दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेथील नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील संघर्ष आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचला आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे काम करू द्या, अशी मागणी केजरीवाल यांनी मोदींकडे केली. त्याचवेळी केंद्र सरकार दिल्ली सरकारच्या कामात हस्तक्षेप करून हे सरकारदेखील चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून नजीब जंग आणि केजरीवाल यांच्यात सुरू असलेला संघर्ष रोज नवे वळण घेत आहे. मंगळवारी या दोघांनीही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी केजरीवाल यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांच्याकडे आपली बाजू मांडली. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोणत्या अधिकाऱयाकडे कोणते काम सोपवायचे, हे ठरविण्यामध्ये लोकनियुक्त सरकारला स्थान असले पाहिजे. नायब राज्यपालांच्या मदतीने केंद्र सरकार दिल्लीतील सरकार चालविण्याच प्रयत्न करीत आहे. आम्हाला स्वतंत्रपणे काम करू द्या.
दरम्यान, सरकारमधील कोणत्याही अधिकाऱयाची बदली करण्याचा किंवा नियुक्ती करण्याचा आपला अधिकार आहे आणि आपला कोणताही निर्णय घटनाबाह्य नसल्याचे नजीब जंग यांनी म्हटले आहे.