News Flash

कलाविज्ञानाचं सहजीवन

सुधीर भाभा अणू संशोधन केंद्रात संशोधक होता. तर मी कलाशाखेची. माझ्यातली सृजनशीलता फुलवण्यासाठी सुधीरने मला वेगवेगळ्या वैज्ञानिक विषयांवर रंजक लेख लिहायला उद्युक्त केलं.

| July 19, 2014 02:13 am

कलाविज्ञानाचं सहजीवन

‘‘ सुधीर भाभा अणू संशोधन केंद्रात संशोधक होता. तर मी कलाशाखेची. माझ्यातली सृजनशीलता फुलवण्यासाठी सुधीरने मला वेगवेगळ्या वैज्ञानिक विषयांवर रंजक लेख लिहायला उद्युक्त केलं. तेव्हापासून आजतागायत आमचं लेखन हे ‘सहलेखन’ बनलं. मुलांसाठी ‘शोधांच्या जन्मकथा’ लिहिताना सुधीरच्या वैज्ञानिक माहितीचा मला भरपूर फायदा झाला, तर ‘एका शेवटाची सुरुवात’ या वैचारिक पुस्तकात लालित्य आणण्यात सुधीरला माझी मदत झाली. ‘शोधांच्या जन्मकथा’ला बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला तर ‘एका शेवटाची सुरुवात’ला ‘भरूरतन दमाणी पुरस्कार’ मिळाला. आमच्या सहजीवनात कलाविज्ञानाची सांगड अशी घातली गेली.’’ सांगताहेत नंदिनी थत्ते आपले संशोधक पती सुधीर थत्ते यांच्याबरोबरच्या ३५ वर्षांच्या सहजीवनाविषयी..

‘खोळबुंथी घेऊनी खुणेची पालवी..’ याचा प्रत्यय वैज्ञानिकालाही येतो. विज्ञानरूपी विठ्ठल आसपास घडणाऱ्या घटनांमधून साकारलेल्या खोळबुंथीच्या आवरणात लपून वैज्ञानिकाला साद घालतो आणि त्याच्या ‘अगणित लावण्याने’ मोहित होऊन विज्ञानाच्या नियमांच्या रूपाने वैज्ञानिक त्यांचा ‘वेधू’ घेण्याचा प्रयत्न करीत राहतो..’’ सुधीर मला ज्ञानदेवांच्या ‘कानडा विठ्ठलू..’ या अभंगाचा वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून एक वेगळाच अर्थ सांगत होता आणि त्याचं बोलणं मी भान हरपून ऐकत होते. अध्यात्म आणि विज्ञान यांचा तत्त्वज्ञानरूपाने एकमेकांशी कसा संगम होतो, याचा आगळावेगळा प्रत्यय मला येत होता..
 सुधीरशी नुकतीच ओळख झाल्यानंतर होणाऱ्या गप्पांमधून विविध विषयांकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टिकोन वरवर वेगळा वाटला तरी आमच्या विचारांचा गाभा एकच आहे, असं आमच्या लक्षात येत गेलं. सुधीरला विज्ञानात रस होता तर मला साहित्यात, पण लेखनाची आवड दोघांनाही होती. मला सुगृहिणी होऊन मुलांना भरपूर वेळ देऊन उत्तम रीतीने वाढवण्याची इच्छा होती आणि सुधीरला आपल्या सहचारिणीने गृहिणीपदाबरोबरच काही तरी सृजनात्मक काम करावं, असं वाटत होतं. अशा अनेक आवडी-निवडी जुळल्यामुळे सुधीरने मला लग्नासाठी विचारताच मी होकार दिला आणि आमच्या सहजीवनाला सुरुवात झाली..
सुधीर भाभा अणू संशोधन केंद्रात संशोधक होता. त्याला विज्ञानप्रसाराची मनापासून आवड होती. मी कलाशाखेची विद्याíथनी होते. माझ्यातली सृजनशीलता फुलवण्यासाठी सुधीरने मला वेगवेगळ्या वैज्ञानिक विषयांवर रंजक लेख लिहायला उद्युक्त केलं, तेव्हापासून आजतागायत आमचं लेखन हे ‘सहलेखन’ बनलं. त्यातल्या वैज्ञानिक माहितीची आणि अचूकतेची जबाबदारी सुधीरची, तर ते वाचकांना कळेल, रुचेल आणि आवडेल अशा रीतीने मांडण्याची जबाबदारी माझी! साहजिकच मुलांसाठी ‘शोधांच्या जन्मकथा’ लिहिताना सुधीरच्या वैज्ञानिक माहितीचा मला भरपूर फायदा झाला, तर ‘एका शेवटाची सुरुवात’ या वैचारिक पुस्तकात लालित्य आणण्यात सुधीरला माझी मदत झाली. कला आणि विज्ञानाचा हा संगम बालवाचकांपासून प्रौढवाचकांपर्यंत सर्वानाच आवडला आणि ‘शोधांच्या जन्मकथा’ला भारत सरकारच्या एनसीईआरटीने ‘बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवलं तर ‘एका शेवटाची सुरुवात’ला ‘भरूरतन दमाणी पुरस्कार’ मिळाला.
 विज्ञानलेखन करताना मी गाणी, गोष्टी, बालनाटय़े, कोडी, उखाणे, विज्ञानकथा अशा अनेक प्रकारांमधून मुलांना विज्ञानाच्या विविध अंगांची ओळख करून दिली. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या परिसरविषयक जागृती निर्माण करणाऱ्या चंदू-नंदूच्या यमकबद्ध गोष्टींना तर सुमारे एक कोटी श्रोत्यांनी एकमुखाने पसंतीची पावती दिली. सुधीरने वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेल्या बालनाटय़ांमध्ये बालकलाकारांबरोबर मीही सहभागी होऊन ती दूरदर्शनवरून सादर केली. या मालिकेला तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते ‘नवीन माध्यमाचा वापर करून मुलांमध्ये विज्ञानप्रसार केल्याबद्दल’ ‘विज्ञानग्रंथाली’तर्फे विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
सुधीरचा स्वभाव अंतर्मुख आहे तर माझा बहिर्मुख! त्यामुळे सुधीर शांतपणे एखाद्या कल्पनेवर तासन्तास विचार करत एकटाच बसू शकतो, तर मला मात्र एखादी कल्पना सुचली की ती अनेकांशी बोलल्याखेरीज राहवत नाही. त्यामुळे केवळ लेखनातून होणाऱ्या विज्ञानप्रसाराने सुधीरप्रमाणे माझं काही समाधान झालं नाही. मी त्याला सुचवलं, ‘‘आपल्या लेखनातून आपण बालवाचकांना केवळ अप्रत्यक्षपणे भेटतो. मुलांना विज्ञानाची गोडी लागायला हवी असेल तर आपण त्यांना प्रत्यक्षात भेटायला हवं, त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात. तरच त्यांना विज्ञानाचा बाऊ वाटेनासा होईल.’’ सुधीरची पहिली प्रतिक्रिया होती, ‘‘असं कुठे आहे? मी लहानपणी विज्ञानावरची अनेक चांगली पुस्तकं वाचली आणि त्यातूनच मला विज्ञानाची एवढी गोडी लागली की पसा किंवा अधिकार माफक प्रमाणात असणारी वैज्ञानिकाची नोकरी मला अधिक आकर्षक वाटली.’’
माझ्या मते सुधीर हा अपवाद होता. सर्वसाधारणपणे मुलांना विज्ञानाची गोडी वाटायला हवी असेल तर कथाकथन, गाणी, कोडी असे विविध कार्यक्रम असलेल्या शिबिरांमधून मुलांशी संवाद साधणं आवश्यक होतं. मग विज्ञान शिबिराच्या कल्पनेबाबत ‘कणाद विज्ञान प्रतिष्ठान’ या आमच्या संस्थेतल्या मित्र-मत्रिणींशी आम्ही चर्चा केली. तेव्हा सर्वाना माझी कल्पना आवडली. एकदा माझं म्हणणं पटल्यावर मात्र सुधीरलाही त्या कल्पनेनं पछाडलं आणि त्याने कोणत्याही गावी सहजपणे दाखवता येईल, असं संगणक तंत्रज्ञान निवडून संगणकाच्या प्रात्यक्षिकांची बहुमोल भर त्यात घातली. मुलांना संगणक फारसा माहीत नसण्याच्या ऐंशीच्या दशकात या शिबिरांमधून आम्ही गावोगावी शाळेतल्या मुलांना संगणकाची प्रात्यक्षिकं दाखवली. मालवणपासून चंद्रपूपर्यंत आणि केळवे माहीमपासून कोल्हापूपर्यंत विविध ठिकाणी मिळणारा मुलांचा भरघोस प्रतिसाद पाहून सुधीरने माझ्या विज्ञान शिबिराच्या कल्पनेला दाद देऊन माझं मनापासून कौतुक केलं.
विज्ञान शिबिरांच्या निमित्ताने गावोगावी भेटलेल्या मुलांच्या मनातल्या कुतूहलाला खतपाणी घालायला हवं, या सुधीरच्या विचारातून ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ या पुस्तकमालिकेचा जन्म झाला. दरवर्षी नोबेल पारितोषिकं देऊन गौरवलं जाणारं संशोधन गोष्टीरूपाने मुलांपुढे सादर केलं तर त्यांना विज्ञानाच्या रुंदावणाऱ्या क्षितिजांची माहिती होईल आणि त्यातूनच उद्याचे संशोधक निर्माण होतील, असं आम्हाला वाटलं. आमची ही कल्पना ‘ग्रंथाली’च्या दिनकर गांगल यांना सांगताच त्यांनी ती उचलून धरली आणि १९९६ पासून त्या-त्या वर्षीच्या शोधांविषयी गोष्टीरूपाने माहिती देणारं पुस्तक ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ या नावाने दरवर्षी ‘ग्रंथाली’तर्फे प्रसिद्ध होऊ लागलं. महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार तीन वेळा मिळवून ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ ही मालिका आता या पुरस्काराच्या शर्यतीतून सन्मानाने निवृत्त झाली आहे!
दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या विज्ञानशाखांची नोबेल पारितोषिकं जाहीर होतात आणि त्याच वर्षीच्या २५ डिसेंबरला त्या शोधांविषयीचं पुस्तक प्रसिद्ध होतं. साहजिकच नोबेलनगरीचं लेखन आणि प्रकाशन ही काळाबरोबरची एक शर्यतच असते. सुधीर सातत्याने विज्ञानविषयक वाचन करत असल्यामुळे नोबेलविजेतं प्रगत संशोधनही त्याला सहजपणे समजतं. तो ते मला समजावून सांगतो तेव्हा मी विज्ञानाची विद्याíथनी नसल्याचा फायदा आम्हाला होतो. कारण मला समजेल एवढं सोपं होईपर्यंत मी सुधीरला त्या शोधांवर पुन:पुन्हा प्रश्न विचारत राहते आणि मला शोध नीट कळल्यावरच बालवाचकांनाही तो समजेल अशा रीतीने त्याबद्दलची गोष्ट लिहायला घेते.
नोबेलविजेते पॉल नर्स मुंबईत आले असताना आम्हाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्या शोधाबद्दलचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक घेऊन आम्ही त्यांना भेटलो. मराठीतलं ते पुस्तक चाळताना त्यात त्यांचा पेशीचक्राचा शोध स्पष्ट करणारी आकृती पाहताच ते उद्गारले, ‘ओ! इट्स ऑलरेडी हिअर!’ आपलं संशोधन इथल्या स्थानिक भाषेत इतक्या चटकन उपलब्ध झालं आहे, याचं त्यांना मनापासून कौतुक वाटलं. नोबेलनगरीतल्या आकर्षक रंगीत चित्रांचं सामथ्र्य हे त्याला भाषेपलीकडे नेणारं आहे, याचा सुखद प्रत्यय आम्हाला आला.
ज्या देशात नोबेल पारितोषिकं दिली जातात त्या स्वीडनपर्यंतही नोबेलनगरी पुस्तकमालेची कीर्ती पोचली आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथल्या ‘स्वेन्स्का डॅगब्लॅडेट’ या वर्तमानपत्राच्या कॅरीन लुंडबॅक यांनी मुंबईत येऊन आमची मुलाखत घेऊन या उपक्रमाबद्दल गौरवपर लेख नोबेल पारितोषिक वितरण समारंभाच्या दिवशी म्हणजे १० डिसेंबरला प्रसिद्ध केला.
परदेशात नोबेलनगरीतील नवलस्वप्नांचं कौतुक होत असतानाच ठाण्यातल्या विविध शाळांनी अविनाश बर्वे आणि श्रीधर गांगल यांच्या पुढाकाराने या पुस्तकमालिकेवर आधारित एक आगळावेगळा कार्यक्रम केला. त्यात विद्यार्थ्यांनी मूळ कथा समजून घेऊन त्या बालनाटय़, लोकनाटय़, पोवाडा, कीर्तन अशा वेगवेगळ्या पद्धतींनी सादर केल्या. नोबेलविजेत्या संशोधनाचं शिवधनुष्य शालेय विद्यार्थ्यांनी लीलया पेललेलं पाहून लेखक म्हणून आम्हाला उपक्रम रुजत असल्याची ग्वाही मिळाली.
  विज्ञानप्रसाराचे वेगवेगळे उपक्रम आम्ही दोघं एकत्रच राबवत असल्यामुळे त्यातून कधी-कधी वेगळ्या गमतीही घडायच्या. आमचं लग्न झाल्यावर माझ्या लक्षात आलं की सुधीरला स्वयंपाकातलं ओ की ठो कळत नाही. पण स्वयंपाकाची आवड असल्यामुळे मी ते फारसं मनावर घेतलं नाही. एक दिवस आम्ही सकाळपासून एकत्र लिहीत बसलो होतो. संध्याकाळी बाहेर पाऊस पडत होता. त्याकडे पाहत मी म्हणाले, ‘आहा! या पावसात गरमागरम भजी खायला काय मजा येईल!’ सुधीर शांतपणे म्हणाला, ‘मग कर की!’ त्यावर मी म्हणाले, ‘‘मी सकाळी स्वयंपाक केला आणि मग सगळा वेळ आपण एकत्रच तर लिहीत बसलो आहोत. आता भजी करत बसण्याएवढी एनर्जी नाही माझ्याकडे!’’ त्यावर सुधीर म्हणाला, ‘‘मला जर भजी करता येत असती, तर मी केली असती आत्ता भजी. पण..काय हरकत आहे आत्ता मी शिकायला? तू सांग, त्याप्रमाणे मी करतो भजी!’’ त्या दिवशीची भजी खाताना मला जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय! त्यानंतर आमच्या घरी आजतागायत सुधीरच भजी करतो. आता मीच काय, आमची मुलं आणि सुनादेखील त्यालाच भजी करण्याची फर्माईश करतात!
लग्नाला पस्तीस र्वष झाल्यानंतरही आमच्यातलं मत्रीचं नातं कायम आहे. त्यातला ताजेपणा आणि उत्कटता ही आम्ही प्रेमात पडलो तेव्हा होती तेवढीच आहे. आमच्या सहजीवनाची वाटचाल आम्ही ज्या मूलभूत तत्त्वांच्या आधारे केली, त्यांना याचं श्रेय आहे. यातलं सर्वात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे, कोणताही दूरगामी निर्णय हा एकाचा नव्हे तर एकमताचा असावा. अर्थात, प्रत्येक वेळी सुरुवातीला दोघांचं मत एकच असेल, असं नाही. अशा वेळी कोणती तरी एक बाजू दोघांनाही पटेपर्यंत आम्ही चर्चा करतो, प्रत्येक बाजूचे वेगवेगळे पलू तपासून नवीन मुद्दे मांडत राहतो, गरज पडली तर त्या विषयाची अधिक माहिती मिळवतो. अखेर दोघांनाही जो निर्णय योग्य आणि समाधानकारक वाटेल तो प्रामाणिकपणे अमलात आणतो. एखादी चूक झाल्यास ती मान्य करण्याचा मनमोकळेपणा आणि ती सोडून देण्याचा खिलाडूपणाही आम्ही दाखवतो.
 सांसारिक जबाबदाऱ्यांमध्येही केवळ कोणी तरी नवरा किंवा बायको आहे म्हणून एखादी गोष्ट त्या व्यक्तीवर लादायची नाही, हे आम्ही कटाक्षाने पाळतो. त्या त्या वेळच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार कामांचं आणि जबाबदाऱ्यांचं वाटप केलं तरी समत्वाची भूमिका कायम राहते. विविध सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे वेळोवेळी एकाच्या कामाला प्राधान्य मिळून दुसऱ्याचं काम मागे पडू शकतं, पण परिस्थिती बदलताच मागे पडलेलं कामही झपाटय़ाने पुढे नेलं जातं. त्यामुळे कुणा एकालाच तडजोड करावी लागली, असं आम्हाला कधीच वाटलं नाही. शेवटी, संसारवस्त्राची सुंदर नक्षी विणण्यासाठी वेगवेगळ्या कामांचे धागे मागे-पुढे होत राहणारच!
 ज्या तर्कशुद्ध विचारसरणीमुळे आमचं सहजीवन अधिक आनंदाचं झालं, ती विचारसरणी मुलांमध्येही रुजवण्याचा आम्ही प्रयत्न केला. बक्षीस मिळवण्यापेक्षा विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन आपली कामगिरी सर्वोत्तम व्हावी म्हणून प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे, हे मुलांच्या मनावर िबबवलं. करियर निवडताना पशापेक्षा तुमच्या आवडीचं काम निवडणं अधिक महत्त्वाचं आहे, कारण ती निवड तुम्हाला आयुष्यभर आनंददायक होईल, याची जाणीव मुलांना करून दिली.
आज मागे वळून पाहताना कळ्यांची फुलं झाल्याचा आनंद मनात दाटला असला तरी भविष्याकडे नजर टाकल्यावर विज्ञानप्रसाराच्या वेलीवर उमलण्याजोग्या खूप कळ्या अजून फुलायच्या बाकी आहेत, याची जाणीव होते. आज आपला देश जगातला एक अग्रेसर देश होण्याची स्वप्नं पाहत आहे. हे स्वप्न पुरं व्हायचं असेल तर मुलांना सध्याच्या चौकटीपलीकडे जाऊन विचार करण्याचं, विज्ञान-तंत्रज्ञानाची नवनवी क्षितिजं धुंडाळण्याचं आकर्षण निर्माण व्हायला हवं. भावी एडिसन आणि आइन्स्टाइन त्यांच्यातून निर्माण व्हायला हवेत. नव्या तंत्रज्ञानाबरोबर साकारणाऱ्या नव्या माध्यमांचा वापर करून नव्या पिढीचं विज्ञानाशी नातं जोडून त्यांच्यातलं संशोधनाचं स्फुिल्लग जागृत करण्याची इच्छा आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची जिद्द आम्हा दोघांमध्येही आहे. पुढची पिढी आमच्या या विज्ञानयज्ञात उत्साहाने साथ देईल याचा विश्वास आहे. त्यामुळेच भविष्यात ‘फुले वेचितां बहरू कळीयांसि आला’ हा अनुभव घेण्याचं स्वप्न आमच्या मन:चक्षूंसमोर आज तरळतं आहे!   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2014 2:13 am

Web Title: 35 years of nandini thatte with husband sudhir thatte
टॅग : Chaturang
Next Stories
1 दिसतं तसं नसतं
2 आवाज उठू लागला आहे, पण..
3 शरीरभान
Just Now!
X