हजार वर्षांतील सर्वाधिक पावसाचा विक्रम

अमेरिकेत कॅरोलिना भागात आठवडाअखेरीस आलेल्या पुरात ११ जण मरण पावले आहेत तर दहा हजाराहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांनी काल आपत्कालीन आदेशावर सही केली असून त्यामुळे दक्षिणेकडील कॅरोलिना प्रांताला मदत मिळणार आहे. कॅरोलिनात हजार वर्षांत पडला नाही एवढा पाऊस पडल्याचे गव्हर्नर निक्की हॅले यांनी सांगितले.
दक्षिण कॅरोलिनात हवेच्या दाबातील बदलाने १४ इंच म्हणजे ३६ सेंटीमीटर पाऊस पडला आहे, तो एक विक्रम असल्याचे राष्ट्रीय हवामान वेधशाळेने म्हटले आहे. पावसाने अचानक पूर आला असून काही धरणे फुटली आहेत. लोक सुरक्षित ठिकाणी गेले आहेत, असे श्रीमती फिलीस जोन्स यांनी सांगितले. त्यांच्या विलो क्रीक या निवासी संकुलात पाणी गेले आहे. कालांतराने पाणी उतरले असून आपण लुटालुटीच्या भीतीने घर सोडलेले नाही, असे त्या म्हणाल्या. या भागात किमान २६ हजार लोकांना वीज मिळण्यात अडचणी येत आहेत. ४० हजार लोकांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. अनेक लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला असून त्यांना बोटी व विमानांनी हलवण्यात येत आहे कारण रस्ते व पूल बंद आहेत. आमची मोटार, घर सगळे पाण्याखाली गेले आहे. काही करायला वेळच मिळाला नाही, असे पॅट्रिशिया हार्डे यांनी सांगितले.