‘कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशिल्ड’ या लशीच्या भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. लशीचे १० कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होतील. डिसेंबपर्यंत आमच्या चाचण्या पूर्ण होऊ शकतील. जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. पण, ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लशीची येथील उपलब्धता अवलंबून आहे, असे पूनावाला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सीरम इन्स्टिटय़ूटने लशीच्या उत्पादनासाठी करार केला असून, या लशीच्या सुरक्षिततेबाबत आता खात्री झाली आहे. या लशीने कोविड १९ विषाणू विरोधात चांगली प्रतिकारशक्ती तयार होते हेही स्पष्ट झाले आहे. भारतात आणि परदेशातही या लशीच्या चाचण्या झाल्या एक-दोन वर्षे लागतील. कारण लशीने प्रतिकारशक्ती दीर्घकाळासाठी वाढवली की नाही हे यात महत्त्वाचे असते. तरीही कोविशिल्ड लशीबाबत सर्व घटक सकारात्मकच आहेत. ही लस २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत भारतात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले.

संसर्गजन्य रोगांवरील लशीसाठी ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ बायोसायन्सेस’ ही नवी कंपनी स्थापन करण्यात आली असून, त्यात तीन हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, असे पूनावाला म्हणाले.

किमतीबाबत अनिश्चितता

लशीच्या किमतीबाबत तूर्त काहीच सांगता येणार नाही, असे अदर पूनावाला म्हणाले. याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. मात्र, लशीचा काही खर्च सरकार उचलण्याची शक्यता असल्याने लस फार महाग असणार नाही, असे पूनावाला यांनी सांगितले. कोविशिल्ड, कोव्होव्हॅक्स, कोव्हीव्हॅक्स, कोव्ही-व्हॅक, एसआयआय-कोव्हॅक्स या पाच कोविड लशी दर तीन महिन्यांना एक याप्रमाणे पुढील वर्षी बाजारात आणणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.