शिक्षक म्हणून मुलांना शिकवत असतानाच त्यांच्या मोकळ्या तासाला आवर्जून गोष्टी, कविता सांगायचो. त्या वेळी मुलं वारंवार नवीन गोष्टींची,  कवितांची फर्माईश करू लागली. अशा वेळी ‘आपणही मुलांसाठी कथा, कविता का लिहू नये?’ या मलाच विचारलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आलं..
मुंबई महानगरपालिकेच्या उच्च प्राथमिक शाळेत २१ वर्षांपूर्वी शिक्षक म्हणून रुजू झालो. कथाकथन, काव्यवाचन हा माझा आवडीचा प्रांत. इतर लेखकांच्या वाचलेल्या, मनाला भावलेल्या कथा, कविता मी सादर करायचो. शाळेत मुलांसाठीही मोकळ्या तासाला आवर्जून गोष्टी, कविता सांगायचो. त्या वेळी मुलं वारंवार नवीन गोष्टींची, नवनवीन कवितांची फर्माईश करू लागली. अशा वेळी ‘आपणही मुलांसाठी कथा, कविता का लिहू नये?’ या मलाच विचारलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आलं. ‘प्रयत्न तर करून पाहू या’ या माझ्या विचाराला कृतीची जोड मिळाली ती माझ्या वर्गातली विद्यार्थिनी सविता पटेकरमुळे.
सतत गैरहजर असणारी ही सविता शाळेत यावी म्हणून मी अनेक प्रयत्न केले. तिचे घर गाठले. आईला समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी तिची आई तिला ओढत शाळेत घेऊन आली. आपली कर्मकहाणी सांगता सांगता ती तिच्या डोळय़ातील पाण्याला वाट करून देत होती. त्या वेळी मला जे काही वाटलं ते मी शब्दबद्ध केलं आणि त्याची कविता झाली. माझ्या आयुष्यातली खऱ्या अर्थाने पहिलीवहिली कविता. कवितेचं शीर्षक होतं ‘सविता पटेकर सतत गैरहजर’ माझ्या या कवितेचं शाळेने खूप कौतुक केलं. माझ्या त्यावेळच्या मुख्याध्यापिका कवयित्री सुहासिनी पार्टे यांनी ती कविता आमच्या महापालिकेच्या शिक्षण विभागाचं मुखपत्र ‘शिक्षण वृत्तांत’मध्ये प्रसिद्धीला दिली. त्यामुळे महापालिकेच्या सगळय़ा शाळांमधून ती कविता वाचली गेली.
नंतर मी अनेक बोधपर कविता लिहिल्या. एखादी चिमुकली गोष्टच कवितेत गुंफून लिहू लागलो. मुलांना त्या ‘तालकथा’ सांगू लागलो. मुलांचे हसरे चेहरे, नाचरे डोळे खूप काही सांगून जायचे. त्याच कवितांचे ‘बोधाई’ हे बालांसाठीही पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर लेखन हा माझ्या जगण्याचा भागच होऊन गेले. ‘बोधाई’ हे पुस्तक शिक्षक, मुले, पालक यांनी आवडीने वाचले. एकदा शिक्षकांच्या महिनाभर चाललेल्या प्रशिक्षणा वेळी, त्या पुस्तकाच्या एक हजार प्रती महिन्याभरात संपल्या, केवढा हा आनंदाचा क्षण. मुलांसाठी अनेक शाळांतून विविध कृती-कार्यक्रमातून कथाकथन, कवितांचे कार्यक्रम करू लागलो. हे माझं काम पाहूनच प्रकाशभाई मोहाडीकरांनी २००८ ला अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट कथानिवेदक पुरस्कार दिला. असे अनेक पुरस्कार मिळाले.
मला एक प्रसंग या वेळी आठवतो, ‘शशिकलाताई आगाशे उत्कृष्ट बालसाहित्या’चा बुलढाणा येथील पुरस्कार माझ्या अक्षरांची फुले या पुस्तकाला जाहीर झाला होता. त्या वेळी तो पुरस्कार घ्यायला मी बुलढाण्यातील भारत विद्यालय शाळेत गेलो होतो. शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला आणि मी अवाक् झालो. कारण तिथल्या भिंतीवरच्या दर्शनी फलकांवर मुलांनीच त्यांच्या अक्षरात माझ्या अनेक कविता लिहून काढल्या होत्या, या कवितांवरच अनेक चित्रं रेखाटली होती. अनेक कवितांना चाली बांधल्या होत्या. कार्यक्रम सुरू झाला. मुलांनीच सर्व कार्यक्रमाचा ताबा घेतला होता. कार्यक्रमात मला कळलं की पुस्तक पुरस्कारासाठी मोठय़ांनी नाही मुलांनीच निवडलं होतं. मुलांचं पुस्तक मुलांनीच पुरस्कारासाठी निवडलं हे मला विशेष वाटलं. मुलांना ते पुस्तक त्यांचं वाटलं यातच सारं काही आलं. माझ्या सर्जनशीलतेला ती पोचपावती होती.