राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय व्यापार, वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना कांदा निर्यातबंदी संदर्भात पत्र पाठवले आहे. फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदी उठवण्याची त्यांच्याकडे मागणी केली आहे.

पियूष गोयल यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, ”आपल्याशी फोनवर याविषयी विस्तृत चर्चा झाली होती आणि कांदा निर्यातीवर बंदी उठवण्याची विनंती मी आपल्याकडे केली होती.आमची पुन्हा एकदा आपल्याकडे मागणी आहे की, कांदा निर्यातीवर घातलेली बंदी परत घेतली जावी. महाराष्ट्राच्या कांद्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी असते. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देखील मिळतो. कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी अतिशय दुःखी आहेत. मला आशा आहे की तुम्ही तात्काळ योग्य तो निर्णय घ्याल.”

कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निर्यातबंदीनंतर कांदा उत्पादक शेतकरी घाबरून मोठय़ा प्रमाणावर साठवलेला कांदा विक्रीस पाठविणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

गेल्या महिन्याभरापासून कांद्याला चांगले दर मिळत होते. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याला ४० रुपये दर मिळत होता. निर्यातबंदीमुळे मात्र शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच देशांतर्गत बाजारपेठेतील दर कमी होतात, असा अनुभव आहे.

केंद्र सरकारने सोमवारी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय अर्थमंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयांशी चर्चा करून निर्यातबंदीचा फेरविचार केला जाईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले आहे.