अयोध्या विकास प्राधिकरणाकडून राम मंदिराचे नकाशांना मंजुरी देण्यात आली आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आयुक्त एम.पी.अग्रवाल यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून दोन नकाशे सोपवण्यात आले होते. त्या नकाशांना बैठकीदरम्यान मंजुरी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

“राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे दोन नकाशे सोपवण्यात आले होते. त्यापैकी एक लेआऊट जो २ लाख ७४ हजार चौरस मीटरचा होतं. तर दुसरा मंदिराचा नकाशा होता जो १२ हजार ८७९ चौरस मीटरचा होता. संचालक मंडळाच्या बैठकीत १४ सदस्य सहभागी झाले होते. त्यानंतर सर्वसंमत्तीनं या नकाशांना मंजुरी देण्यात आली,” असं अग्रवाल म्हणाले. यावर लागू असलेल्या टॅक्सची माहिती घेतली जात आहे. ते जमा केल्यानंतर हे नकाशे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला सोपवण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, मंदिराच्या नकाशाला आता मंजुरी मिळाली असून आता मंदिर उभारणीचं काम लवकरच सुरू करणार असल्याचं ट्रस्टच्या सदस्यांचं म्हणणं आहे.

राम मंदिराच्या पाच एकर क्षेत्रात असलेल्या जुन्या मंदिरांच्या साफसफाईचं काम सुरू करण्यात आलं आहे. एल अँड टी कंपनीची मशीन त्या ठिकाणी पोहोचली असून काम सुरू करणअयात आलं आहे. तर आणखी काही मशीन एक दोन दिवसात त्या ठिकाणी येतील. मंदिरासाठी खोदकाम सुरू करून त्याचं पिलर उभारण्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्त यांनी सांगितलं.