केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाला मंजुरी दिल्यानंतर आता एअर इंडिया कोण खरेदी करणार, याची चर्चा उद्योगविश्वात रंगली आहे. भारतीयांच्या मनात एअर इंडियाला नाही म्हटले तरी एक विशेष असे स्थान आहे. त्यामुळे सामान्य लोकांनाही एअर इंडियाचे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सोशल मीडियासह अनेक ठिकाणी यावरून चर्चा झडत आहेत. एअर इंडियासारखा प्रचंड विस्तार असलेली आणि नामांकित कंपनी विकत घेण्यासाठी टाटा समूहासारख्या दिग्गजांसह स्पाईस जेट व इंडिगो यांसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मात्र एअर इंडिया खरेदी करणे, कितपत फायदेशीर ठरेल, याबाबत शंका उपस्थित केली आहे. ट्विटरवर एका व्यक्तीकडून आनंद महिंद्रा यांना याविषयी छेडण्यात आले. कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या एअर इंडियामध्ये तुम्ही गुंतवणूक करणार का, असा सवाल या व्यक्तीने विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, मी बऱ्यापैकी धाडसी आहे, असे मला स्वत:ला वाटते. मात्र, मी एक गोष्ट जाहीरपणे कबूल करतो की, माझ्यात एअर इंडिया खरेदी करण्याइतकी हिंमत नाही, असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

उद्योगविश्वात आनंद महिंद्रा यांना धाडसी आणि आव्हानं स्वीकारणारा उद्योगपती म्हणून ओळखले जाते. महिंद्रा समूह सुरूवातीला केवळ ट्रॅक्टर्स व अवजड वाहनांची निर्मिती करत असे. मात्र, आनंद महिंद्रा यांच्या काळात समूहाचा विस्तार वाढला. त्यांच्यामुळेच अनेक क्षेत्रांमध्ये महिंद्रा समूहाने टाटा समूहापुढे आव्हान उभे केले. याशिवाय, आनंद महिंद्रा यांनी नव्याने उभारलेल्या व्यवस्थेमुळे महिंद्रा समूहाने लहान विमानांच्या निर्मिती क्षेत्रात लक्षणीय झेप घेतली आहे. महिंद्रा समूहाकडून देशांतर्गत विमान सुरू करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे साहजिकच एअर इंडिया खरेदी करू शकणाऱ्या स्पर्धकांमध्ये महिंद्र समूहाचे नाव आघाडीवर होते. मात्र, आनंद महिंद्रा यांच्या विधानामुळे महिंद्रा समूह एअर इंडिया खरेदी करण्यासाठी फारसा उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

एअर इंडियाचे खासगीकरण हा भांडवलदारांना खूश करण्यासाठीचा डाव – काँग्रेस