दांभिकता आणि कौतुकही

वर्षां दंडवते

डॉक्टर

‘करोना’ आपल्या आयुष्यात येऊन नऊ महिन्यांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. सुरुवातीला पूर्णत: ठप्प झालेलं आयुष्य हळूहळू मार्गस्थ व्हायला लागलंय.. अर्थात परिस्थिती पूर्वपदाला येणं शक्य होईल का, याबद्दल साशंकताच आहे. काळ आपल्याला पुढेच नेत असतो तेथे मागे यायची सोयच नसते, त्याप्रमाणे प्रत्येकानंच आपापलं आयुष्य आपल्या हाती घेऊन कमी-अधिक प्रमाणात कामाला सुरुवात केलीय. कारण प्रश्न एकटय़ाचा नाही, तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांचाही आहे. त्यांनाही बरोबर घेऊन जायचं म्हणजे पुढे जातच राहावं लागणार.. कसा होता आणि आहे प्रत्येकाचा हा प्रवास हे सांगताहेत, विविध क्षेत्रांतील करोना योद्धे ..

फेब्रुवारी २०२० पासून जगभरात ‘करोना’ची साथ सुरू झाली आणि या विषाणूची फारशी माहितीच नसल्यामुळे प्रतिकार कसा करायचा हा मूलभूत प्रश्न उद्भवला. साधा खोकला-ताप ते थेट मृत्यू असे विभिन्न प्रकार या आजारात पाहायला मिळत होते. येणाऱ्या रुग्णांचं वर्गीकरण, विलगीकरण, उपचार, संसर्ग नियमन या सर्वच आव्हानांना आम्हा डॉक्टरांना अचानक सामोरं जावं लागलं.

टाळेबंदी जाहीर झाल्यावर पहिली अडचण म्हणजे रुग्णालयाचे कर्मचारी सरकारी आणि खासगी वाहनव्यवस्था बंद असताना कामावर येणार कसे ? ‘करोना’ रुग्णांना खासगी रुग्णालयात ठेवण्याची बंदी, तर रुग्णालयं बंद ठेवल्यास नोंदणी रद्द करण्याच्या शासनाकडून नोटिसा! काम चालू ठेवल्यास स्वसंरक्षणाच्या अपुऱ्या साधनांसह प्रत्येकाची जंतुसंसर्गापासून काळजी घ्यायची कशी?..‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा विचारांत दिवस जात होते.

मग ‘पीपीई किट’ मिळायला लागल्यावर मे महिन्यापासून स्वत:ला आठ तास आपादमस्तक ‘पॅकबंद’ करून खाणंपिणं, नैसर्गिक विधी तेवढय़ा वेळापुरते बंद, असे प्रकार चालू झाले. घरातील लहानांची, म्हाताऱ्यांची काळजी, शिक्षणासाठी लांब राहाणाऱ्या मुलांना भेटताही येणार नाही, ही काळजी! अशातच प्रत्येक रुग्णाची शस्त्रक्रियेआधी ‘करोना’ चाचणी करून काम पुन्हा सुरू  झालं जे आरोग्य कर्मचारी गरजेपोटी तरी कामाला येत होते, केवळ त्यांच्या सहकार्यानं!  एकीकडे ‘नॉट ऑल सोल्जर्स वेअर युनिफॉर्म, सम वेअर स्टेथोस्कोप’ असे कौतुकाचे मेसेज, तर दुसरीकडे सोसायटीला नेहमी मदत करणाऱ्या डॉक्टरांनाच करोना झाल्यावर त्यांना स्वत:च्या घरात विलग होण्यालासुद्धा सोसायटीचा नकार- अशा घटना. चेन्नईमध्ये एका करोनानं मृत्यू झालेल्या न्युरोसर्जन डॉक्टरांना स्मशानात जागा देण्यासाठी विरोध, तर इंग्लंडमधे डॉ. उमा स्वामिनाथन या करोनावर  उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरच्या घराबाहेर एकेक गाडी थांबवून तिला मानवंदना दिली गेली. या विसंगत, दांभिक वातावरणात डॉक्टरांची नक्कीच घुसमट झाली.

आयुष्य पुढे सरकताना यापुढे करोनासोबतच जगावं लागणार ही कटू जाणीव झाली. काही नातेवाईक या आजारात गमावले.  दक्षतेनंतरदेखील घरातल्या तिघांना करोना भेट देऊन गेला. यातून नवीन मार्ग- म्हणजे ‘व्हिडीओ सल्लामसलत’, रुग्णालयातील गर्दी कमी करणं, निर्जंतुकीकरणाची नवीन तंत्रं, लसीकरण हे शिकून पुढील प्रवास चालूच राहील. पण यापुढे वैद्यकीय खर्च वाढणार हे अपरिहार्य आहे. त्यातूनही बाधितांची कमी झालेली संख्या, तीव्रता तसंच सार्वत्रिक प्रतिकारशक्ती आणि लस हे भवितव्य आशादायी आहे. करोना साथीमुळे स्वत:च्या आरोग्याकडेही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे हे डॉक्टरांनाही कळलं. कारण करोनाबाधित डॉक्टरांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त होतं. या साथीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता करोनाबाधित बाळाला स्वत:च्या तोंडानं श्वास देऊन जीव वाचवणारे डॉक्टरही अस्तित्वात आहेत, हे यानिमित्तानं समाजाला कळलं.