भारतीय जनमानस हेलावून टाकणाऱ्या दादरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी बुधवारी आरोपपत्र दाखल केले. त्यात दोन युवकांसह १५ जणांविरोधात पोलिसांनी आरोप निश्चित केले आहेत.
उत्तर प्रदेशातील दादरी येथील मोहंमद अखलाक यांना घरात गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून जमावाने ठेचून मारल्याची नृशंस घटना २८ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यांचा मुलगा दानिश या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले होते. देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत साहित्यिकांसह विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली होती.
या हत्याकांडाशी संबंधित ७ आरोपींची मागील दोन दिवसांत धरपकड करण्यात आली. पंधरा जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून बुधवारी अटक करण्यात आलेल्या आणखी दोघांविरोधात अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यात येईल.
दोघा फरारींचा शोध सुरू असूनही तेही लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील, अशी माहिती ग्रेटर नोयडाचे पोलीस उपअधीक्षक अनुराग सिंग यांनी दिली.