News Flash

एमपीएससी मंत्र : मानवी हक्क – विश्लेषणात्मक अभ्यास

राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर-३च्या पायाभूत व पारंपरिक अभ्यासाबाबतची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली.

राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर-३च्या पायाभूत व पारंपरिक अभ्यासाबाबतची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली. या घटकांचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरुवातीला केला व नोट्स काढल्या तरी चालेल किंवा संबंधित उपघटकाच्या अभ्यासाबरोबर केला तरी चालेल. या लेखामध्ये ‘मानवी हक्क’ या उपघटकाच्या अभ्यासाबाबत चर्चा करण्यात येत आहे.
मानवी हक्कांपासून वंचित राहिल्यास कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीस जाणवणाऱ्या समस्या सर्वप्रथम समजून घ्यायला हव्यात. निरक्षरता, बेरोजगारी, दारिद्रय़, हिंसा, शोषण, गुन्हेगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार इत्यादी समस्यांचे मानवी हक्कांच्या संदर्भाने समस्यांचे स्वरूप, त्यांची कारणे, परिणाम, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे विश्लेषण करणे आवश्यक आहे. याबाबत काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे अहवाल असल्यास त्यांचा आढावा घ्यायला हवा. या अनुषंगानेच जागतिकीकरणामुळे या समस्यांच्या स्वरूपामध्ये, तीव्रतेमध्ये होणाऱ्या परिणामांबाबत वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट इत्यादी माध्यमांतून होणारी विश्लेषणात्मक चर्चासुद्धा पाहायला हवी.
या समस्यांवरील पायाभूत उपाय म्हणून मानवी हक्क व सभ्यतेचे पालन करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज समजून घ्यावी. असे प्रशिक्षण कशा प्रकारे, कोणत्या माध्यमातून देता येऊ शकते याबाबत चर्चा व चिंतन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने मूल्ये व नीतितत्त्वे यांची जोपासना हा घटक महत्त्वाचा आहे. मूल्ये व नीतितत्त्वांची मानवी हक्क व संसाधन विकासातील भूमिका महत्त्वाची आहे. त्यांची जोपासना म्हणजेच मानवी सभ्यतेच्या पालनासाठीचे प्रशिक्षण हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कुटुंब, शिक्षणसंस्था या औपचारिक व अनौपचारिक संस्थांच्या माध्यमातून मूल्ये व नीतितत्त्वे कशा प्रकारे रुजविण्यात येतात त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. धर्म व प्रसारमाध्यमे यांद्वारे होणारे मूल्यशिक्षण हा चिंतन व विश्लेषणाचा विषय आहे.
अभ्यासक्रमामध्ये काही व्यक्तिगट स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत व त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. महिला, बालके, युवक, वृद्ध, अपंग व्यक्ती, सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग, आदिम जमाती, कामगार व आपत्तिग्रस्त/प्रकल्पग्रस्त व्यक्ती असे हे व्यक्तिगट आहेत. या व्यक्तिगटांची वैशिष्टय़े व त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, व्याख्या इत्यादी व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर या व्यक्तिगटांच्या समस्यांचा मुद्देसूद अभ्यास सुरू करायला हवा. सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या / विमुक्त जमाती (VJ/NT), इतर मागास प्रवर्ग (OBC) या सामाजिक घटकांचा स्वतंत्र व समांतरपणे अभ्यास आवश्यक आहे. या सामाजिक घटकांबाबत राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदींचा नोट्समध्ये समावेश करावा व हे संदर्भ इतर विश्लेषणात्मक मुद्दय़ांचा अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवावेत.
या प्रत्येक व्यक्तिगटासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक इत्यादी प्रकारच्या समस्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रत्येक प्रकारासाठी समस्येचे स्वरूप, कारणे, परिणाम, उपाय, संबंधित संस्था, संघटना, आयोग, राबविण्यात येणाऱ्या योजना असे पलू पाहायला हवेत.
समस्यांची कारणे व परिणामांबाबत आवश्यक अभ्यासाबाहेरचे वाचन स्वत:चे विश्लेषण, चिंतन असा अभ्यास आवश्यक आहे. उपायांचा विचार करताना विविध कायदे, शासकीय योजना, त्या त्या क्षेत्रातील पुरस्कार, महत्त्वाच्या संस्था व त्यांचे प्रस्ताव तसेच घोषणा व करार यांचा समावेश करायला हवा. शासकीय योजनांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावेत ’ शिफारस करणारा आयोग / समिती ’ योजनेचा उद्देश ’ योजनेबाबतचा कायदा ’ पंचवार्षकि योजना ’ योजनेचा कालावधी ’ योजनेचे स्वरूप व बारकावे ’ लाभार्थ्यांचे निकष ’ खर्चाची विभागणी ’ अंमलबजावणी यंत्रणा ’ योजनेचे मूल्यमापन.
पेपर-४ मध्ये पंचवार्षकि योजनांचा अभ्यास करताना या व्यक्तिगटांशी संबंधित कार्यक्रम, योजना किंवा धोरणाचा समावेश असेल तर त्या पंचवार्षकि योजनेचा संदर्भ देऊन त्या कार्यक्रम/योजना किंवा धोरणाचा त्या त्या व्यक्तिगटासाठीच्या नोट्समध्ये समावेश करावा.
कुठल्याही सामाजिक व्यक्तिगटामध्ये समाविष्ट नसलेला मात्र विशिष्ट हक्क असणारा एक गट म्हणजे ‘ग्राहक’. यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदींचा अभ्यास आवश्यक आहे. या कायद्याच्या अनुषंगाने ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंच / संस्थांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करावा –
’ संस्थेतील विविध पातळ्या ’ प्रत्येक पातळीवरील मंचाची रचना ’ प्रत्येक पातळीवरील मंचाची कार्यपद्धती ’ प्रत्येक पातळीवरील मंचाचे अधिकार, जबाबदाऱ्या, काय्रे इत्यादी. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींचा अभ्यास पेपर-२ मध्ये करण्यात आलेला असेलच. मात्र नोट्सचा वापर पेपर-२ व ३ या दोन्हींसाठी करायला हवा. या संपूर्ण अभ्यासामध्ये प्रत्येक उपघटक / सामाजिक व्यक्तिगटाच्या हक्कांशी / गरजांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
‘मानवी हक्क’ घटकाची संपूर्ण अभ्यासपद्धती या लेखामध्ये विषद करण्यात आली. पुढील लेखामध्ये ‘मानव संसाधन विकास’ घटकाच्या विश्लेषणात्मक अभ्यासाचे धोरण व अभ्यासपद्धती विषयी चर्चा करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:08 am

Web Title: preparation for mpsc exam 2
Next Stories
1 बांधकाम क्षेत्र : एक उत्तम पर्याय
2 करिअरनीती : नोकरीतील समाधान
3 नोकरीची संधी
Just Now!
X