अध्यात्म हा विरंगुळ्याचा उद्योग नाही. उलट ज्या ज्या गोष्टींवर तुम्ही विरंगुळ्यासाठी अवलंबून राहता त्या त्या गोष्टी मनानं सोडण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असंच जणू हा अभंग खडसावून सांगतो. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचा हा अभंग आहे. तो प्रथम वाचू. अभंग असा आहे :

जोंवरी विराग नुपजे विषयीं।

तों अभ्यास कांही करूं नये।। १।।

वैराग्यावांचोनि केलिया अभ्यास।

तंव वासनेस तीव्रता ये।। २।।

मलीन सलील सांठवितां घरी।

किडे त्या माझारीं होति तेव्हां।। ३।।

अशुद्ध मनाची तेविं एकाग्रता।

होय आत्मघाता कारण ती।। ४।।

शेवटीं समाधी वैराग्याचे फळ।

अभ्यास केवळ मध्यस्थचि।। ५।।

आत्मनामयाचा विवेक करणें।

तो विरागावीणें न घडेचि।। ६।।

ज्ञानेश्वरकन्या भोगीं विरागीणी।

जाहली जोगीणी प्रियासाठी।। ७।।

वरवर पाहता, अभंगाचा प्रत्येक चरण म्हणजे जणू शब्दअसूड भासतो. वैराग्य नाही, तर मग अभ्यासही करू नका, असंच तो ठणकावून सांगतोय, असं वाटतं. प्रत्यक्षात हा अभ्यास कोणता, हे लक्षात घेतलं, तर मग हा अभंग अत्यंत करुणेनं आपल्याला काहीतरी समजावतोय, हे लक्षात येईल. हा अभ्यास म्हणजे अध्यात्माचा  परिपाठीतला प्रचलित अभ्यास किंवा साधना, असंच आपण पटकन मानतो. त्यामुळे गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे हा अभंग कठोर भासतो. प्रत्यक्षात तो आपल्याला सजग करू पाहतोय, हे पहिल्या दोन चरणांतच लक्षात येतं. हे चरण सांगतात की, ‘‘जोंवरी विराग नुपजे विषयीं। तों अभ्यास कांही करूं नये।। वैराग्यावांचोनि केलिया अभ्यास। तंव वासनेस तीव्रता ये।। ’’ तर हा अभ्यास आहे, विषयांच्या पकडीतून सुटण्याचा! पण महाराज विचारतात, विषयांचं प्रेम खरंच सुटलंय का? ते सुटलं नसताना नुसतं विषयमुक्तीच्या अभ्यासाचं सोंग काय कामाचं? एकदा सद्गुरूंना विचारलं की, ‘मी-माझे कसं सुटेल?’ त्यांनी ताडकन गंभीर स्वरात विचारलं, ‘‘ते सोडायची खरी इच्छा आहे का?’’ मी गप्प बसलो! खरं हेच आहे की, मी आणि माझेपणा सुटावा, ही खरी इच्छा असेल, तर तो याच क्षणी सुटू शकेल! पण तोंडानं नुसतं म्हंटलं, पण मनात खरी इच्छा नसली, तर मग ते सुटेल कसं? निसर्गदत्त महाराजही म्हणत की, ‘साधायचं तर याच क्षणी साधेल आणि तुम्ही ते काळावर सोपवलंत तर अनंत जन्मं गेले तरी साधेल असं नाही!’ तर विषयांच्या पकडीतून सुटल्याशिवाय अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करता यायची नाही, हे साधकाला प्रामाणिकपणे वाटतं. पण तरीही चित्तात अगदी खोलवर असलेलं विषयांचं प्रेम सुटता सुटत नाही. विषयांबाबत विरक्ती नसताना कितीही अभ्यास केला, तरी त्याचा उपयोग होत नाही. उलट वैराग्यावाचून अभ्यास केला, तर वासना अधिकच उग्र रूप धारण करेल, असं महाराज सांगतात. एका वैद्यानं रुग्णाला तपासून सांगितलं, की हे औषध देतो. ते फार गुणकारी आहे. खडखडीत बरा होशील. फक्त ते घेताना माकडाचा चेहरा डोळ्यासमोर येऊ द्यायचा नाही! मग काय? औषध घेताना हमखास माकडाची आठवण व्हायचीच! तसं आहे हे. विषय दडपण्यासाठी आपण अभ्यास करतो आणि तो अभ्यासच विषयांचं स्मरण अधिक तीव्र करत असतो!

– चैतन्य प्रेम