03 December 2020

News Flash

‘डोकलामप्रश्नी तोडगा निघण्याची खात्री, चीन चर्चेसाठी पुढाकार घेईल’

जगात भारताला हरवू शकेल असं एकही सैन्य नाहीये

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (संग्रहित छायाचित्र)

डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध कमालीचे तणावाचे झाले आहेत. मात्र या प्रश्नी लवकरच तोडगा निघेल आणि चर्चेची सुरूवात ही चीनकडून होईल याची खात्री आहे असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. भारताला युद्ध आणि संघर्ष नकोय तर शांतता हवी आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा पोलिसांतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.

मला पूर्ण खात्री आहे की डोकलामचा प्रश्न हा चर्चेनेच सुटेल इतर कोणत्याही मार्गाने नाही. चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होईल त्यानंतर हा प्रश्न सुटेल. आपल्या आयुष्यात आपण आपले मित्र बदलू शकतो मात्र आपले शेजारी बदलू शकत नाही, ही बाब चीनलाही ठाऊक आहे असं सूचक वक्तव्यही राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

डोकलाम प्रश्नावरून या भारत आणि चीन या दोन देशांमध्ये एकप्रकारे कोंडी निर्माण झाली आहे ही कोंडी फुटेल आणि हा प्रश्न सुटेल अशी आशा आहे. भारतीय सैन्यदलाची ताकद सगळ्या जगाला ठाऊक आहे, त्यामुळेच जगात असा एकही देश नाही जो भारतावर हल्ला करू शकतो असाही आत्मविश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.

डोकलामच्या प्रश्नावरून गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये वाद सुरू आहे. १६ जून रोजी चीनच्या काही सैनिकांनी डोकलाममध्ये घुसखोरी केली त्यानंतर डोकलाम हा आमचाच भाग आहे असा दावा चीनकडून वारंवार करण्यात आला. यानंतर डोकलाम आणि इतर सीमावर्ती भागात भारतानेही सैन्य तैनात केले यावरून दोन्ही देशांमधील संबंध हे कमालीचे ताणले गेले आहेत.आधी भारताने सैन्य मागे घ्यावे नाहीतर युद्ध अटळ आहे असे इशारे चीनने वारंवार दिले आहेत. तर चीनने आधी सैन्य मागे घ्यावे अशी मागणी भारताने वारंवार केली आहे.

भारताने सुरूवातीपासूनच शांततेचं धोरण अवलंबले आहे आणि हा प्रश्न चर्चेने सुटेल असं म्हटलं आहे. तरीही चीनने त्यांचा आडमुठेपणा सोडलेला नाही, त्याचमुळे हा प्रश्न चिघळला आहे. याआधी भारताने आणि चीनने सख्खे शेजारी म्हणून नांदावे असा प्रेमळ सल्ला दलाई लामा यांनीही दिला होता. तरीही चीनने चर्चेची तयारी दर्शवलेली नाही. अशात आता राजनाथ सिंह यांनी मात्र हा प्रश्न लवकरच सुटेल आणि याच्या चर्चेची सुरूवात चीनकडूनच होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2017 2:19 pm

Web Title: china will initiate dialogue on doklam says rajnath singh
टॅग Rajnath Singh
Next Stories
1 टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती; हैदराबादमधील मेकॅनिकल इंजिनिअरचे महत्वपूर्ण संशोधन
2 विशाल सिक्का यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरु; इन्फोसिसपुढे सक्षम व्यक्ती शोधण्याचे आव्हान
3 मुस्लिम बांधव मदतीला धावले नसते तर आम्ही मेलो असतो, जखमी साधूंचा दावा
Just Now!
X