News Flash

जो बायडन यांच्या शपथविधीआधी अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची तयारी; FBI चा इशारा

सुरक्षेसाठी १५ हजार तुकड्या तैनात

अमेरिकेत बुधवारी वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटॉल इमारतीत झालेल्या हिंसाचारामुळे आधीच तणावाचं वातावरण असताना अजून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जो बायडन यांच्या शपथविधीआधी ट्रम्प समर्थकांकडून वॉशिंग्टन डीसी तसंच इतर ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. एफबीआयने यासंबंधी इशारा दिला असल्याचं वृत्त रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

कॅपिटॉल इमारतीबाहेर झालेल्या हिंसाचारानंतर सतर्क असलेल्या एफबीआयने मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून पुन्हा हिंसक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेची पूर्ण तयारी केली आहे. वॉशिंग्टनला सुरक्षेसाठी जवळपास १५ हजार तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. याशिवाय वॉशिंग्टन स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना २४ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकेत अभूतपूर्व सत्तासंघर्ष, ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; संसदेत घुसून तोडफोड

जो बायडन यांच्या शपथविधीला ‘अमेरिका युनायटेड’ ही मुख्य संकल्पना असेल अशी माहिती त्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, एफबीआयने १६ जानेवारी ते २० जानेवारी या कार्यकाळात हिंसक आंदोलनाची शक्यता व्यक्त केली असून शपथविधी झाल्यानंतर पुढील तीन दिवसांसाठीही हा इशारा कायम आहे.

नॅशनल गार्ड ब्युरोचे प्रमुख जनरल डॅनियल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शनिवारपर्यंत वॉशिंग्टनमध्ये जवळपास १० हजार तुकड्या उपस्थित असतील. सुरक्षा, लॉजिस्टिक अशा गोष्टींसाठी मदत करण्यावर त्यांचा भर असेल. जर स्थानिक प्रशासनाने मागणी केली तर ही संख्या १५ हजारांपर्यंतही जाऊ शकते”.

आणखी वाचा- ट्रम्प यांचे Twitter Account कायमचे बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला

ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या हालचाली
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कॅपिटॉल हिलमधील हिंसाचारास उत्तेजनाच्या कारणास्तव महाभियोग चालवण्यासाठी कायदा संमत करण्याच्या दिशेने पावलं टाकण्यात येत आहेत, असं अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी स्पष्ट केलं आहे. ट्रम्प यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांनी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनाही आवाहन केले असून मंत्रिमंडळाने घटनात्मक अधिकारांचा वापर करून त्यांना पदावरून दूर करावं असे पलोसी यांचं मत आहे. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, की पहिल्या उपायाचा भाग म्हणून माइक पेन्स यांना २५ व्या घटनादुरुस्तीतील अधिकारांचा वापर करून ट्रम्प यांना काढण्यास राजी करण्यासाठी मतदान घेण्यात येईल. याला पर्याय म्हणून महाभियोगाची कारवाईही ट्रम्प यांच्यावर करता येऊ शकतं व तसं झाल्यास महाभियोगाच्या माध्यमातून काढण्यात आलेले ते पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 10:11 am

Web Title: fbi warns of armed protests in us ahead of joe bidens inauguration sgy 87
Next Stories
1 महात्मा गांधींच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली; भाजपा नेत्याचं विधान
2 आत्मनिर्भर टर्की; WhatsApp वर टाकला बहिष्कार, राष्ट्राध्यक्षांनीही सुरु केला ‘या’ ‘मेड इन टर्की’ अ‍ॅपचा वापर
3 पाच कोटी ३६ लाख रुपये फुलांच्या सजावटीसाठी उधळले; ‘या’ देशातील राष्ट्राध्यक्षांवर होतोय टीकेचा भडीमार
Just Now!
X