केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही वाढ करताना खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत SC-ST प्रवर्गाती विद्यार्थ्यांच्या शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, आता SC-STच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ५० रुपयांवर १२०० रुपये करण्यात आले आहे तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ७५० वरुन १५०० रुपये इतके करण्यात आले आहे.

सीबीएससी बोर्डाने गेल्या आठवड्यातच या फी वाढीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तसेच ज्या शाळांनी जुन्या नियमानुसार दहावी-बारावीची परीक्षा नोंदणी सुरु केली आहे त्यांना विद्यार्थ्यांकडून नव्या नियमानुसार शुल्क वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी SC-ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयासाठी ३०० रुपये अधिक भरावे लागणार आहेत. यापूर्वी अतिरिक्त विषयासाठी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क नव्हते. मात्र, शंभर टक्के दृष्टीहीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तसेच जे विद्यार्थी शेवटच्या तारखेपर्यंत नव्या नियमानुसार नोंदणी करणार नाहीत त्यांची नोंदणी होणार नाही त्यामुळे त्यांना २०१९-२०च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

यामध्ये स्थानांतरण शुल्क अर्थात मायग्रेशन फी देखील १५० रुपयांवरुन ३५० रुपये इतकी करण्यात आली आहे. तर परदेशात सीबीएसईच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाच विषयांच्या बोर्डाच्या परीक्षा शुल्कासाठी १०,००० रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी हे शुल्क ५,००० रुपये होते. तर या विद्यार्थ्यांना १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेत अतिरिक्त विषयासाठी आता १००० रुपयांऐवजी २००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.