केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. करोना व्हायरसमुळे सीबीएसई बोर्डाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी नववी ते १२ वी इयत्तेचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

“देशातील आणि जगातील सध्याची असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन, सीबीएसईला नववी ते १२ इयत्तेपर्यंतच्या अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता” असे डॉ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितले. ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत.

अभ्यासक्रम कितपत कमी करण्यात आलाय, तो शिक्षकांना विद्यार्थ्यांना समजावून सांगावा लागेल. अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात देशभरातील शिक्षण तज्ज्ञांकडून १५०० सल्ले मिळाल्याचे पोखरीयाल यांनी सांगितले. यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी एप्रिल महिन्यात अशीच योजना तयार केली होती.

त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची शिफारस केली होती. मार्च महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन सुरु झालं. देशात आता अनलॉक २ सुरु आहे. पण शाळा, कॉलेजस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही सुरु झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत. प्रत्यक्ष शाळेऐवजी ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे.