केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवसांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या मुद्य्यारून आता देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. एवढंच नाहीतर या शेतकरी आंदोलनावर आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग व पॉप गायिका रिहाना यांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवणारं ट्विट केल्यानंतर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याविरोधात कडक भूमिका घेतल्याचे दिसून आले. शिवाय, आज पंतप्रधान मोदींनी देखील या मुद्य्यावरून विरोधकांवर निशाणा साधल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारला “१८ वर्षीय मुलीला शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?” असा प्रश्न विचारला आहे.

रिहाना, ग्रेटा आणि मिया खलिफा यांनी ट्विट केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वेधलं गेलं आहे. परदेशातील नामवंतांनी केलेल्या ट्विटवरून भारतात बरंच रणकंदन सुरू झालं आहे. देशातील विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींकडूनही या पार्श्वभूमीवर ट्विट केलं गेलं आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी ट्विटकरून शेतकरी आंदोलनाबाबत सरकारधार्जिणी भूमिका घेतल्याचे दिसून आल्याने आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

“खळबळ निर्माण करणारे…”; शेतकऱ्यांचे समर्थक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना मोदी सरकारचं कठोर शब्दांमध्ये उत्तर

या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला, “सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या सारख्या व्यक्तींना भरकटवलं जात आहे. आपला देश एवढा कमकुवत आहे का? की विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलल्याबद्दल १८ वर्षीय मुलीला(ग्रेटा थनबर्ग) शत्रू मानलं जात आहे?” असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये सेलिब्रिटींनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. “खळबळ निर्माण करणारे सोशल मीडिया हॅशटॅग आणि वक्तव्यांच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याची पद्धत, खास करुन जेव्हा ही पद्धत लोकप्रिय व्यक्तींकडून वापरली जाते तेव्हा ती योग्य नसते तसेच ती बेजबदारपणा दाखवते,” असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. रिहानाबरोबरच ग्रेटा थनबर्ग, अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नातेवाईक असणाऱ्या मीना हॅरिस यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.