पूरग्रस्त केरळसाठी अधिक निधीची मागणी

पूरग्रस्त केरळमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राज्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा आणि परदेशातून मदत घेण्याची मुभा द्यावी, अशी विनंती या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांना केली.

काँगेस, माकप, आरएसपी, केरळ काँग्रेस (मणि) आणि एक अपक्ष अशा ११ खासदारांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील स्थितीची माहिती दिली. आम्हाला केरळला पुन्हा गतवैभव मिळवून द्यावयाचे आहे आणि त्यासाठी अधिक निधी हवा आहे, असे खासदार म्हणाले.

परदेशातून मिळणाऱ्या मदतीवर घालण्यात आलेले र्निबध उठवावे, अशी मागणीही खासदारांनी केली. या बाबत आपण परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टनी यांनी सांगितले.

केंद्र सरकारने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी ६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र यापेक्षाही अधिक नुकसान झाले असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचे म्हणणे आहे.