डॉ. नीलिमा गुंडी

संसारी स्त्रीला एकाग्र होण्यातली चैन कशी परवडणार? जोवर आपण स्त्रीला असा एकाग्रतेचा उत्कट नि खोल ज्ञानात्मक अनुभव घेण्यासाठी पूरक असा अवकाश उपलब्ध करीत नाही, तोवर आपल्या समाजात अमूर्त संशोधन करण्याचं आव्हान पेलणाऱ्या स्त्रिया मोठय़ा प्रमाणात कशा पाहायला मिळणार? त्यांच्यासाठी युरेका क्षण असतील का? त्यासाठी आपल्याकडच्या पुरुषलिखित साहित्यातली ठरावीक साचेबंद स्त्रीप्रतिमाही बदलायला हवी..

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची ‘जेन्टली फॉल्स द बकुल’ ही इंग्लिश कादंबरी त्यातल्या एका आख्यायिकेमुळे माझ्या विशेष लक्षात राहिलीय. ती आख्यायिका अशी आहे, एक विद्वान धर्मशास्त्रावर भाष्यग्रंथ लिहीत होता. तो त्या कामात इतका व्यग्र असे की, त्याचे व्यवहाराकडे अजिबात लक्ष नसे. त्याच्या आईने त्याची अनेक वर्षे काळजी घेतली आणि जेव्हा ती थकली, तेव्हा तिने त्याचे एका मुलीशी लग्न लावून दिले. लग्नानंतर काही वर्षांनी आई गेली. मग त्याची पत्नी घरातले आणि बाहेरचे सर्व व्यवहार पाहू लागली. अशी अनेक वर्षे गेली. शेवटी एकदाचा त्याचा ग्रंथ पूर्ण झाला. तेव्हा त्याचे लक्ष घरातल्या बाईकडे गेले. त्याला तिने स्वत:ची ओळख करून दिली. पत्नी या नात्याने ती गेली चाळीस वर्षे घराचा कारभार चालवत आली आहे; हे तिने त्याला सांगितले. त्याने तिचे नाव विचारले. तिचे नाव होते ‘भामती’. त्याने ते नाव आपल्या ग्रंथाला दिले. ‘पतीच्या ध्येयपूर्तीसाठी समर्पण करणारी स्त्री’ अशी भामतीची प्रतिमा रूढ झाली.

ही कथा वाचताना भामतीचं मूकपणे त्याग करत जगणं मला अस्वस्थ करून गेलं. (सुधा मूर्ती यांच्या नायिकेलादेखील ते अस्वस्थ करून गेलं होतं.) मनात आलं की, एखादी स्त्री एकाग्रपणे भान विसरून काम करतेय, अशी दंतकथा का ऐकायला मिळत नाही? आपल्याकडे गृहिणीनं काही क्षण एकाग्र होऊन काम करणंदेखील फारसं कौतुकाचं मानलं जातंच असं नाही. मुळात तिलाच त्याबाबत अपराधी वाटू लागतं. प्रसिद्ध ग्रीक गणितज्ञ आर्किमिडीज याच्याविषयीची गोष्ट अनेकांना माहीत आहे. त्याला जेव्हा नवा सिद्धांत सुचला, तेव्हा तो ‘युरेका’ म्हणत भान हरपून स्नानगृहातून बाहेर आला होता. असा ‘युरेका’ क्षण स्त्रीपासून लांबच असतो का? रोदाँ या जगप्रसिद्ध शिल्पकाराने ‘द थिंकर’ या शिल्पात विचारात गढून गेलेला पुरुष दाखवला आहे. ही जागा स्त्री घेऊ शकणार नाही का?

नाही म्हणायला स्त्रीला परंपरेने एका बाबतीत मोकळीक दिली आहे. ती म्हणजे परमेश्वरचिंतनात देहभान विसरणे. कृष्णाच्या चिंतनात गढलेली राधा अनेक कवींच्या काव्याचा विषय झाली आहे. कृष्णाच्या बासरीच्या सुरात बुडालेली, कामधाम, संसार विसरलेली राधा कवितांमधून भेटते. पु. शि. रेगे यांची ‘त्रिधा राधा’ कविता प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी यमुनेच्या काठच्या राधेची ‘चिरतंद्रा’ वर्णन केली आहे. ती कविता प्रभावी असल्यामुळे मला त्या राधेच्या जागी गृहिणीला आणून मुद्दामच कविता लिहावीशी वाटली.

पु. शि. रेगे यांची कविता वाचताना (त्यांची क्षमा मागून!) मला ‘जाग’ येते ती अशी,

‘तोच वाजते एकाच वेळी

दारावरची घंटा

टेलिफोनची रिंग

नि कुकरची शिट्टी

कर्कश्श..

मी अनुभवते ही अशी

व्यवहाराच्या काठावरची

त्रिधा राधा!!!’

हे असतं संसारी स्त्रीच्या जगण्यातलं वास्तव. तिला एकाग्र होण्यातली चैन कशी परवडणार? जोवर आपण स्त्रीला असा एकाग्रतेचा उत्कट नि खोल ज्ञानात्मक अनुभव घेण्यासाठी पूरक असा अवकाश उपलब्ध करीत नाही, तोवर आपल्या समाजात अमूर्त संशोधन करण्याचं आव्हान पेलणाऱ्या स्त्रिया मोठय़ा प्रमाणात कशा पाहायला मिळणार? त्यासाठी आपल्याकडच्या पुरुषलिखित साहित्यातली ठरावीक साचेबंद स्त्रीप्रतिमाही बदलायला हवी.

मला सदानंद रेगे यांची एक कविता इथे आठवते. त्या कवितेत रेगे फँटसीचा वापर करण्यात काही बाबतीत यशस्वी झाले आहेत. त्यांनी पार दूरच्या भविष्यातले चित्र त्यात रंगवले आहे. ते असे की, ऑफिसच्या मीटिंगसाठी चंद्रावर जाणे, त्यात सहज शक्य झाले आहे!’ ‘कुणा एकेकाळची एक नाटय़छटा’ या त्यांच्या कवितेतली कल्पनेची झेप आकर्षक आहे, पण मला त्यातली स्त्रीप्रतिमा फारच खटकली. कारण इतक्या भव्य कल्पनेची झेप घेणाऱ्या कवीला स्त्री कशी दिसली आहे, ते पाहा :

‘‘अगं, बॅग भरलीस

का माझी?

हे पापडलोणचं

कशाला हवंय?

तुम्हा  इंडियन

बायकांना अकला

कधी येणाराय्त कोण जाणे?

(‘वेडय़ा कविता’)

हे शब्द वाचताना मला खंत वाटली की, या कवीच्या मनातली भविष्यकाळातली स्त्रीप्रतिमा किती बंदिस्त आहे. नवऱ्याची बॅग भरून देणारी, पापडलोणची यापलीकडचे जग माहीत नसलेली, नवऱ्याची बोलणी खाणारी अशीच ‘इंडियन स्त्री’ कवीला कल्पनाचक्षूने पाहता येते. पण त्याच वेळी कवीच्या मनातली पुरुषप्रतिमा पार चंद्रावर लीलया ये-जा करण्याइतक्या उंचीवर पोहोचली आहे. त्या प्रमाणात स्त्रीप्रतिमा मात्र जराही उंची गाठायला तयार नाही. ती अगदी जमिनीला खिळूनच राहिलीय.

आज आपल्याकडे स्त्रिया स्वकर्तृत्वाने वेगळ्या उंचीवर पोहोचत आहेत. ते चित्र स्वागतार्हच आहे. तरीही जोवर आपल्या साहित्यातल्या स्त्रीप्रतिमेला नवे सर्जनशील कोंब फुटणार नाहीत, तोवर आपण सगळेच (पुरुषच काय, स्त्रियादेखील!) भामतीच्या परंपरेतली स्त्रीप्रतिमाच अनुसरत राहू. आपल्या मनातली स्त्रीप्रतिमा कालानुरूप नवे परिमाण स्वीकारेल, तेव्हा पुरुषी समजल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रांतल्या संशोधनाचा, नवसर्जनाचा निखळ आनंद लुटण्यासाठीची एकाग्रता स्त्रीला मोकळेपणे अनुभवता येईल आणि मग त्यातला हषरेद्गार उच्चारताना तिच्याही ओठांवर हा शब्द सहजपणे येईल.. ‘युरेका!’

nmgundi@gmail.com

chaturang@expressindia.com