03 March 2021

News Flash

यूपीएससीची तयारी : चालू घडामोडींचे महत्त्व

चालू घडामोडींच्या संदर्भात लक्षात घ्यावयाची आणखी एक बाब म्हणजे संदर्भ स्रोत होय.

पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या प्रत्येक टप्प्यावर करावा लागणारा वर्तमान अथवा चालू घडामोडींचा अभ्यास हे यूपीएससी परीक्षेचे स्पर्धा परीक्षा म्हणून असणारे ठळक वेगळेपण आहे. सर्वसाधारणत: पूर्वपरीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नात मुख्यत: तथ्यात्मक व माहितीपर आयामावर लक्ष केंद्रित केले जाते. मुख्य परीक्षेत तथ्यात्मकबरोबरच विश्लेषणात्मक अंग महत्त्वाचे ठरते आणि मुलाखतीत या दोन्ही आयामांच्या आकलनावर आधारित स्वत:चे मतप्रतिपादन निर्णायक ठरते. प्रस्तुत लेखात पूर्वपरीक्षेतील ‘चालू घडामोडीं’ना अनुलक्षून चर्चा केली जाणार आहे.

चालू घडामोडी म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्मपणे विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरते. त्याआधारे, ‘नेमक्या कोणत्या कालखंडातील घडामोडींची तयारी करायची’ या यक्षप्रश्नाचे उत्तर शोधता येते. म्हणजेच पूर्वपरीक्षेच्या आधी किती वर्षांपर्यंतच्या घडामोडी पाहव्यात हे ठरवता येते. याबाबत असे दिसून येते की, परीक्षेपूर्वीच्या आधीच्या एका वर्षभरातील घडामोडींवर जोर दिला जातो. स्वाभाविकच त्या वर्षभरातील घडामोडींची सविस्तर तयारी करणे आवश्यक ठरते. तथापि, काही वेळा चच्रेत असलेल्या अथवा काहीशा मागे पडलेल्या विषयाबाबत २ वष्रे अथवा त्याहीआधी घडलेल्या घडामोडींबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे चालू वर्षांतील घडामोडींची तयारी करताना त्यांची पाश्र्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून संबंधित मुद्दय़ाविषयी वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनांचीही दखल घेता येऊ शकते. वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि वार्षकिीसारख्या संदर्भ स्रोतांतून प्रत्यक्ष तयारी सुरू केल्यास या बाबी लक्षात येऊ लागतात.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ‘कोणकोणत्या पातळ्या व क्षेत्रांसंदर्भातील चालू घडामोडींची तयारी करायची’ यासंबंधीचा निर्णय होय. स्तर अथवा पातळ्यांच्या अनुषंगाने विचार केल्यास प्रथमदर्शनी राज्य (अत्यंत लक्षणीय संदर्भात), राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा तीन पातळ्या अधोरेखित करता येतात. या पातळ्यांवरील कोणकोणत्या घडामोडींचा अभ्यास करायचा याचे उत्तर घडामोडींची विविध क्षेत्रे लक्षात घेऊन देता येते. ढोबळपणे विचार करता सामाजिक, सांस्कृतिक, आíथक, राजकीय, भौगोलिक, विज्ञान-तंत्रज्ञान आणि क्रीडा असे प्रमुख वर्गीकरण करून पुन्हा त्याअंतर्गत उपविभाग करावेत. अर्थात, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि प्रत्यक्ष तयारी या दोहोंच्या आधारे या वर्गीकरणाचा अंदाज घेता येतो.

चालू घडामोडींसंबंधी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे नेमके स्वरूप काय, ते कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात हे जाणून घेणे कळीचे ठरते. ते निव्वळ तांत्रिक स्वरूपाची आणि सूक्ष्मातील सूक्ष्म माहिती विचारणारे असतात की, सांख्यिकी आणि आकडेवारीवर आधारित असतात अथवा संबंधित घडामोडीच्या विश्लेषणात्मक अंगाविषयी असतात ही महत्त्वपूर्ण बाब नेमक्या व अचूकपणे लक्षात घेणे गरजेचे असते. बऱ्याचदा चालू घडामोडी म्हणजे तथ्य, आकडेवारी आणि तांत्रिक माहिती असे समीकरण मानून विद्यार्थी या घटकाची अत्यंत यांत्रिकपणे तयारी करतात. तसे न करता, मागील वर्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे बारकाईने अवलोकन करूनच चालू घडामोडींच्या तयारीस सुरुवात करावी. यासंदर्भात तथ्य, माहिती आणि विश्लेषण याचा मेळ साधणारे धोरणच उपयुक्त ठरते हे लक्षात घ्यावे. अशा रीतीने, मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाद्वारे चालू घडामोडींचे स्वरूप, व्याप्ती लक्षात घेऊनच अभ्यासाची दिशा ठरवावी.

चालू घडामोडींच्या संदर्भात लक्षात घ्यावयाची आणखी एक बाब म्हणजे संदर्भ स्रोत होय. बरेच विद्यार्थी या घटकासाठी केवळ तयार (रेडीमेड) स्रोतांवर विसंबून राहतात. त्याऐवजी एक प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्र, एक इंग्रजी वर्तमानपत्र, योजना व कुरुक्षेत्र यासारखी नियतकालिके आणि भारत वार्षकिी या प्रमुख आणि प्राथमिक संदर्भ स्रोतांचा वापर करावा. त्यामुळे एका बाजूला चालू घडामोडींच्या तयारीचा आवाका वाढवता येतो आणि दुसऱ्या बाजूला विविध संदर्भावर प्रक्रिया करून त्यातून चालू घडामोडी अधोरेखित करण्याची सवयही विकसित होते. विविध संदर्भाचे स्वयंवाचन-आकलन केल्यामुळे या घटकाचे आकलन व्यापक व प्रभावी करता येते.

शेवटी, चालू घडामोडींच्या तयारीचे योग्य नियोजन आखणे कळीचे ठरते. त्यातही, वेळेचे नियोजन महत्त्वपूर्ण बनते. वर्तमानपत्रांच्या वाचनासाठी दैनंदिन वेळापत्रकातील किमान दोन तास राखीव ठेवावा. नियंतकालिकांच्या वाचनासाठी आठवडय़ातील एक दिवस द्यावा आणि वार्षकिीसारख्या पुस्तकांसाठी त्यातील विषय व प्रकरणानुसार मासिक नियोजनातील काही दिवसांचा वेळ राखीव ठेवावा. प्रत्येक महिन्यातील चालू घडामोडींची उजळणी करण्यासाठी त्या महिन्याच्या शेवटचा एक-दोन दिवसांचा कालावधी देता येऊ शकतो. अर्थात प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर आपापल्या सोयीनुसार यात फेरबदल करून पोषक वेळापत्रक ठरवता येऊ शकते, यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 5:07 am

Web Title: upsc exam preparations ias preparation tips upsc exam preparation tips
Next Stories
1 वेगळय़ा वाटा : खाद्यचित्रांची रंगत
2 नोकरीची संधी
3 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : सिंगापूरमध्ये एमबीएची संधी
Just Now!
X