25 February 2021

News Flash

यूपीएससीची तयारी : उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे

आधुनिक काळातील समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करणारी, प्रत्येक व्यक्तीला एकच दर्जा देणारी अशी ही चौकट आहे.

मागील लेखात आपण उपयुक्ततावादाची ओळख करून घेतली. त्यातील दोषही आपण पाहिले. या दोषांवर मात करण्यासाठी म्हणून, जे एस मिलने सुखाचा दर्जा ठरवण्याचा प्रयत्न केला.

सुखाचे प्रकार – उच्च सुख व नीच सुख असे सुखाचे प्रकार जे एस मिलने मांडले. त्याच्या मते, मानवी समूह म्हणून आपण कोणत्या सुखाची निवड करतो, त्या सुखाचा नतिक दर्जा कोणता हे तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते. सर्वाना सुख देणारी कृती नतिकदृष्टय़ा योग्य असेलच असे नाही. म्हणून समूह म्हणून निवड करत असताना आपण कायम उच्च नतिक सुखाची निवड केली पाहिजे. अशा प्रकारे मिल त्याचा युक्तिवाद सुधारित स्वरूपात मांडतो. अशा रीतीने सुखाविषयी तो उपयुक्ततावाद मांडतो. सुख उपयुक्त भावना आहे. असा तो दावा करतो. म्हणून त्याच्या सुखवादास ‘उपयुक्ततावाद’ असे म्हणतात. प्रत्येकाला म्हणजेच सर्वाना सुख हवे असते. असा दावा त्यात आहे. म्हणून त्यास ‘सार्वत्रिक सुखवाद’ असेही म्हटले आहे.

या संकल्पनेला धरून आयोगाने नेमके आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.

The good of an individual is contained in the good of all.l What do you understand by this statement? How can this principle be implemented in public life? (150 words, 10 marks, December 2013)

‘व्यक्तीचे हित समूहाच्या हितातच सामावलेले असते.’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ कोणता? सार्वजनिक क्षेत्रामध्ये वरील तत्त्व कशा पद्धतीने लागू करता येऊ शकते? (१५० शब्द, १० गुण, डिसेंबर २०१३)

वरील प्रश्नामध्ये उपयुक्ततावादी विचारसरणीला धरून विधान देण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनामध्ये उपयुक्ततावादी धोरण अवलंबण्याचे काही फायदे असू शकतात का? असा विचार करणारे हे विधान आहे. उमेदवारांनी या प्रश्नाचे उत्तर देत असताना पुढील टप्प्यांचा वापर करावा. जास्त लोकांच्या हितामध्येच व्यक्तीचे हित आहे,  या विधानाचा आणि उपयुक्ततावादी सिद्धांताचा स्पष्ट संबंध सांगावा. लोकशाही व्यवस्थेमध्ये उपयुक्ततावादी दृष्टिकोनाचा कुठे व कसा वापर केला जातो हे उदाहरण देऊन सांगावे. व्यक्ती म्हणून या तत्त्वाला धरून सार्वजनिक आचरण आपल्याला योग्य वाटते की उपयुक्ततावादातल्या त्रुटींमुळे आपल्याला अशी भूमिका घेणे योग्य वाटत नाही, हा विचार करून शेवटी स्वत:चे मत मांडावे. आपल्याला असे लक्षात येईल की, उपयुक्ततावाद आणि मिलचा सुखवाद या संकल्पनांबद्दल जर आपल्याला स्पष्टता असेल तर वरील प्रश्नाचे उत्तर नेमक्या १५० शब्दांत देणे शक्य होईल. आयोगाला अपेक्षित असलेली उत्तरे ठरावीक शब्द मर्यादेत देण्यासाठी या संकल्पनांचा सखोल अभ्यास आणि लिखाणाचा सराव करणे अत्यावश्यक ठरते.

‘All human beings aspire for happiness.’ Do you agree? What does happiness mean to you? Explain with examples. (150 words, 10 marks, December 2014)

सर्व व्यक्ती आनंदाची इच्छा करतात. तुम्ही या विधानाशी सहमत आहात का? तुमच्या मते, आनंदाची संकल्पना काय? उदाहरणासहित स्पष्ट करा. (१५० शब्द, १० गुण, डिसेंबर २०१४)

या प्रश्नामध्ये आयोगाने थेट ‘आनंद’ या संकल्पनेकडे नीतीशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितले आहे. उत्तर लिहीत असताना, प्राणी म्हणून आपण उत्क्रांतीच्या खूप पुढच्या पायरीवर आलो आहोत, इतर प्राण्यांपेक्षा असलेले आपले वेगळेपण आणि यामागील कारणांचा थोडक्यात आढावा घेतला जाऊ शकतो. नीतीशास्त्राच्या मदतीने आनंदाची नतिकता ठरवता येते हे आपल्याला समजते. आनंदाचा किंवा सुखाचा दर्जा ठरवता येतो, हे आपण मिलच्या विचारांच्या मदतीने पाहिलेच. मिलच्या या भूमिकेचा विचार करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. तसेच व्यक्ती म्हणून, या संकल्पनांच्या पाश्र्वभूमीवर आपल्याला ‘आनंद’ / ‘सुख’ या संकल्पनांबद्दल काय वाटते हे मांडायला हवे.

उपयुक्ततावादाची चौकट वापरून अनेक नतिक द्विधा असलेल्या समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो. यूपीएससीच्या पेपरमध्ये येणाऱ्या केस स्टडीज या प्रश्न प्रकारासाठीसुद्धा उपयुक्ततावादाचा वापर करता येऊ शकतो. उदाहरणादाखल इथे एक केस स्टडी दिली आहे व त्यासाठी आवश्यक प्रतिसादही मांडला आहे.

प्रश्न – डॉ. अबक हे उच्चविद्याविभूषित व सामाजिक बांधिलकीची उत्तम जाण असणारे डॉक्टर आहेत. जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयातून ते सरकारी दवाखान्यात गेली काही वष्रे कार्यरत आहेत. संपूर्ण आठवडा त्यांनी स्वत:च्या कामास झोकून घेतले आहे. बालकांमधील जन्मत: असणारे शारीरिक व्यंग दूर करण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये डॉ. अबक पारंगत आहेत. मात्र जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करता यावेत याकरिता त्यांना शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीसुद्धा काम करणे आवश्यक झाले आहे. यामुळे त्यांना स्वत:च्या दोन मुलांसोबत वेळ घालवणे शक्य होत नाही. शनिवार व रविवार काम न केल्याने डॉ. अबक यांच्या मिळकतीत फार मोठा फरक पडणार नाही, तसेच त्यांची मुले अधिक आनंदी होतील. मात्र यामुळे शेकडो बालकांना उपचार मिळण्यास विलंब होईल अथवा उपचार मिळणारच नाहीत.

प्रतिसाद – डॉ. अबक यांनी त्यांना जास्त समाधान कोणत्या प्रकारे वेळ घालवल्यावर मिळते हे काही प्रमाणात निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कोणत्या निर्णयामुळे किती जणांच्या समाधानात वाढ होते हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. जर त्यांनी आपल्या कामातून अंग काढून घेतले तर शेकडो मुले सुदृढ शरीरामुळे मिळणाऱ्या समाधानापासून वंचित राहतील. जर त्यांनी आपल्या कामाच्या दिवसांमध्ये अथवा तासांमध्ये वाढ केली तर त्यांची स्वत:ची दोन मुले पित्याच्या सहवासातून मिळणाऱ्या आनंदापासून व समाधानापासून वंचित राहतील. उपयुक्ततावादाच्या मांडणीनुसार डॉ. अबक यांनी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीसुद्धा काम करणे जास्त व्यक्तींच्या आनंदाला कारणीभूत ठरणारी गोष्ट आहे व म्हणून त्यांनी तसेच करणे जास्त योग्य आहे. परंतु या प्रकारच्या मांडणीत काही इतर समस्या आहेत का? आपण निश्चितच अशा गोष्टींचा विचार करू शकतो, ज्यामुळे डॉ. अबक यांना त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य देण्यात रस वाटेल. यामध्ये केवळ मुलांना हव्या असणाऱ्या जास्त वेळाचा सहभाग नाही तर डॉ. अबक यांना पिता म्हणून वाटणाऱ्या ‘नतिक जबाबदारी’चा देखील सहभाग आहे. मात्र उपयुक्ततावाद त्यांना अशा प्रकारे नतिक जबाबदारीवर आधारित निर्णय घेण्याची मुभा देत नाही. जेरेमी बेन्थम यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, ‘प्रत्येक व्यक्तीचे समाधान हे इतर कोणत्याही व्यक्तीच्या समाधानाइतकेच महत्त्वाचे आहे.’ म्हणूनच उपयुक्ततावाद कोणतीही नतिक जबाबदारी, जी भाऊ, वडील, बहीण या आणि इतर नात्यांतून येते त्यास वेगळे प्राधान्य देत नाही.

उपयुक्ततावादाच्या जरी काही मर्यादा असल्या तरीदेखील त्याची चौकट अनेक ठिकाणी उत्तम प्रकारे समस्या सोडवणुकीसाठी वापरता येते. आधुनिक काळातील समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करणारी, प्रत्येक व्यक्तीला एकच दर्जा देणारी अशी ही चौकट आहे. एकंदर समाजाच्या भल्यासाठी आपण जे निर्णय घेतो ते अनेकदा उपयुक्ततावादावर आधारित असतात. अशा प्रकारे प्रत्येक वैचारिक मांडणीतील बारकावे समजावून घेऊन त्यातील गुंतागुंत उमेदवाराने उलगडून दाखवणे गरजेचे आहे. पुढील लेखामध्ये आपण उपयुक्ततावादाबरोबरच हक्काधिष्ठित दृष्टिकोनावर आधारित काही उदाहरणे व त्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. तसेच एकापेक्षा अधिक विचारसरणींचे एकत्र विश्लेषण करण्याविषयी काही बाबी जाणून घेणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 12:38 am

Web Title: upsc preparations 3
Next Stories
1 करिअरमंत्र : हवी रेल्वेतील नोकरी!
2 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : समाजसेवेसाठी पाठय़वृत्ती
3 दुग्ध तंत्रज्ञानातील संधी
Just Now!
X