नेपाळमधील केपी शर्मा ओली यांचे सरकार वाचवण्यासाठी चीनने आता उघडपणे प्रयत्न सुरु केले आहेत. चीनच्या नेपाळमधील राजदूत हाउ यांकी यांनी मंगळवारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे नेते झाला नाथ खानाल यांची भेट घेतली. हाउ यांकी यांच्याकडून ओली सरकार पाडण्यासाठी एकत्र आलेल्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

मागच्या काही दिवसात हाउ यांकी यांनी नेपाळच्या राष्ट्रपती बिध्या देवी भंडारी आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते माधव कुमार नेपाळ यांची भेट घेतली. माधव कुमार नेपाळ आणि खानाल दोघे माजी पंतप्रधान आहेत. या दोघांनी पुष्प कमाल दहल म्हणजेच प्रचंड यांच्या गटाबरोबर हातमिळवणी केली आहे. प्रचंड यांनी पंतप्रधान ओली यांचे सरकार पाडण्यासाठी मोहिमच उघडली आहे.

पुष्प कमाल दहल म्हणजेच प्रचंड हाउ यांकी यांना भेटण्यासाठी फारसे उत्सुक्त नाहीत असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. केपी शर्मा ओली यांना चीनचे समर्थन प्राप्त आहे. त्यांनी अलीकडेच भारताबरोबर सीमावाद उकरुन काढला आणि उत्तराखंडच्या सीमेवरील तीन भारतीय भागांवर दावा केला. त्यासाठी त्यांनी घटनात्मक दुरुस्ती करुन नेपाळच्या नकाशात बदलही घडवून आणला. या सगळयामागे चीनचा हात असल्याचे बोलले जाते.

हाउ यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांबरोबरच्या भेटीगाठीचे चिनी दूतावासाने समर्थन केले आहे. नेपाळ कम्युनिस्ट पार्टी अडचणीत यावी अशी आमची इच्छा नाही, या नेत्यांनी त्यांचे मतभेद मिटवून एकत्र रहावे ही आमची भूमिका आहे असे दूतावासाच्या प्रवक्त्याने काठमांडू पोस्टला सांगितले.