आणखी एका काँग्रेस नेत्यावर कारवाई
नवी दिल्ली : कथित आर्थिक गैरव्यवहारावरून कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अटक केली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या पाठोपाठ केंद्रीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेले ते दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत.
ईडीकडून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असून महत्त्वाच्या चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.
कर्नाटक विधानसभेवर सातवेळा निवडून गेलेले शिवकुमार यांची गेले पाच दिवस ‘ईडी’कडून चौकशी सुरू होती. करचुकवेगिरी आणि हवाला प्रकरणी प्राप्तिकर विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून गेल्या सप्टेंबरमध्ये ईडीने त्यांच्यासह त्यांचा सहकारी एस. के. शर्मा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.
माझ्या अटकेत यश मिळविलेल्या भाजपमधील माझ्या मित्रांचे मी अभिनंदन करतो, अशी उपहासात्मक सुरुवात करीत शिवकुमार यांनी ट्वीटद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ‘‘माझ्या विरोधातील प्राप्तिकर आणि ईडीच्या तक्रारी या खोटय़ा आहेत आणि भाजपच्या द्वेषमूलक राजकारणातून त्या जन्मल्या आहेत. माझा ईश्वरावर आणि देशातील न्याययंत्रणेवर पूर्ण विश्वास असून या प्रकरणातून कायदेशीर आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर माझी प्रतिमा उजळून निघणार आहे.’’
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या या नेत्यांनी या अटकेवर जोरदार टीका केली आहे.
ईडीने आधी दिलेल्या समन्सविरोधात शिवकुमार यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात केलेली याचिका गुरुवारी फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्याच रात्री ईडीने नव्याने समन्स काढून त्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावले होते.
त्यांची चौकशी सुरू झाली तेव्हापासूनच त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत गर्दी केली होती. मंगळवारी अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता नेले जात असताना ईडी मुख्यालयाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ईडी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी दिला आहे. शिवकुमार निर्दोष ठरले तर आनंदच होईल असे येडियुरप्पा यांनी सांगितले.