– डॉ. भूषण शुक्ल

‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या आजच्या जगात अनेकांना त्यांना आलेले मेसेजेस, व्हिडीओज इतरांना सतत पाठवायची हौस असते. त्यात एखादा वयात येणारा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्या आईबाबांसह त्यांच्या मित्रमैत्रिणी, आजीआजोबांसह सारे नातेवाईक एकजात त्यांना ‘शहाणं’ करायला तुटून पडतात. यात प्रेम असलं, तरी त्यांच्या अभ्यासातले प्रश्न सोडवण्यासाठी अशी ‘व्हॉट्सेपी मदत’ खरंच होते का? शुभमच्या मनातल्या या प्रश्नांचा विचार कोण करणार?

family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
Loksatta chaturang Friends friendship Express implicit relationship
माझी मैत्रीण: व्यक्त-अव्यक्त नातं
concept of house husband
स्त्री ‘वि’श्व: ‘हाऊस हसबंड’ असणं!
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी

शुभम संध्याकाळची शिकवणी संपवून घरी आला तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. दाराबाहेरूनच त्याला हसण्याचे आणि गप्पा मारण्याचे आवाज ऐकू आले. त्याच्या लक्षात आलं की, आई-बाबा आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी यांच्या दर महिन्याच्या भेटीचा दिवस आज आहे. ते त्याच्या घरी जमलेले आहेत. शुभम बराच वेळ दारापाशी शांतपणे थांबला. आत जावं की नाही, याचा तो विचार करत होता.

आज सर्व मित्रमंडळी आलेली आहेत. म्हणजे खायला खूप छान छान पदार्थ असतील, शीतपेयं वगैरेसुद्धा असतील. शिवाय सगळ्यांच्या गप्पा ऐकणं हा त्याच्यासाठी फार आवडीचा कार्यक्रम होता. प्रत्येकाच्या स्वभावाच्या वेगळ्यावेगळ्या तऱ्हा, प्रत्येकाची वेगळी मतं. एखाद्या टोकाच्या मतावर जोरजोरात मतभेद, वादविवाद आणि शेवटी एकमेकांच्या पाठीवर थापा मारून जेवणाच्या टेबलकडे प्रस्थान, असा तो सगळा कार्यक्रम. शुभमला हे सगळं बघायला आणि अनुभवायला खूप आवडायचं. इतर कुणाच्याही मुलांपैकी तो एकटाच हे एन्जॉय करायचा. बाकी कोणाची मुलं गप्पा मारायलासुद्धा यायची नाहीत. त्यामुळे जेव्हा त्यांच्या घरी पार्टी असायची तेव्हा शुभम जायचा नाही. साहजिकच दर तीन महिन्यांनी एकदा आपल्या घरी हे सगळे लोक कधी जमतील याची तो आवडीनं वाट बघायचा.

हेही वाचा – सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा

मात्र सध्या जरा पंचाईत झाली होती, कारण तो आता आठवीतून नववीत गेला होता आणि त्यामुळे तो मोठा झाला आहे असं सगळ्यांनी ठरवलं. इतके दिवस तो कोपऱ्यात बसून शांतपणे त्यांच्या गप्पा ऐकायचा आणि सगळे जण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. पण आता सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला ‘मदत’ करायला सुरुवात केली. ही मदत ते सगळे जण जरी मनापासून करत असले, तरी शुभमसाठी जरा अवघड ठरत होती. त्यामुळे तो दारापाशीच अडखळला, पण किती वेळ बाहेर उभं राहणार म्हणून शेवटी बेल दाबून तो आत गेला आणि सगळ्यांना हाय, हॅलो म्हणून लेटेस्ट काय चाललंय आहे त्याची बातमी देत आणि घेत स्वत:च्या रूममध्ये गेला. थोड्या वेळानं बाहेर येऊन पटकन एका प्लेटवर जास्तीत जास्त पदार्थ रचून आणि त्याच्या आवडत्या कोकम सोड्याचा एक मोठा ग्लास भरून तो परत रूममध्ये परतला. जाता जाता ‘आता हा मोठा झाला. आपल्यात बसण्यात त्याला काही आता इंटरेस्ट नाही. अंकल, आण्टी मंडळींमध्ये हा बोअर होत असणार.’ अशी कोणाची तरी कॉमेंट त्याच्या कानावर पडली, पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष करून दार बंद करून घेतलं.

त्याची संध्याकाळची ट्युशनही स्पेशल होती. दोन बिल्डिंगपलीकडे राहणारा प्रणव याच वर्षी इंजिनीयर झाला, पण तो इतर सगळ्यांसारखे कॅम्पस इंटरव्ह्यू न देता यूपीएससी या परीक्षेची तयारी करत होता. त्यामुळे तो दिवसभर अभ्यास करायचा आणि संध्याकाळी शुभमची शिकवणी घ्यायचा. त्याचे गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे फार आवडीचे विषय आणि ते तो मनापासून शिकवायचा. त्याच कारणामुळे आई-बाबांनी नेहमीची शिकवणी बंद करून शुभमला प्रणवकडे पाठवलं. सुरुवातीच्या एक-दोन महिन्यानंतर शुभमची जरा पंचाईत झाली, कारण प्रत्येक विषय अत्यंत खोलात जाऊन शिकवणं आणि सर्व बेसिक्स अगदी क्लिअर करणं ही प्रणवची खासियत. विषय अत्यंत खोलात जाऊन शिकवणं या एकाच पद्धतीने तो शिकवतो. त्याला त्या विषयाची माहिती तर असतेच, शिवाय त्या संबंधात असलेलं इतर शास्त्रज्ञ आणि प्रत्यक्ष आयुष्याशी त्या सर्व गोष्टींचा असलेला संबंध याबद्दलही प्रणवला खूप माहिती असते आणि तो ते सगळं मनापासून शिकवतो. दिवसभर एकट्यानं अभ्यास करून तो कंटाळलेला असतो त्यामुळे संध्याकाळी शुभम आला की त्याला खूप छान वाटतं, साहजिकच वेळेची मर्यादा न पाळता कितीही वेळ तो त्याला मनापासून शिकवतो. सुरुवातीला अर्धा- पाऊण तास अडचणी सोडवायला भेटू. अवघड गणितं सोडवायला मी तुला मदत करतो किंवा काही अडलं असेल तर समजावून सांगतो, अशा प्रकारे सुरू झालेली ही शिकवणी खूप सविस्तर चर्चा, शिकवणं, उदाहरणं देणं, पुस्तकाबाहेरची गणितं सोडवणं अशा रस्त्यानं जाते. आई-बाबांना हे माहीत आहे आणि त्यांना ते खूप आवडतं. पुस्तकापलीकडे जाऊन प्रणव इतका शिकवतो आहे हे त्यांना छान वाटतं. पण दर महिन्याला होणाऱ्या परीक्षा, शाळेचा होमवर्क, वेगळ्यावेगळ्या ऑलिंपियाड परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षेची तयारी या सगळ्याशी प्रणवदादाच्या शिकवण्याचा फार संबंध नाहीये. खरं तर ही शिकवणी सुरू झाल्यापासून शुभमचे मार्क खाली खाली जाताहेत पण अजून तरी त्यावर काही कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही. शाळेतले शिक्षक कुरकुर करतात, पण शुभमचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे फक्त पढत पंडित होऊन काही उपयोग नाही, असं त्याच्या आई-बाबांचं ठाम मत आहे. त्यामुळे तेदेखील मार्कांची फारशी काळजी करत नाहीत.

शुभमला हेच कळत नाहीये की, जे चाललं आहे ते योग्य की अयोग्य? वर्गात भरपूर मार्क मिळवणाऱ्या मुलांना शिक्षक वेगळ्या पद्धतीने वागवतात, हे त्याला रोजच स्वच्छ दिसतं. आपणही त्यापैकी एक असावं, अशी त्याची मनापासून इच्छा आहे. पण सविस्तर शिकणं आणि ‘बेसिक्स क्लियर’असणं हे फार महत्त्वाचं आहे असाही एक विचार आहे. त्यामुळे आपल्याला काय कळतं. मोठ्यांचं ऐकू या, असं म्हणून शुभमनं हे सगळं तसंच चालू ठेवलंय. आत्ताही तो प्रणवदादाकडूनच आला होता. बसल्या बसल्या त्यानं फोन चालू केला. प्रणवदादा त्याला फोन आणू देत नाही. त्यामुळे शिकवणीवरून परत आल्यावर शुभम पहिल्यांदा स्वत:चा फोन हातात घेतो आणि मित्रांचे काय निरोप आलेत ते बघतो.

आज त्यानं फोन उघडला तर फॅमिली ग्रुपवर ७५ संदेश होते. ते सगळे संदेश आई-बाबांनी, आजी-आजोबांनी आणि मावशीनं त्याच्यासाठीच पाठवलेले होते. मावशीचा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता, त्यामुळे आई-बाबा, आजी-आजोबा आणि मावशी-काका या सगळ्यांचा शुभम फारच आवडीचा. रोज त्याला अनेक चांगल्या माहितीच्या गोष्टी पाठवणं, अभ्यासाशी संबंधित, खेळाशी संबंधित, व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित, थोरामोठ्यांचे काहीतरी अनुभव आणि जगात कुठेतरी घडलेली काहीतरी जबरदस्त इंटरेस्टिंग अशी गोष्ट या सर्व गोष्टी ते त्याला फॅमिली ग्रुपवर पाठवायचे. शुभमला सर्वात चांगलं मटेरियल कोण पाठवतं याची जणू त्यांच्यात स्पर्धा असते. व्हिडीओ, ऑडीओ आणि लेख याची त्या ग्रुपवर गर्दी असते. रोज निदान ५० ते ६० मेसेजेस हे फक्त या गोष्टींचे असतात.

सुरुवातीला शुभम सगळ्या लिंक आणि लेख वाचायचा. व्हिडीओ बघायचा आणि त्याच्यावर काहीतरी कॉमेंटही टाकायचा. त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की, शुभमला याची खूप आवड आहे. सगळ्यांनी त्याला व्यक्तिमत्त्व विकासाच्या गोष्टी पाठवायला सुरुवात केली. शुभमच्या असं लक्षात आलं की, हे मेसेजेस नुसते वाचायलाच रोजचा अर्धा तास जातो. ते उघडून प्रत्येक गोष्ट वाचायची म्हटली किंवा बघायची म्हटलं, तर त्याचा निम्मा दिवस जातो. आजोबांनी पाठवलेले व्हिडीओ, तर एक एक तासाचे असतात.

एकदा त्याने फक्त गंमत म्हणून ‘पृथ्वीचा कलता अक्ष आणि सूर्य’ यांच्यातील परस्परक्रियांमुळे विविध ऋतू कसे बदलतात, याबद्दल त्याच्या मनात असलेल्या गोंधळाविषयी एक प्रश्न टाकला तर हा भाग समजून सांगणारे यूट्यूबवरचे ३० की ४० व्हिडीओ आजोबांनी त्याला पाठवले आणि जेव्हा शुभमने दुसऱ्या दिवशी त्यांना मेसेज पाठवला की, मला एवढे व्हिडीओ बघणं शक्य नाही. तुम्हीच सगळे पूर्ण बघा आणि त्यातला जो सर्वात चांगला असेल, तो एक मला पाठवा तर आजोबा खूप रागावले. विद्यार्थीदशेमध्ये अशा प्रकारचा आळशीपणा हा कसा वाईट असतो, हे सांगणाऱ्या महाभारतातल्या तीन की चार गोष्टी असलेल्या वेबसाइट्सची लिंक त्या ग्रुपवर टाकली. शुभमने कपाळाला हातच लावला.

आई-बाबांच्या, मित्रमंडळींच्या ग्रुपपासून दूर पळण्याचं हेही एक कारण होतं, कारण त्या सगळ्यांकडे शुभमचा नंबर होताच. त्यामुळे आपल्या बोलण्याशी संबंधित असलेल्या इंटरनेटच्या लिंक्स आणि यूट्यूबवरचे व्हिडीओ ते सगळे नियमितपणे शुभमला पाठवायचे. ही मंडळी शुभम अगदी तान्हा असल्यापासून त्याला अंगाखांद्यावर खेळवणारी. त्यामुळे त्यांचं आपल्यावर प्रेम आहे याबद्दल शुभमच्या मनात काही शंका नाही. पण ‘किती वाचायचं आणि किती व्हिडीओ बघायचे? या गोष्टी जरी ऐकायला छान वाटल्या, तरी त्याचा खरंच मला किती उपयोग होतो?’ असा प्रश्न आता शुभम स्वत:ला विचारू लागलाय.

बाबांचा एक मित्र तर त्याला इतके ‘मोटिव्हेशनल’ व्हिडीओ पाठवायचा की, त्या व्हिडीओची रोजची लिस्ट बघूनच शुभमला संभ्रम पडायचा. एकदा हिंमत करून त्या काकाला त्यानं विचारलं की, ‘‘अरे इतक्या ‘मोटिव्हेशन’ची जर मला सतत गरज पडत असेल, तर मला काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी तू मला हे व्हिडीओ पाठवतोस का? तुला आई-बाबांनी माझ्याबद्दल काही काळजीचं कारण सांगितलं का? म्हणून तुम्ही सगळेजण मला हे व्हिडीओ पाठवताय का?’’ या सर्व प्रश्नांची खरी उत्तरं काही कोणी दिली नाही. सगळे जण ‘अरे नाही रे. तुलाही कदाचित आवडेल, उपयोगी पडेल, असं वाटलं म्हणून तुला पाठवलं’, असं थातूरमातूर उत्तर दिलं आणि त्याला कटवलं. पण पाठवणं थांबलं मात्र नाही.

आताही स्वत:च्या रूममध्ये कटलेट्स, चिकन बिर्याणी खाताना आणि आईनं खास बनवलेला कोकम सोडा पिताना शुभमच्या मनामध्ये हे विचार फेर धरून नाचायला लागले. ‘टर्म एंड’ परीक्षा ही तीन आठवड्यांवर आलेली. शाळेत पोर्शन कधीच पूर्ण झाला होता, पण प्रणवदादाच्या शिकवणीमध्ये त्याची पूर्ण संध्याकाळ अडकलेली. परीक्षेचा अभ्यास करायला वेळ शिल्लक राहिला नाही. शिवाय प्रणवदादा फक्त दोन-तीन विषय शिकवतो आणि तो ज्या प्रकारे गणितं सोडवायला शिकवतो ते शाळेतल्या सरांना चालत नाही. त्या पद्धतीनं गणित सोडवलं की ते मार्क कापतात. म्हणजे बहुतेक या परीक्षेमध्ये आपण दोन-चार विषयांत नापास होणार की काय, अशी शुभमला शंका आली. खरंच खूपच कमी मार्क मिळाले किंवा अगदी नापास झालो, तर आई-बाबा काय करतील? आजी-आजोबा काय म्हणतील? माझी शाळा आणि ट्युशन बदलतील की मला आणखी प्रेरणादायी व्हिडीओ पाठवतील?

मागे एकदा गणितात खूप कमी मार्क पडले होते, तर आजोबांनी जन्मत:च हात आणि पाय नसलेल्या एका माणसाचा व्हिडीओ पाठवला आणि ‘बघ इतके प्रॉब्लेम असूनसुद्धा लोक किती आनंदाने जगतात. तू गणित या विषयाला मुळीच घाबरू नकोस’, असं सांगितलं. म्हणजे गणित नीट जमलं नाही तर हातपाय तुटल्यासारखं अपंगत्व येणार आहे की काय? असा प्रश्न शुभमला पडला. पण हा प्रश्न विचारणार कोणाला?

हेही वाचा – मोडक्या व्यवस्थेचे कठोर वास्तव

या सगळ्याचा विचार डोक्यात चालू असतानाच तीन आठवड्यांवर आलेल्या परीक्षेची त्याला आठवण झाली आणि शुभमची भूकच गेली. हात-पाय थंड पडले. आता काय करावं? परीक्षेत पास होण्यासाठी काहीतरी मदत करा. मला उपदेशांची गरज नाही, तर खऱ्या खऱ्या मदतीची गरज आहे, हे मोठ्यांना कसं सांगावं या विचारात शुभम बुडला. तेवढ्यात त्याच्या फोनवर नवीन मेसेजचा आवाज झाला. त्याच्या एका मित्रानं पाठवलेला मेसेज समोर आला. कवी भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी होती ती –

जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी

कीर्तने सारीकडे चोहीकडे ज्ञानेश्वरी

काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका

chaturang@expressindia.com