ओदिशामधील घटना; विद्यार्थ्यांवर उपचार

ओदिशातील मलकानगिरी आणि कालाहंडी जिल्हय़ातील विविध शाळांमधील २३० विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. यामध्ये एका सरकारी निवासी शाळेतील १५० मुलींचाही समावेश आहे. उलटी, जुलाब, मळमळ आणि पोटदुखी ही विषबाधा झाल्याची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मलकानगिरीतील चित्रकोंडा परिसरातील बडापाडा येथील सरकारी निवासी शाळेत शुक्रवारी सकाळचा नाश्ता देण्यात आला होता. यातूनच १५० मुलींना विषबाधा झाली असल्याचे, एकात्मिक आदिवासी विकास संस्थेचे (आयटीडीए) प्रकल्प व्यवस्थापक रामकृष्ण गोंड यांनी दिली.

अशीच घटना कालाहंडी जिल्हय़ातही घडली असून, लुमा, कुबरी, बंधपरी, राजेंद्रपूर आणि डांगरी या पाच गावांतील शाळांमधील ८० विद्यार्थ्यांनाही माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी भोजन घेतल्यानंतर त्यांना उलटी, जुलाब, मळमळ आणि पोटदुखीची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने सुधारत असून, परिस्थितीवर जिल्हा शिक्षणाधिकारी, उपजिल्हाधिकारी लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.