संवाद साधावयाची कला, विभिन्न संस्कृतीची पाश्र्वभूमी असलेल्या सहकाऱ्यांबरोबर काम करायची कला इ. ही सर्व कलाकौशल्ये आत्मसात करणे हे स्व-ब्रँडिंगसाठी आवश्यकच आहे.

परस्पर संबंध (Interpersonal Skills) – स्व-ब्रँडिंग करण्यातील हा तर महत्त्वाचा घटक. कारण शेवटी ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करता तेच तुमचे एक व्यक्ती म्हणून मूल्यमापन करतात. नेतृत्वगुण, समूहाबरोबर काम करावयाची कला, मैत्री करण्याची कला यांचा समावेश होतो.

भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence)- स्वत:च्या भावना समजावून घेऊन त्यावर नियंत्रण मिळवणे, सहकाऱ्यांच्या भावना समजावून घेऊन त्यांचा योग्य तो आदर करणे आणि कधीही निराश न होता स्वयंप्रेरित करणे या बाबींचा यात समावेश होतो.

या सर्वाचा जाणीवपूर्वक अभ्यास व अंमलबजावणी करून तुम्ही स्व-ब्रँडिंग विकसित करू शकता.

 डॉ. जयंत पानसे dr.jayant.panse@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 5:54 am

Web Title: how to build your own brand
Next Stories
1 नोकरीची संधी
2 करिअरमंत्र
3 एमपीएससी मंत्र : कृषी विज्ञान आणि कृषी  अभियांत्रिकीचा आढावा
Just Now!
X